You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बीड अॅसिड हल्ला : ‘एखादं आयुष्य बरबाद करायची किंमत फक्त 30 रूपये आहे’
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
"30 रूपयांची बाटली मिळते कुठल्याही कोपऱ्यावरच्या दुकानात. कोणी काहीही विचारत नाही. त्या 30 रुपयांनी माझ्यासारख्या कित्येकींचं आयुष्य बरबाद केलेलं आहे," स्वतः अॅसिड हल्ल्याच्या बळी ठरलेल्या दौलतबी खान मला फोनवर सांगत होत्या.
एका मुलीवर पुन्हा अॅसिड टाकलं गेलंय आणि तिची मृत्यूशी चाललेली झुंज अयशस्वी ठरलीये याची तडफड त्यांच्या आवाजात जाणवत होती.
बीडमध्ये ऐन दिवाळीत एका मुलीवर झालेला अॅसिड हल्ला आणि त्यानंतर तिचा झालेल्या दुःखद मृत्यू यामुळे महाराष्ट्र हळहळत आहे.
22-वर्षाची मुलगी आणि तिचा मित्र दोघे पुण्याहून परतत असताना ही घटना घडली आहे. याच मित्राने कथितरित्या आधी तिच्यावर अॅसिड टाकले आणि त्यानंतर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे.
या घटनेत पीडित मुलगी 48 टक्के भाजली होती. आरोपी तिला तिथेच टाकून फरार झाला असल्याचंही म्हटलं जातंय. ही मुलगी त्याच परिसरात 12 तास तडफडत पडली होती, अशी धक्कादायक माहिती समोर येतेय.
बीडचे पोलीस उपअधीक्षक भास्कर सावंत यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, "ही तरूणी भाजलेल्या अवस्थेत मांजरसुभा -केज या रस्त्यावरील येळंबघाट गावाजवळच्या खाणीत आढळून आली. पोलिसांनी तिला पुढच्या उपचारांसाठी बीड शासकीय रूग्णालयात हलवलं पण सोमवार, 16 नोव्हेंबरला सकाळी या मुलीचा मृत्यू झाला."
तिच्या प्रियकराने रात्री ती झोपेत असताना तिचा गळा दाबला आणि तिच्यावर आधी अॅसिड टाकलं आणि मग पेट्रोल टाकून पेटवून दिलं अशीही माहिती पोलिसांनी दिली.
आरोपी मुलीच्याच गावचा राहणारा आहे. मुलीचे वडील दिगंबर हणमंत यांनी आरोपीला कठोर शासन व्हावे अशी मागणी केली आहे.
याप्रकरणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्राला या घटना नवीन नाहीत असं म्हटलं आहे.
मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. फक्त बैठका न घेता माहिती घेऊन एक स्पेशल फोर्स प्रत्येक जिल्ह्यात विशिष्ट घटना हाताळण्यासाठी लावली पाहिजे. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोर शिक्षा दिली जावी अशीही मागणी त्यांनी केली.
दरम्यान, आरोपीला अटक झाली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही केस फास्टट्रॅक न्यायालयात चालवली जाईल, असंही आश्वासन दिलं आहे.
अशा प्रकारचे अॅसिड हल्ले होण्याची महाराष्ट्रात आणि देशातही ही पहिलीच वेळ नाहीये. पण मग महत्त्वाचा प्रश्न हा आहे की याप्रकारचे अॅसिड हल्ले करण्यासाठी सहजासहजी अॅसिड मिळतं कुठून?
दुकानात सर्रास अॅसिड विकायला सुप्रीम कोर्टाने 2013 साली बंदी घातली. वाढत्या अॅसिड हल्ल्यांना पायबंद घालण्यासाठी हा निर्णय घेतला होता. कोर्टाने म्हटलं होतं की कोणत्याही दुकानात अॅसिड विकता येणार नाही, फक्त काही ठराविक दुकानांना अॅसिड विकण्याची परवानगी असेल. "दुकानदारांनी ग्राहकांचे ओळखपत्र तपासून मगच त्यांना अॅसिड विकावं," असंही कोर्टाने म्हटलं होतं.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार अॅसिड विकणारा आणि विकत घेणार दोघांकडे परवाना असणं आवश्यक आहे. ज्या दुकानांमध्ये अॅसिड विकलं जातं तिथे खरेदी-विक्रीचं रेकॉर्ड, कोणी अॅसिड खरेदी केलं, कधी आणि का याची सगळी नोदं असणं बंधनकारक आहे.
पण या निर्देशांची खुलेआम पायमल्ली होताना दिसते. दौलतबी खान स्वतः अॅसिड हल्ला पीडित आहेत आणि आता मुंबईत अॅसिड हल्ला पीडितांची मदत करायला अॅसिड सर्व्हायवर्स साहास फाउंडेशन ही संस्था चालवतात. त्या म्हणतात, "मला एक ठिकाण दाखवा जिथे अॅसिड विकत घेताना दुकानदार ओळखपत्र विचारतो."
यात दुकानदारांपेक्षा नियमांची अमलबजावणी करणाऱ्या सरकारच्या इच्छाशक्तीचा मुद्दा आहे हे त्या नमूद करतात.
'आयुष्य बरबाद करायची किंमत 30 रूपये'
"मी परवा 8 नोव्हेंबरला अॅसिडची बाटली दुकानातून आणली. माझा जळालेला चेहरा पाहूनही त्या दुकानदाराला विचारावसं वाटलं नाही की तुम्ही अॅसिड का नेताय? अशा असंख्य बहिणी या अॅसिडच्या सर्वनाशाला बळी पडत असतात. तुमच्या शेजारच्या किराणा मालाच्या दुकानात विचारा, अॅसिडची बाटली 30 रुपयांना मिळते. एखादं आयुष्य बरबाद करायची किंमत फक्त 30 रूपये आहे," दौलतबी कळवळून सांगतात.
कधी कधी दुकानात मिळणाऱ्या अॅसिडच्या बाटल्यांवर 'डायल्युट करून (पाण्यात विरघळवून) वापरा' अशी सूचना लिहिलेली असते. काही वेळा बाटल्यांवर टॉयलेट क्लीनर असं लिहिलेलं असतं. आजही भारतात घराघरात शौचालयं साफ करायला सर्रास अॅसिडचा वापर होतो. त्यामुळेच वापरकर्त्यांचे हात भाजू नयेत म्हणून अशी सूचना लिहिलेली असते.
"एक थेंब जरी पडला तरी संपूर्ण त्वचा जळून जाते. मग अशा गोष्टी विकताना सरकारने नियमन करायला नको का?" दौलतबी विचारतात.
सर्वाधिक अॅसिड हल्ले महिलांवरच
अॅसिड हल्ले भारतीय दंड संहितेच्या कलम 326A खाली नोंदवले जातात. या गुन्ह्यांना कमीत कमी 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे.
पण अशा प्रकारच्या हल्ल्यांना महिलाच अधिक बळी पडतात. NCRB च्या आकडेवारीनुसार 2018 साली देशात 228 अॅसिड हल्ले झाले होते, त्यापैकी 131 म्हणजेच जवळपास 57 टक्के हल्ले महिलांवर झाले होते. 2013 साली सुप्रीम कोर्टाने अॅसिडच्या सर्रास विक्रीवर बंदी घातली असली तर देशातले असे हल्ले थांबलेले नाहीत.
2014 ते 2018 या काळात देशात जवळपास 1483 अॅसिड हल्ले झालेले आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)