You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डॉ. शीतल आमटेंच्या मृत्यूवेळी आनंदवनात सोमवारी नेमकं काय घडलं होतं?
- Author, प्रवीण मुधोळकर
- Role, बीबीसी मराठीसाठी
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यूच्या बातमीने खळबळ उडाली. त्यांच्या मृत्यूनंतर आनंदवनात शोकाकुल वातावरण आहे, पोलीस मृत्यूप्रकरणी तपास करत आहेत.
सोमवारी दुपारी साडेबारा वाजता डॉ. शीतल आमटे -करजगी यांच्या निधनाची बातमी येताच आनंदवनावर दुःखाचा डोंगर कोसळला.
कृष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासाठी संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या बाबा आमटेंच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व डॉ. शीतल आमटे - करजगी या करत होत्या.
आनंदवन परिवारातील देशविदेशातील हजारो सदस्य या धक्क्यामुळे हादरून गेले. सोमवारी रात्री आनंदवनात दिवंगत बाबा आमटे यांच्या समाधी शेजारी डॉ. शीतल आमटे-करजगी याच्या पार्थिवावर दफनविधी करण्यात आला.
अचानक झालेल्या या घटनेमुळे आनंदवनाच्या बाहेरील सदस्यांना अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आलं नाही. त्यामुळे त्यांच्या अंत्यविधीला आमटे कुटुंबीयांसह त्यांचे सासरचे करजगी कुटुंबियांसह वरोऱ्यातील नागरिक उपस्थित होते. पण डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येनं अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. पण आमटे कुटुंबीय या घटनेनंतर धक्क्यात आहे.
"या संपूर्ण प्रकरणाची आम्हाला पुसटशी कल्पना नव्हती, आम्ही संपूर्ण आमटे कुटुंबीय या घटनेमुळे हादरून गेलो आहेत," अशी प्रतिक्रिया डॉ. शीतल यांचे चुलत भाऊ आणि महारोगी सेवा समिती कार्यकारिणी सदस्य डॉ. दिगंत आमटे यांनी बीबीसी मराठीला दिली आहे.
आनंदवनात सोमवारी नेमकं काय घडलं?
एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार,
सोमवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास आनंदवनात डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या निवासस्थानातील शयनकक्षातून सकाळपासून बाहेर पडल्या नसल्याचं कळलं. त्यांच्या घरी काम करणाऱ्या महिला सविता बोपचे यांनी डॉ. शीतल आज बाहेर का आल्या नाही म्हणून त्यांच्या शयनकक्षात प्रवेश केला. त्यावेळी त्यांना डॉ. शीतल आमटे-करजगी या बेशुद्धावस्थेत दिसल्या.
घरकाम करणाऱ्या महिला सविता बोपचे यांनी डॉ. शीतल आमटे यांचे पती गौतम करजगी यांना बोलावून आणलं. डॉ. शीतल यांच्या शेजारीच काही औषधं आणि इंजेक्शन पडलेले त्यावेळेस लक्षात आलं. डॉ. शीतल बेशुद्धावस्थेत असल्यानं त्यांना तात्काळ वरोराच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं.
तिथं दुपारी साडे बारा वाजता त्यांना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉ. शीतल यांनी विषाचं इंजेक्शन स्वतःला टोचून आपलं जीवन संपवलं अशी प्राथमिक माहिती स्थानिक वरोरा पोलीस ठाण्यात देण्यात आली.
वरोरा उपजिल्हा रुग्णालयात यावेळी कोणतीही महिला डॉक्टर उपलब्ध नसल्याने डॉ. शीतल यांचं पार्थिव चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलवण्यात आलं. चंद्रपूरमध्ये डॉ. शीतल यांच्या पार्थिवावर तज्ज्ञ डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम केलं आणि पार्थिव संध्याकाळी आमटे कुटुंबियांना सोपवण्यात आलं.
आनंदवनातील परंपरेनुसार डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या पार्थिवावर आनंदवनातच दफन विधी करण्यात आला.
घटनेच्या वेळी आनंदवनात कोण कोण उपस्थित होतं?
डॉ. शीतल आमटे त्यांचे पती गौतम करजगी आणि मुलगा शार्विल हेच फक्त घटनेच्या वेळी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील आनंदवनात होते. डॉ. शीतल यांनी महारोगी सेवा समितीच्या सदस्यांवर आणि कामावर टीका केल्यानंतर या वादावर तोडगा काढण्यासाठी आमटे कुटंबीय मंथन करत होते.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडच्या लोकबिरादरी प्रकल्पमध्ये सर्व आमटे कुटुंबीय मुक्कामी होते. घटनेनंतर सोमवारी दुपारी सर्व कुटुंबीय आनंदवनात आले. पोलीस तपास पूर्ण झाल्यावर प्रकाश आमटे आणि त्यांचे कुटुंबीय परत हेमलकसाला जाणार आहेत.
तपास कुठवर आलाय?
डॉ. शीतल यांच्या मृत्युनंतर आनंदवनातील त्यांच्या घरात पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्यांची खोली पोलिसांनी सील केली असून आणखी पुरावे पोलीस जमा करत आहेत.
"या प्रकरणात आम्ही आकस्मिक मृत्यूच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून मृतदेहाच्या उत्तरीय तपासणी नंतर अधिक माहिती मिळेल," असं चंद्रपूर पोलीस अधीक्षक अरविंद साळवी यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
नागपूरहून गृहविभागाच्या फॉरेन्सिक तज्ज्ञांना चंद्रपूर पोलिसांनी वरोऱ्यात पाचारण केलं आहे. त्यांनी डॉ. शीतल वापरत असलेले मोबाईल फोन, टॅब आणि लॅपटॉप ताब्यात घेतला आहे. या फोन, टॅप आणि लॅपटॉपला पासवर्ड असल्याने तो सुरू करण्यासाठी हे तज्ज्ञ प्रयत्न करत आहेत.
गेल्या सोमवारी 20 नोव्हेबर 2020 डॉ. शीतल आमटे यांनी एक फेसबुक लाईव्ह करून संवाद साधला होता. हे फेसबुक लाईव्ह नंतर डॉ. शीतल यांनी डिलीट केलं होतं. या प्रकरणाची चौकशी करणारे चंद्रपूर पोलीस हा व्हीडिओ मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
डॉ. शीतल आमटे या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य होत्या.
गेल्या काही दिवसांपासून त्या मानसिक ताणावाखाली होत्या अशी माहिती महारोगी सेवा समितीचे कार्यकारिणी सदस्य डॉ. विकास आणि डॉ. प्रकाश आमटे यांनी पत्राद्वारे दिली होती.
त्यामुळे डॉ. शीतल आमटे - करजगी यांच्यावर नैराश्य किंवा मानसिक आरोग्यासंदर्भात काही उपचार सुरु होते का, यासंदर्भातही चंद्रपूर पोलीस तपास करत आहेत.
निधनापूर्वी काही तास आधी शीतल यांनी एक पेंटिंग ट्वीट केले होतं. 'वॉर अँड पीस' अशी कॅचलाइन त्याला देण्यात आली आहे.
पेंटिगवर त्यांनी स्वतःचं नावही लिहिलं होतं. चंद्रपूर पोलीस डॉ. शीतल आमटे - करजगी यांच्या सर्व सोशल मिडीया अकाऊंटचीही माहिती गोळा करून अधिक तपास करण्याचा प्रयत्न करत आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)