You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
BBC 100 Women 2020 : यावर्षीच्या बीबीसी 100 महिलांच्या यादीत कोण कोण भारतीय आहेत?
आपापल्या क्षेत्रात साचेबद्ध परंपरांना छेद देत प्रेरणादायी काम करणाऱ्या बीबीसी 100 वुमनची यादी जाहीर झाली आहे.
अतिशय प्रतिष्ठेच्या अशा या मांदियाळीत चार भारतीय महिलांनी स्थान पटकावलं आहे. यापैकी काहीजणी प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत तर काही प्रसिद्धीपरान्मुख राहून नेटाने आपलं काम करत आहेत.
कोरोना संकटामुळे यंदाचं वर्ष अतिशय खडतर ठरतं आहे. अशा स्थितीत परिस्थितीला शरण न जाता जिद्दीने काम करणाऱ्या महिलांची नोंद बीबीसीने घेतली आहे. या यादीत शास्त्रज्ञ आहेत, सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील धुरीण आहेत, आरोग्यसेविका आहेत.
आपापल्या क्षेत्रात कार्यरत राहून समाजाच्या भल्यासाठी योगदान देणाऱ्या महिलांचा या यादीत अंतर्भाव करण्यात येतो. राजकारणी, वकील, लेखिका, क्रीडापटू, गायिका अशा विविध क्षेत्रातील महिला मान्यवर या यादीत झळकल्या आहेत.
या यादीत विराजमान चार भारतीय महिलांबद्दल जाणून घेऊया.
बिल्कीस बानो
82वर्षीय बानो नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलनाचा चेहरा ठरल्या. या विधेयकाविरोधात त्यांनी सहकाऱ्यांसह शांततामय मार्गाने आंदोलन केलं. राजधानी दिल्लीतील शाहीन बाग याठिकाणी प्रदीर्घ काळ चाललेल्या आंदोलनाचं त्या प्रतीक ठरल्या.
इसाइवानी
देशातल्या अग्रगण्य गायिका आहेत. तामिळनाडू राज्यात उत्तर चेन्नईत कामगारांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या गाना संगीताच्या त्या पाईक आहेत.
पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या या क्षेत्रात इसाइवानी यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केलं. वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेला त्यांनी कष्टाच्या जोरावर मोडून काढलं. इसाइवानी यांनी आखून दिलेल्या मार्गावर अनेक युवा गायिका चालत आहेत.
मानसी जोशी
मानसी जोशी ही भारतीय पॅराअथिलट आणि सध्याच्या घडीला पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन आहे. जून 2020 मध्ये जागतिक बॅडमिंटन संघटनेने SL3 प्रकारात मानसी द्वितीय स्थानी असल्याचं जाहीर झालं.
मानसीने इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं असून तिने स्वत:च्या उदाहरणातून बदल घडवून आणला आहे. देशात पॅराअथलिट्सकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी मानसी कार्यरत आहे.
रिद्धीमा पांडे
पर्यावरण कार्यकर्ती. हवामान बदलासंदर्भात भारत सरकारने कार्यवाही न केल्याने रिद्धिमाने नवव्या वर्षी याचिका दाखल केली होती. 2019 मध्ये अन्य 15 लहान मुलांसह रिद्धिमाने संयुक्त राष्ट्रातील पाच देशांविरोधात याचिका दाखल केली होती.
बीबीसी 100 महिलांच्या यादीत, पाकिस्तानची अभिनेत्री महिरा खान, अमेरिकेतील अभिनेत्री जेन फोंडा, फिनलंडच्या पंतप्रधान साना मरिन, मलेशियातील अभिनेत्री मिचेल येओह, बेलारुसमधील राजकारणी स्वितलाना तिशखानवोयुस्का यांचा समावेश आहे.
बीबीसी 100 महिलांची पूर्ण यादी इथे वाचायला मिळेल.
यंदा प्रथमच, यादीत शंभरावं स्थान रिक्त ठेवण्यात आलं आहे. कोरोनाचा प्रचंड फटका बसलेल्या या वर्षांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तुमच्या मनातील महिलेला तुम्ही या स्थानी पाहू शकता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)