You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डॉ. शीतल आमटे: बाबा आमटेंची नात ते महारोगी सेवा समितीच्या CEO- असा होता प्रवास
डॉ. शीतल आमटे यांचा आज (30 नोव्हेंबर) स्मृतीदिन. त्यानिमित्ताने हा लेख प्रसिद्ध करत आहोत.
डॉ. शीतल आमटे यांचं 30 नोव्हेंबर 2020 ला चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन येथे निधन झालं. त्यावेळी त्या 38 वर्षांच्या होत्या. डॉ. शीतल आमटे या आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या.
त्या नैराश्याच्या गर्तेत होत्या असं आमटे कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाच्या आधी काही दिवसांपूर्वी काढलेल्या पत्रकात म्हटलं होतं.
डॉ. शीतल आमटे या ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे यांची मुलगी आहेत. रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित समाजसेवक बाबा आमटे हे डॉ. शीतल यांचे आजोबा होते.
आमटे परिवारातल्या तिसऱ्या पिढीतील डॉ. शीतल आमटे यांनी 2004 मध्ये नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस झाल्यानंतर टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेसमधून सोशल आंत्र्योप्रिनरशिपची डिग्री घेतली. अपंगत्वावरील डॉक्टर तज्ज्ञ म्हणून त्यांनी आनंदवनात कामाला सुरुवात केली.
आनंदवनला जगभरातील नेटवर्कमध्ये जोडण्यात त्यांचा हातखंडा होता. फोटोग्राफी आणि चित्रकला हे छंद जोपासणाऱ्या डॉ.शीतल सजग पालकत्वाच्या अभियानातही पुढाकार घेत होत्या.
डॉ. शीतल आमटे यांचे पती गौतम कराजगी हे इंजिनिअर आणि व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत. मल्टिनॅशनल कंपनीतील नोकरी सोडल्यानंतर त्यांनी आनंदवनात महारोगी सेवा समितीच्या ट्रस्टी म्हणून नेमणूक झाली. डॉ शीतल यांना सहा वर्षांचा मुलगा आहे.
महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी
सध्या त्या आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यरत होत्या.
2016 मध्ये महारोगी सेवा समितीची नवी कार्यकारणी जाहीर झाली. यात डॅा. शीतल आमटे - कराजगी आणि त्यांचे पती गौतम - कराजगी यांना स्थान देण्यात आलं होतं.
तेव्हापासून त्या महारोगी सेवा समितीच्या CEO पदावर कार्यरत होत्या. त्यांचे पती गौतम - कराजगी यांना अंतर्गत व्यवस्थापक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.
भारतात वैद्यकीय क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्या तरुणांसाठी त्यांनी मशाल आणि चिराग हे दोन उपक्रम सुरु केले. तर भारतभरातील अपंगत्व आलेल्या लोकांना मदत करण्यासाठी निजबल हे सेंटर सुरू केलं. पब्लिक हेल्थ नेटवर्कमध्येही त्यांचा सहभाग होता.
आनंदवन, सोमनाथ प्रकल्प, लोक बिरादरी प्रकल्प, लोकबिरादरी प्रकल्प नागेपल्ली, लोकबिरादरी प्रकल्प खमंचरू, अशोकवन प्रकल्प नागपूर, ग्रामीण विकास प्रकल्प मुळगव्हाण, ग्रामीण विकास प्रकल्प चेतीदेवळी, महारोगी सेवा समिती चंद्रपूर आणि ग्रामीण विकास संस्था वरोरा असे 10 प्रकल्प महारोगी सेवा समितीच्या अंतर्गत येतात.
त्यामुळे महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्या करत असलेल्या कामाचं अनेकजण कौतुक करत असत.
'आनंदवन'ला 'स्मार्ट व्हिलेज' बनवण्याचा मानस
रुग्णांच्या सेवेसोबतच परिसरातील आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि आनंदवनचा शाश्वत विकास यात रस घेतल्यानंतर देशातलं एक 'स्मार्ट व्हिलेज' उभं करायचं त्याचं स्वप्न होतं. या स्मार्ट व्हिलेजमध्ये पर्यावरणाच्या संरक्षणासोबतच तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्तम उत्पादनक्षमता असलेलं एक आर्थिक मॉडेल उभं करायचं होतं.
डॉ. शीतल आमटे यांच्याशी वैयक्तिक परिचय असलेले पत्रकार प्रसन्न जोशी सांगतात, "वयाच्या चाळीशीच्या टप्प्यात डॉ. शीतल आमटे 'आनंदवन'सारख्या प्रचंड मोठ्या संस्थेची प्रशासकीय जबाबदारी सांभाळत होत्या. हे कौतुकास्पद होतं. त्यांच्याशी जेव्हा बोलणं व्हायचं, तेव्हा त्या आनंदवनच्या कामाबाबत अगदी उत्साहाने बोलायच्या नवीन कोणते काम सुरू केलंय, हे उत्साहानं सांगायच्या."
"श्रमछावणी नावाचा उपक्रम त्यांना पुन्हा सुरू करायचा होता. आनंदवनच्या कामाचं डॉक्युमेंटेशन करण्याची त्यांची इच्छा होती," असंही प्रसन्न जोशी सांगतात.
आनंदवनला 'स्मार्ट व्हिलेज' बनवण्याचा डॉ. शीतल आमटे यांचा मानस होता. त्यांनी स्वत:च असा मानस त्यांच्या लिंक्डइनवरील प्रोफाईलद्वारे व्यक्त केला होता.
मुंबईत आयोजित होणाऱ्या काला घोडा फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी आनंदवनाच्या कामाबाबतचा एक स्टॉल लागतो. तेव्हा भर दुपारी उन्हात डॉ. शीतल आमटे ते स्टॉल चालवायच्या.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर काम आणि गौरव
जानेवारी 2016 मध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये 'यंग ग्लोबल लिडर 2016' म्हणून डॉ. शीतल आमटे यांची निवड झाली होती. त्यानंतर त्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या एक्स्पर्ट नेटवर्कच्या माध्यमातून ह्युमॅनटरीयन रिस्पॉन्ससाठी सदस्य म्हणूनही त्या निवडल्या गेल्या होत्या.
सध्या वर्ल्ड इनोव्हेशन ऑर्गनायझेशनसोबतही डॉ. शीतल आमटे काम करत होत्या.
2016 च्या INK फेलोशिप आणि रोटरी व्होकेशनल एक्सलन्सने डॉ. शीतल आमटे यांचा गौरव झाला आहे. तसंच, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ या दिल्लीतील संस्थेच्या सल्लागार मंडळावरही त्यांनी काम केले आहे.
शीतल आमटेंना चित्रकलेची आवड होती. त्यांच्या निधनाच्या काही तासांपूर्वीच त्यांनी एक चित्र काढले होते आणि ट्वीट केले होते. त्या चित्राला त्यांनी 'वॉर अॅंड पीस' नाव दिलं होतं.
काही दिवसांपूर्वी आल्या होत्या चर्चेत
काही दिवसांपूर्वी डॉ. शीतल आमटे-करजगी या चर्चेत आल्या होत्या. त्यांनी 20 नोव्हेंबर 2020 ला फेसबुक लाईव्ह करून महारोगी सेवा समितीकडून केल्या जाणाऱ्या कामावर आणि विश्वस्तांवर काही आक्षेप घेतले होते.
या लाइव्हमध्ये त्यांनी कौस्तुभ आमटे, काका डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही काही आरोप केले होते. नंतर अर्ध्या तासाचं ते फेसबुकवरील लाईव्ह संभाषण डॉ. शीतल यांनी डिलिट केलं.
या फेसबुक लाइव्हनंतर आमटे कुटुंबीयांनी एक पत्रक काढून डॉ. शीतल आमटे यांच्या वक्तव्यांचा निषेध केला होता.
त्यांचं सर्व भाष्य हे तत्थ्यहीन असून कुणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून हे संयुक्त निवेदन जाहीर करत असल्याचं आमटे कुटुंबीयांनी सांगितलं. त्या नैराश्याविरोधात लढत होत्या असंही त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटलं होतं.
या निवेदनावर डॉ. शीतल आमटे-करजगी यांचे आई वडील आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन चालविणारे डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटे यांनी तसंच गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसामध्ये आदिवासींसाठी काम करणारे डॉ. प्रकाश - डॉ. मंदाकिनी आमटे यांनी सह्या केल्या होत्या.
या प्रकरणाबाबत त्यांनी खुलासा केला होता. "दिवंगत बाबा आमटे यांच्या कार्याला मी आणि माझे पती गौतम करजगी पुढे नेत आहोत. आम्ही एक निवेदन जारी करून आमची भूमिका लवकरच जाहीर करू. मी फेसबुक लाईव्ह करून माझी मतं मांडली होती तो व्हीडिओ मला डिलिट करण्यास भाग पाडलं," अशी प्रतिक्रिया डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली होती.
यापूर्वीही डॉ. शीतल आमटे यांच्याशी संबंधितच एक वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला होता.
आनंदवनातील वाद पोलिस ठाण्यात कसा पोहचला?
आनंदवनची नवी कार्यकारिणी आपल्या पद्धतीने काम करत असतानाच आनंदवन राहणाऱ्या दोघांनी नाराजी उघड केली आणि वादाची ठिगणी पडली. डॅा. विकास आमटे यांचे पीए आणि त्यांच्यासोबत राहणारे राजू सौसागडे यांनी नव्या कार्यकारिणीवर आक्षेप घेणं सुरु केलं.
माजी सरपंच असलेल्या आणि सध्या आनंदवनातील ग्रामपंचायतीचे सदस्य राजू सौसागडे यांनी या वादानंतर पोलिस ठाण्यात धाव घेतली.
आनंदवन आश्रमाच्या व्यवस्थापनाकडून आपल्याला हीन दर्जाची वागणूक मिळाल्याच पोलिस तक्रारीत सौसागडे यांनी सांगितले.
"नव्या व्यवस्थापनाने आपल्याकडून सर्व जबाबदाऱ्या काढून घेतल्या. ऑफिसात बोलावून अपमान केला," असं म्हणत सौसागडे यांनी दलित अत्याचारविरोधी कायद्यात (अॅट्रॉसिटी अॅक्ट) अन्वयेही तक्रार नव्या प्रशासनाविरोधात केली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)