भारती सिंह आणि हर्षला 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (एनसीबी) ड्रग्जप्रकरणी कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

त्यांच्या जामीन अर्जावर सोमवारी (23 नोव्हेंबर) सुनावणी होईल.

एनसीबीनं हर्ष आणि भारतीला याप्रकरणी अटक केली होती. एनसीबीने काल (21 नोव्हेंबर) भारती सिंहच्या प्रॉडक्शन हाऊस आणि घरावर छापा टाकला होता आणि त्यात 86.5 ग्रॅम गांजा सापडला.

तसंच, भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया या दोघांनीही गांजा सेवन करत असल्याची कबुली दिलीय, असं ANI ने वृत्तात म्हटलंय.

21 नोव्हेंबरला काय झाल?

मुंबईमधील बीबीसीच्या सहयोगी पत्रकार मधु पाल यांनी सांगितलं की, दोन्ही कलाकारांना मुंबईतील एनसीबीच्या झोनल ऑफिसमध्ये आणण्यात आलं होतं.

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की, भारती आणि तिच्या पतीला एनसीबीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. आम्हाला त्यांच्या घरी काही अंमली पदार्थ मिळाले आहेत, ज्याबद्दल त्यांच्याकडे चौकशी करण्यात येईल.

चौकशीदरम्यान भारती आणि हर्ष दोघांनीही गांजाचं सेवन केल्याचं मान्य केलं असल्याची माहिती एनसीबीकडून देण्यात आली आहे.

भारती आणि हर्षच्या घरी आणि ऑफिसमध्ये टाकलेल्या छाप्यात 86.5 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आल्याचीही माहिती एनसीबीनं दिली.

मुंबईमध्ये ड्रग्स प्रकरणी एनसीबीकडून सातत्यानं कारवाई होताना दिसत आहे.

मधु पाल यांनी सांगितलं, "काही दिवसांपूर्वी अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या घरी एनसीबीच्या टीमनं छापा टाकला होता. सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी ड्रग्जचा उल्लेख झाल्यानंतर एनसीबीनं अनेक पेडलर्सला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर अनेक नावं समोर येत गेली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)