You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हामिद अन्सारींनी राष्ट्रवादाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून गदारोळ का?
देशाचे माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांच्या काही वक्तव्यांवर उजव्या विचारधारेच्या गटात नाराजी दिसून येत आहे.
शुक्रवारी (20 नोव्हेंबर) झालेल्या एका व्हर्चुअल कार्यक्रमात बोलताना हामिद अन्सारी यांनी म्हटलं होतं की, कोरोनाचं संकट येण्यापूर्वीच भारतीय समाज अन्य दोन महामारींना बळी पडला होता- धार्मिक कट्टरता आणि आक्रमक राष्ट्रवाद.
याच अनुषंगानं अन्सारी यांनी पुढे म्हटलं होतं, "या दोन्हीच्या तुलनेत 'देशप्रेम' ही जास्त सकारात्मक गोष्ट आहे. कारण ती लष्करी आणि सांस्कृतिकदृष्ट्या संरक्षक आहे."
मात्र हे विधान एका ठराविक वर्गाला रुचलं नाही. त्यावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली.
"देशातील महत्त्वाची पदं भूषवलेल्या हामिद अन्सारी यांचे राष्ट्रवादाबद्दलचे विचार अशोभनीय आहेत."
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश गौरव गोयल यांनी ट्विटरवर लिहिलं, "काँग्रेसचं वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे. पक्षपात करणाऱ्या या व्यक्तिला काँग्रेस पक्षानं देशाचे उपराष्ट्रपती बनवलं होतं."
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी अन्सारी यांच्या वक्तव्यावर म्हटलं, "हिंदुत्व कधीच कट्टरपंथी नव्हतं. हिंदुत्व नेहमीच सहिष्णु होतं. हिंदुत्व या देशाची प्राचीन जीवनशैली आहे. हिंदूंनी कधीच कोणत्याही देशावर हल्ला केला नाहीये.
काँग्रेसनं अन्सारी यांचं विधान योग्य असल्याचं म्हटलं. पक्षाचे नेते तारिक अन्वर यांनी म्हटलं की, भाजपचा अन्सारी यांच्या विधानावर आक्षेप आहे कारण त्यांचं वक्तव्यं थेट भाजप आणि संघ परिवाराच्या अजेंड्यावर शरसंधान करत आहे.
हामिद अन्सारी यांनी कधी केलं होतं वक्तव्य?
माजी उपराष्ट्रपतींनी हे वक्तव्य काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या 'द बॅटल ऑफ बिलाँगिंग' या पुस्तकाच्या डिजिटल प्रकाशन सोहळ्यात केलं होतं.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. त्यांनी हेदेखील म्हटलं की, देशाला 'आपण आणि ते' अशा काल्पनिक आधारांवर विभाजित करणाऱ्या विचारधारांमुळे देशाला धोका निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे.
अन्सारी यांनी म्हटलं, "राष्ट्रवादाच्या धोक्याबद्दल अनेकवेळा लिहिलं गेलं आहे. काहीवेळा याला वैचारिक विषही संबोधलं गेलं आहे, ज्यामध्ये व्यक्तिगत अधिकारांचं हस्तांतरण करताना कोणताही संकोच केला जात नाही."
हामिद अन्सारी यांनी या कार्यक्रमात हेदेखील म्हटलं होतं की, चार वर्षांच्या कमी कालावधीत भारतानं उदार राष्ट्रवादाच्या मूलभूत दृष्टिकोनापासून सांस्कृतिक राष्ट्रवादासारख्या नवीन राजकीय संकल्पनेपर्यंतचा प्रवास केला आहे. ही भावना आता सार्वजनिक क्षेत्रात अधिकाधिक रुजत आहे.
पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात झालेल्या चर्चेत जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनीही सहभाग घेतला होता.
सध्याचं सरकार ज्यापद्धतीनं देशाकडे पाहत आहे, तो दृष्टिकोन आपण कधीच स्वीकारू शकत नसल्याचंही म्हटलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)