You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उर्मिला मातोंडकर म्हणतात 'जय महाराष्ट्र', उद्या करणार शिवसेना प्रवेशाबाबत घोषणा
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच, त्यांनी उद्या (1 डिसेंबर) मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली आहे. याबाबतची माहिती देताना त्यांनी 'जय महाराष्ट्र' असं म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्या सेनाप्रवेशाच्या चर्चांना बळ मिळालं आहे.
"तुम्हा सगळ्यांच्या पाठिंब्याबाबत मनापासून आभार मानते. उद्या मुंबईतील जुहू इथं पत्रकार परिषद आयोजित केली आहे. कोरोनाबाबतची खबरदारी घेऊन आपण तिथे उपस्थित राहावं. जय महाराष्ट्र. धन्यवाद," असा संदेश उर्मिला मातोंडकर यांच्याकडून प्रसारित करण्यात आला आहे.
उर्मिला मातोंडकर यांची शिवसेनेसोबत चर्चा सुरू, मात्र आज प्रवेश नाही
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज (30 नोव्हेंबर) शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत अशी माहिती उर्मिला मातोंडकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
उर्मिला मातोंडकर यांना आम्ही टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून विचारले असता त्यांनी, "आज प्रवेश करणार नाहीये," असे स्पष्ट केले आहे.
पण शिवसेनेत प्रवेशाबाबत चर्चा सुरू असून अद्याप अंतिम काही ठरलेले नाही अशी माहिती उर्मिला मातोंडकर यांच्या निकटवर्तीयांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
त्यांचे निकटवर्तीय म्हणाले, "उर्मिला मातोंडकर आज शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत. पण शिवसेनेसोबत चर्चा सुरू आहे. प्रवेशासाठी अद्याप निश्चित दिवस ठरलेला नाही."
दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही उर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
"उर्मिला मातोंडकर बहुतेक मंगळवारी (1 डिसेंबर) प्रवेश करतील. त्या शिवसैनिक आहेत. आमच्या महिला आघाडीला त्यामुळे बळ मिळेल," अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
विधानसभेच्या राज्यपाल नियुक्त जागांसाठी कला क्षेत्रातून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याचे समजते. ही जागा शिवसेनेच्या कोट्यातून देण्यात आली असल्याने उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.
विधान परिषदेच्या 12 जागा रिक्त असून राज्यपाल नियुक्त जागांसाठी महाविकास आघाडी सरकारकडून उमेदवारांच्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे देण्यात आली आहे. पण अद्याप राज्यपालांनी यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही.
अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेत संघर्ष सुरू आहे. कंगना राणावत यांनी शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर आरोप केले होते.
यावेळी कंगना राणावत यांच्या भूमिकांना प्रत्युत्तर देण्यासाठी उर्मिला मातोंडकर यांनी पुढाकार घेतला होता.
उर्मिला मातोंडकर यांनी यापूर्वी काँग्रेसकडून 2019 मधील लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. यानंतर अवघ्या सहा महिन्यांत त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.
उर्मिला मातोंडकर यांनी लहान वयापासून हिंदी सिनेसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली होती. तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी हिंदी सिनेमांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केले आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)