You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बीड अॅसिड हल्ला : फक्त बैठका नको, स्पेशल फोर्स द्या - पंकजा मुंडे #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.
1.अॅसिड हल्ले टाळण्यासाठी स्पेशल फोर्स हवी -पंकजा मुंडे
बीडमध्ये तरुणीवर असिड हल्ला होऊन नंतर जिवंत जाळण्याची घटना समोर आली आहे. उपचारादरम्यान त्या तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. गृहमंत्र्यांनी यात तात्काळ लक्ष घातलं पाहिजे अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.
महाराष्ट्राला या घटना नवीन नाहीत. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. फक्त बैठका न घेता माहिती घेऊन एक स्पेशल फोर्स प्रत्येक जिल्ह्यात विशिष्ट घटना हाताळण्यासाठी लावली पाहिजे. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोर शिक्षा दिली जावी असं पंकजा म्हणाल्या. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.
दिवाळीच्या दिवशी असं काही बोलावं लागणं दुर्देवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि बीडच्या पोलीस महासंचालकांशी बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दिवाळासाठी गावी परतणाऱ्या तरुणीवर येळंबघाट इथे घडली होती. गंभीररीत्या भाजलेल्या तरुणीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. याप्रकरणातील आरोपी आणि मयत तरुणी पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, अशी माहिती समोर आली आहे.
2. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती-रवी राणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात हुकूमशाही चालवली आहे. आणीबाणीच्या काळाची आठवण येते. शेतकऱ्यांसाठी आवाज उचलला म्हणून तीन दिवस जेलमध्ये ठेवलं. शेतकऱ्यांनाही अटक केली. आता मुंबईत जाण्यापासून रोखलं. अशाप्रकारच्या हुकूमशाहीमुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. टीव्ही9ने ही बातमी दिली आहे.
रवी आणि नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र राणा दांपत्य मुंबईला रवाना होण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. मुख्यमंत्री शेतकऱ्यांचा आणि लोकप्रतिनिधींचा आवाज दडपत असल्याचा आरोप त्यांनी केला.
"हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालं. शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली. त्याबद्दल मी आवाज उठवला. लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना आलेलं वाढीव वीजबिल कमी करावं, यासाठी कुणी आवाज उठवला तर त्यांना जेलमध्ये टाकाल," असा सवाला रवी राणा यांनी विचाराल आहे.
3. रावणासारखी भूमिका घेणाऱ्या राम कदम यांचं नामांतर केलं पाहिजे- नीलम गोऱ्हे
"रावणासारखी भूमिका घेणाऱ्या राम कदम यांचं नाव बदललं पाहिजे. मुलीचं अपहरण करण्यासारखी रावणाची भाषा आणि रावणासारखी भूमिका घेणारे वेगवेगळे सल्ले देत राहतात यावर जास्त भाष्य करण्याची इच्छा नाही. मला वाटतं त्यांचा मार्ग चुकला आहे आणि ते अशा पद्धतीने सातत्याने वर्तन करत आहेत," असं शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
"भाजपचे जे लोक सतत टीका करत आहेत त्यांच्या पाठीमागे असणारी माणसं कधी त्यांची पाठ सोडून शिवसेनेत किंवा अन्य पक्षात जातील हे कळणारही नाही. खरं सांगायचं तर एखाद्या अपघातानंतर जसा मानसिक धक्का बसतो तसा यांना बसला आहे. लांब कशाला जायचं, चंद्रकात पाटील यांनी कोथरुडमधून पुन्हा उभं राहून दाखवावं," असं आव्हानच नीलम गोऱ्हे यांनी दिलं आहे.
4. आजपासून धार्मिकस्थळं उघडणार
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे आजपासून राज्यातील मंदिरं, मशिदी, चर्च यांच्यासह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळं उघडणार आहेत.
प्रार्थनास्थळांमध्ये जाताना मास्क परिधान करणं अनिवार्य आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळणे, गर्दी टाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत.
भाजप, मनसे, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी यांसारखे पक्ष गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं मंदिरं आणि इतर धार्मिक स्थळं उघडण्यासाठी आंदोलनं करत होते. काही मंदिरांच्या प्रशासनांनी सरकारला आवाहनं केली, तर काहींनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांची सुरक्षा, आरोग्य यामुळे प्रार्थनास्थळं अनलॉक प्रक्रिया सुरू झाली तरी बंद ठेवण्यात आली होती. मात्र यामुळे प्रार्थनास्थळांवर अवलंबून रोजगार असलेल्या माणसांचं नुकसान होत असल्याचा मुद्दा विरोधकांनी मांडला होता.
5. पुण्यात तरुणीवर बलात्कार
पुण्यातील हडपसर भागात राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. घरी सोडण्याच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली. अभय बनसोडे असं आरोपीचं नाव आहे.
पीडित तरुणी आणि आरोपी एकाच प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करतात. 13 तारखेला दुपारी आरोपी तरुण घरी सोडतो सांगत पीडित तरुणीला सोबत घेऊन निघाला. मात्र आरोपी तुरुणीला एका लॉजवर घेऊन गेला आणि बलात्कार केला. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)