उद्धव ठाकरे : आजपासून मंदिरात जायचं असेल तर 'या' नियमांचे पालन करा

मंदिरं, प्रार्थनास्थळं, कोरोना, महाराष्ट्र

फोटो स्रोत, Frédéric Soltan

फोटो कॅप्शन, प्रार्थनास्थळं आता खुली करण्यात येणार आहेत.

दिवाळी पाडवा म्हणजेच आजपासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळं उघडण्यात आली आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच याबाबतची घोषणा केली होती. त्यानुसार काही मदिरांमध्ये ऑनलाईन दर्शनाची सुविधासुद्धा करण्यात आली आहे.

भाजप, मनसे, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी यांसारखे पक्ष गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं मंदिरं आणि इतर धार्मिक स्थळं उघडण्यासाठी आंदोलनं करत होते. काही मंदिरांच्या प्रशासनांनी सरकारला आवाहनं केली, तर काहींनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांची सुरक्षा, आरोग्य यामुळे प्रार्थनास्थळं अनलॉक प्रक्रिया सुरू झाली तरी बंद ठेवण्यात आली होती. मात्र यामुळे प्रार्थनास्थळांवर अवलंबून रोजगार असलेल्या माणसांचं नुकसान होत असल्याचा मुद्दा विरोधकांनी मांडला होता.

यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री म्हणतात की, "दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही.

हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच".

हा फक्त सरकारी आदेश नसून 'श्रींची इच्छा

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "या काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने 'देव' पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा.

मंदिरं, प्रार्थनास्थळं, कोरोना, महाराष्ट्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

"हा फक्त सरकारी आदेश नसून 'श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील!

सरकारने दिलेल्या सूचना-

  • धार्मिक स्थळांच्या गेटवर हात स्वच्छ करण्यासाठी हँड सॅनिटायझर आणि थर्मल स्कॅनर आवश्यक
  • लक्षणं नसलेल्या आणि मास्क घातलेल्यांनाच प्रवेश दिला जावा
  • कोरोनाबाबत माहिती देणारी चित्रफित किंवा माहिती फलक धार्मिकस्थळी लावण्यात यावे
  • एकावेळी किती भाविकांना आत सोडण्यात यावं याबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा
  • बूट, चप्पल शक्यतो गाडीमध्येच ठेवण्यात याव्यात. किंवा स्टॅंडमध्ये प्रत्येक स्लॉटमध्ये वेगळ्या ठेवण्यात याव्यात
  • सोशल डिस्टंसिंगच पालन करून भाविकांच्या गर्दीच व्यवस्थापन करावं
  • धार्मिक स्थळी सोशल डिस्टंसिंगच पालन करण्यासाठी जागा निश्चित करण्यात यावी
  • भाविकांमध्ये सहा फूटाचं अंतर ठेवावं
  • देवाची मूर्ती किंवा पुतळ्याला स्पर्श करता येणार नाही
  • लोकांची गर्दी होईल असे कार्यक्रम करू नयेत
  • संसर्ग पसरण्याची भीती असल्याने एकत्र येऊन गाणी, भजन म्हणू नयेत
  • धार्मिक स्थळी प्रसाद वाटप किंवा पवित्र पाणी भाविकांच्या अंगावर शिंपडलं जाऊ नये
  • धार्मिक स्थळाची वेळोवेळी स्वच्छता करण्यात यावी
  • लक्षणं असलेला एखादा व्यक्ती आढळल्यास- त्याला तातडीने वेगळ्या खोलीत ठेवावं.
  • मास्क देण्यात यावा. डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करावी. तातडीने जवळच्या रुग्णालयाला माहिती द्यावी.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)