प्रकाश आंबेडकर: कोरोना काळात मंदिरं उघडण्यासाठी विरोधक इतके आक्रमक का?

फोटो स्रोत, Twitter
- Author, नामदेव अंजना
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन गेल्या महिन्यांपासून टप्प्या-टप्प्यानं शिथील करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून परवा (31 ऑगस्ट) ई-पास रद्द करण्यासह आणखी काही निर्णय घेण्यात आले. मात्र, मंदिरं किंवा इतर धार्मिक स्थळं उघडण्याबाबत कुठलाच निर्णय जाहीर केला नाही.
भाजप, मनसे, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी यांसारखे पक्ष गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं मंदिरं आणि इतर धार्मिक स्थळं उघडण्यासाठी आंदोलनं करताना दिसत आहे. काही मंदिरांच्या प्रशासनांनी सरकारला आवाहनं केली, तर काहींनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्या.
राज्यातील शहरी भागासह आता ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. रोज 10 हजारांहून अधिकच्या संख्येनं रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळता इतर गोष्टी उघडण्याला राज्य सरकार प्राधान्य देत नाही. असं असताना महाराष्ट्रातील विरोधक मात्र धार्मिक स्थळं उघडण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहेत.

फोटो स्रोत, Twitter/@cbawankule
मंदिर, मशीद किंवा इतर धार्मिक स्थळं उघडण्यासाठी विरोधक इतके आक्रमक का झाले आहेत? यामागे काही राजकारण आहे का? या प्रश्नांची उत्तरं या बातमीतून आपण शोधण्याचा प्रयत्न करू. तत्पूर्वी, गेल्या आठवड्याभरात धार्मिक स्थळं उघडण्यासाठी कुठल्या पक्षानं कुठली आंदोलनं केली, यावर एक नजर टाकूया.
भाजपचं 'घंटानाद', तर 'वंचित' थेट विठ्ठल मंदिरात दाखल
महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं 29 ऑगस्ट रोजी 'दार उघड उद्धवा, दार उघड' असं म्हणत राज्यभर 'घंटानाद' केला.
नगरमध्ये शिर्डीच्या साईमंदिराबाहेर माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, त्यांचे पुत्र खासदार सुजय विखे, नागपुरात माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे बहुतांश वरिष्ठ नेते 'घंटानाद' आंदोलनांमध्ये सहभागी झाले.

फोटो स्रोत, Twitter/@cbawankule
वंचित बहुजन आघाडीनं तर थेट पंढपुरात जाऊन विठ्ठल-रुक्मिणी मंदिर उघडण्याची मागणी केली. पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी स्वत: या आंदोलनाचं नेतृत्व केलं.
राज्य सरकारनं धार्मिक स्थळं उघडण्यासाठी दहा दिवसांचा अवधी मागितला असून, नियमावली जाहीर केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आणि त्यांनी आंदोलन मागे घेतलं.

फोटो स्रोत, Twitter
याही आधी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि मंदिर खुली करण्यासाठी राज्य सरकारला विनंती करण्याची मागणी केली. त्यानंतर राज्य ठाकरे यांनी या भेटीचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करत म्हटलं, "मॉल उघडले तर मंदिर का नाहीत?"
या सर्व आंदोलनांनी काहीसं वादाचं रूप घेतलं ते औरंगाबादमध्ये. मंदिर उघडण्यावरून औरंगाबादमधील आजी-माजी खासदार आमने-सामने आले आहेत. मंदिर उघडणारे तुम्ही कोण? असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी इम्तियाज जलील यांना केला, तर हिंदू समाजातील लोकच माझ्याकडे मागणी घेऊन आल्याचं उत्तर जलील यांनी दिलं. औरंगाबादमध्ये काल (1 ऑगस्ट) दिवसभर मंदिर उघडण्याच्या मागणीवरून खैरे आणि जलील यांच्यात जुंपली.

फोटो स्रोत, Twitter
महाविकास आघाडीतील सहभागी पक्ष वगळता राज्यातील बहुतेक सर्वच विरोधी पक्ष मंदिर किंवा इतर धार्मिक स्थळं उघडण्यासाठी आंदोलनं करू लागले आहेत.
राज्यातील कोरोनाची स्थिती गंभीर असताना आणि पर्यायानं गर्दीची ठिकाणं उघडण्याबाबत सर्वचजण साशंक असताना विरोधी पक्ष इतके आक्रमक का झालेत, याबाबत बीबीसी मराठीनं राजकीय विश्लेषक, सत्ताधारी-विरोधी अशा दोन्ही पक्षांतील नेते आणि मंदिर संस्थांवर कार्यरत राहिलेल्या व्यक्ती यांच्याशी बोलून मतं जाणून घेतली.
मंदिरं उघडण्यासाठी विरोधक इतके आक्रमक का झालेत?
ग्रामीण भागात कोरोना खूप मोठ्या प्रमाणात पसरत आहे. औरंगाबादमध्येही काही वेगळी स्थिती नाही. अशी भीतीदायक स्थिती असताना मंदिर प्रवेशाच्या गोष्टी सुरू आहेत. मात्र, हे पूर्णपणे राजकीय आहेत. औरंगाबादपुरते बोलायचं झाल्यास, आगामी औरंगाबाद महापालिका निवडणुकीला डोळ्यांसमोर ठेवून सुरू आहे. याला पोरखेळ या शब्दाशिवाय दुसरा शब्द नाही.
औरंगाबादमध्ये कम्युनिटी स्प्रेड झाला आहे. प्रशासनानं तसं सांगितलं आहे. मग अशा स्थितीत मंदिरं सुरू करा, हा युक्तिवादच कसा केला जाऊ शकतो? असा प्रश्न संजीव उन्हाळे विचारतात.

"मंदिर श्रद्धेचा विषय आहे. तिथे सॅनिटायझर कुणाच्या हातावर फवारलंत, तर काय होईल? त्या सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असतं. मग उद्या कुणी म्हणालं, मंदिरात जाण्याआधी अल्कोहोल का शिंपडलंत, तर काय करणार आहात?" असाही प्रश्न उन्हाळे विचरतात.
लोकांचे आर्थिक समस्यांचे मुद्दे उचलण्यात भाजपला अपयश आल्यानं भावनिक मुद्द्यांना हात घालत असल्याचंही उन्हाळे म्हणतात.
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय असो किंवा इतर सर्वच भक्तिसंप्रदायांचा विशेष अभ्यास असणारे वरिष्ठ पत्रकार डॉ. श्रीरंग गायकवाड यांच्याशीही बीबीसी मराठीनं संवाद साधला.
डॉ. श्रीरंग गायकवाड म्हणतात, "मंदिरं उघडणं हा लोकांचा मुद्दा नाहीय. आता एवढी मोठी आषाढी वारी झाली, लोक स्वत:हून कोरोनाचं संकट पाहता गेले नाहीत. भाविकांनी स्वत:हून समजून घेतलं आहे. त्यामुळे अशा प्रांतात राजकारण आणण्याची गरज नव्हती, पण दुर्दैवानं ते राजकारण केलं जातंय."

"राजकारणासाठी बेरोजगारीचा मुद्दा आहे, राज्यांना जीएसटी मिळत नाहीय, पीएम-सीएम फंडाचा मुद्दा आहे, आर्थिक मंदी हे मुद्दे आहेत. कोरोनाच्या काळात मंदिरं उघडणं हा मुद्दा कसा असू शकतो?" असा सवाल डॉ. गायकवाड उपस्थित करतात.
"मंदिरं उघडल्यास रांगाच्या रांगा लागतील. मुंबईतील दादर फुल मार्केटची दृश्य तुम्ही पाहिलेच असेल. लोक साध्या दुकानावर जाता तीन फुटांचं अंतर राखत नाहीत. मंदिरात तर मोठी चिंतेची स्थिती निर्माण होईल," अशी भीतीही डॉ. श्रीरंग गायकवाड व्यक्त करतात.
आम्ही सक्षम, मंदिरं उघडा - साई संस्थानचे अध्यक्ष
अहमदनगरमधील शिर्डी साई संस्थान राज्यातील मोठ्या देवस्थानांपैकी एक आहे. या संस्थानचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते सुरेश हावरे यांच्याशी बीबीसी मराठीनं बातचित केली.
सुरेश हावरे यांच्या मते, "शिर्डी साई संस्थानची दोन मोठी हॉस्पिटल आहेत. एक सुपरस्पेशालिटी, दुसरं कोरोनासाठी खास आहे. मास्क, सॅनिटायझेशन इत्यादी गोष्टी पाहिल्या आहेत. सरकारनं नियमावली द्यावी. आम्ही नियमांचं पालन करू. जिथे पालन केलं जाणार नाही, तिथे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
मात्र, शिर्डी साई संस्थान आर्थिकदृष्ट्याही सक्षम आहे, पण लहान-सहान मंदिरांचं काय? तिथे कशी व्यवस्था करणं शक्य आहे, असा हावरे यांना विचारला असता, ते म्हणाले, "मला वाटत नाही कुणाला काही अडचण येईल. काही अडचण आल्यास महापालिका, नगरपालिका, सरकारचा आधार घेऊ शकतात. मॉल, दारूची दुकानं सुरू केलीत, मग मंदिरांना बंद का ठेवता?"
मंदिरं मानसिक स्वास्थ ठेवणारी यंत्रणा असल्यचं सुरेश हावरे म्हणतात. हवं तर प्रायोगिक तत्वावर मंदिरं सुरू करा, असंही हावरे म्हणतात.
'मंदिरं बंद असल्यानं अनेकांवर उपासमारीची वेळ'
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 हजार 42 मंदिरे येतात. या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की, "मंदिरं बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुळातच मंदिरात जाताना भक्त शुचिर्भूत होऊन जातात. स्वच्छतेची काळजी घेतली जाते. पण इतर गोष्टी खुल्या होतात मग देवालाच बंदिस्त का करावे असा सूर उमटतो आहे. त्यामुळे राज्य सरकारने जर मंदिरं उघडण्याची परवानगी दिली तर नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल."

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

सरकारने मंदिरं उघडण्याचा आदेश दिला तरी भक्तांच्या सुरक्षेचा प्रश्न मोठा आहे. त्याबाबतचे नियोजन करणे गरजेचे आहे. यावर विचारलं असता जाधव यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस आल्यानंतर देखील काही काळ अंबाबाई मंदिर दर्शनासाठी खुले होते. त्यावेळी मंदिरात येणाऱ्या लोकांना सॅनिटायझर पुरवण्यात आले होते.
"आता जर सरकारने आदेश दिला तर नियम आणि अटी घालून द्याव्यात. त्यानुसार मास्क, सॅनिटायझर,थर्मल टेस्टिंग अशा गोष्टींचा वापर करण्यात येईल. थोड्या प्रमाणात अंतर ठेवत भक्तांना देवाचं दर्शन घेण्यासाठी नियोजन करण्यात येईल. लवकरच याबाबत बैठक होणार असून सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर सविस्तरपणे नियोजन ठरवण्यात येईल," असंही महेश जाधव यांनी सांगितलं.
मंदिर समितीच्या विश्वस्त, अध्यक्षांचे असे एकीकडे म्हणणे असताना, राज्य सरकार अजूनही सावधानता बाळगत आहे. महाराष्ट्राच्या पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याशी बीबीसी मराठीनं यासंदर्भात बातचीत केली.
आरोग्य व्यवस्थेची काळजी घेणं आवश्यक - पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य विचार करूनच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंदिरं उघडण्याबाबत नियमावली तयार करतील, असं आदिती तटकरे म्हणाल्या.
त्याहीपुढे आदिती तटकरे म्हणतात, "धार्मिक स्थळं असो किंवा इतर पर्यटनस्थळं असो, कोरोनासारख्या संकटकाळात ती उघडण्यासाठी खूप विचार करावा लागेल. कारण एकदा हे सुरू केल्यानंतर पुन्हा बंद करता येणार नाहीत. त्यासाठी आरोग्य व्यवस्थेची सर्व काळजी घेणं महत्त्वाचं असतं."

फोटो स्रोत, Twitter/@sureshhaware
कोरोनाची संख्या राज्यासह देशात वेगानं वाढत असताना, इतर राज्यात धार्मिक स्थळं किंवा पर्यटन स्थळं उघडण्यात येत आहेत, हे सुद्धा राज्य सरकारकडून पाहिले जाईल, असंही आदिती तटकरे म्हणाल्या.
मोठी मंदिरं असलेल्या जिल्ह्यात कोरोनाची काय स्थिती?
महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 8 लाख 8 हजार 306 वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत 24 हजार 903 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी पाहता महाराष्ट्रातील कोरोना प्रादुर्भावाची गंभीर स्थिती लक्षात येते.
शिर्डीचं साई मंदिर (अहमदनगर), विठ्ठल-रुक्मिणी मंदिर (सोलापूर), महालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर), शेगाव येथील गजानन महाराज मंदिर (बुलडाणा) या महाराष्ट्रातील प्रमुख मंदिर देवस्थानांचा जरी विचार केला, तरी त्या त्या जिल्ह्यातही आता रुग्णसंख्या लक्षणीय आहे.
- अहमदनगर - 21091 (मृत्यू - 298)
- सोलापूर - 20033 (मृत्यू - 778)
- कोल्हापूर - 22756 (मृत्यू - 662)
- बुलडाणा - 3525 (मृत्यू - 74)
औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे मंदिर, मशिदी उघडण्यासाठी आक्रमक झालेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








