विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील पाच जागांसाठी आज मतदान

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी आज (1 डिसेंबर) मतदान होत आहे.

विधानसभा निवडणुकीनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे, ज्यामध्ये महाविकास आघाडी आणि भाजप पहिल्यांदाच समोरासमोर लढत आहेत.

पुण्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात निवडणूक होत आहे. नागपूर आणि औरंगाबादमध्ये पदवीधर मतदारसंघात निवडणूक होत आहे. अमरावतीमध्ये शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक होत आहे.

सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.

महाविकास आघाडीने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी पाच उमेदवारांची यादी जाहीर केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन तर शिवसेनेचा एक उमेदवार रिंगणात उतरले होते.

निवडणुकीच्या रिंगणातील भाजपचे उमेदवार-

अमरावती शिक्षक मतदारसंघ - डॉ. नितीन धांडे

पुणे पदवीधर मतदारसंघ - संग्राम देशमुख

पुणे शिक्षक मतदारसंघ - जितेंद्र पवार (भाजप पुरस्कृत अपक्ष)

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ - शिरीष बोरनाळकर

नागपूर पदवीधर मतदारसंघ - संदीप जोशी

महाविकास आघाडीचे उमेदवार

अमरावती शिक्षक मतदारसंघ - श्रीकांत देशपांडे (शिवसेना)

पुणे पदवीधर मतदारसंघ - अरुण लाड (राष्ट्रवादी काँग्रेस)

पुणे शिक्षक मतदारसंघ - प्रा. जयंत आसगांवकर (काँग्रेस)

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ - सतीश चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस)

नागपूर पदवीधर मतदारसंघ - अभिजीत वंजारी (काँग्रेस)

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी कोण करतं मतदान?

या निवडणुकीसाठी मतदान करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी नोंदणी करावी लागते.

प्रत्येक निवडणुकीच्या वेळी नवीन नोंदणी असते आणि बॅलट म्हणजे मतपत्रिकेवर शिक्का मारूनच मतदान होतं. त्यामुळे मतदारसंघात हजर राहून मतदान करणं आवश्यक आहे.

मतदारासाठीचे निकष काय आहेत ते ही पाहूया...

1. मतदार भारतीय नागरिक असावा

2. मतदारसंघाचा रहिवासी असावा

3. निवडणुकीची अधिसूचना जाहीर होण्याच्या तारखेपूर्वी तीन वर्षं आधी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

4. विहित फॉर्म 18 भरावा लागेल

आपल्याकडे पदवीधर मतदारसंघाविषयी फारशी जागृती मतदारांमध्ये दिसत नाही. म्हणजे असं की, 2000 पासूनच्या मतदानाचा आकडा बघितला या निवडणुकीत सरासरी 20-25 हजार इतकंच मतदान होतं.

तुम्ही पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएट असाल तर या निवडणुकीसाठी नोंदणी केली आहे का? यंदाच्या नोंदणीची मुदत तर संपलीय. पण, इथून पुढे करायची असेल तर या लिंकवर क्लिक करा.

पण जर कमी लोक मतदान करत असतील, तर पदवीधर मतदार संघ निर्माण करण्याचं उद्दिष्ट सफल होतं का?

कमी मतदानाबरोबरच राज्यशास्त्राचे अभ्यासक अॅडव्होकेट सौरभ गणपत्ये यांना काळजी वाटते ती बदललेल्या निवडणूक प्रक्रियेची. "इतर निवडणुकांप्रमाणेच या निवडणुकीचाही बाजार झाला आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीला, मग तो नातेवाईक असो किंवा जवळचा कार्यकर्ता किंवा विधानसभेच्या निवडणुकीत नाराज असलेला नेता अशा लोकांचा पक्षाकडून पदवीधर मतदारसंघासाठी विचार होतो," गणपत्ये यांनी आपलं म्हणणं मांडलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)