मेधा कुलकर्णी: 'कोथरूड मतदारसंघ सोडताना मला विधान परिषदेचं आश्वासन देण्यात आलं होतं'

मेधा कुलकर्णी

फोटो स्रोत, Nitin Nagarkar

फोटो कॅप्शन, मेधा कुलकर्णी
    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बीबीसी मराठीसाठी

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही डावलल्या गेलेल्या कोथरूडच्या माजी आमदार आणि भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांनी आपण पक्षावर नाराज नाही. पण सक्रिय व्यक्तीला कामाविना ठेवणं, योग्य नाही असं म्हटलं आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना पुन्हा एकदा डावलण्यात आलं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पुण्यातल्या कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी नाकारून ती चंद्रकांत पाटील यांना देण्यात आली होती. त्यावेळी आपल्याला विधानपरिषदेचं आश्वासन देण्यात आलं होतं, असं मेधा कुलकर्णी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. मात्र, हे आश्वासनही पूर्ण करण्यात आलं नाही. पुणे पदवीधर मतदारसंघातून सांगलीचे संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली.

बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "मला विधान परिषदेचं आश्वासन दिलं होतं. आत्ताचे कोथरूड मतदारसंघाचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष (चंद्रकांत पाटील) यांच्यासाठी मी ही जागा मोकळी केली. तसं म्हणण्यापेक्षा पक्षाचा आदेशच असतो तो. ते करणं माझं कर्तव्यच असतं. त्यावेळी मला सांगण्यात आलं होतं की तुम्हाला विधान परिषदेवर घेतलं जाईल. माझी सक्रियता, पक्षावरची निष्ठा आणि त्याचा पक्षाला होणारा उपयोग याचा पक्ष नक्कीच विचार करेल, याची मला खात्री वाटते."

मेधा कुलकर्णी

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, मेधा कुलकर्णी

भाजपचा बालेकिल्ला आणि सुरक्षित मतदारसंघ म्हणून कोथरूड मतदारसंघातून विधानसभेवेळी मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. तेव्हापासून त्या नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, आपण पक्षावर नाराज नाही आणि या पक्षावरून जीव ओवाळून टाकेन, असंही त्या बीबीसीशी बोलताना म्हणाल्या.

"मी पक्षावर नाराज अ्सण्याचं कारण नाही. केंद्रातलं सरकार उत्तम काम करतंय. गेल्या 60-70 वर्षांत जे निर्णय होऊ शकले नाही ते आता झालेत. काश्मीरच्या निर्णयापासून अनेक चांगले निर्णय झालेत. त्यामुळे पक्षावर नाराज असण्याचा प्रश्नच येत नाही. मी आयुष्य ओवाळून टाकेन या पक्षावर."

"पक्षातल्या काही लोकांच्या कार्यशैलीवर आपली नाराजी आहे आणि पक्षाच्या पातळीवर माझं म्हणणं मांडेल," असं कुलकर्णी यांनी म्हटलंय.

"दोघांच्या कार्यशैलीविषयी माझी नाराजी किंवा काही म्हणणं असू शकतं. तर ते पक्षीय पातळीवर मी नक्कीच मांडेन आणि स्वतःच्या नाही तर पक्षाच्या हितासाठी नक्की मांडेन. जुने जाणते लोक हे समजून घेतील की काही गोष्टी किंवा कार्यशैली बदलली पाहिजे की जेणेकरून पक्षाला नुकसान न होता फायदा होईल. मी पक्षात आहे. मी अजून हा शब्द वापरलेला नाही. कारण मी कायमच पक्षात आहे."

मेधा कुलकर्णी इतर पक्षाच्या संपर्कात असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्यांनी स्वतःच फेसबुकवर पोस्ट टाकत आपण कुणाच्याही संपर्कात नसल्याचं स्पष्ट केलं.

याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, "मी कुठल्यातरी पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहे किंवा ते मला तिकीट देण्यासाठी इच्छुक आहे, अशा माझ्यासंदर्भातल्या बातम्या मुद्दाम प्रसारित केल्या जातात. पण हा खोडसाळपणा थांबवला पाहिजे. यावर मी तीव्र नाराजी व्यक्त करते. मी कुठल्याही पक्षाच्या संपर्कात नाही. मी कुठल्याही पक्षाकडून तिकीट मागितलेलं नाही. भाजपकडून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार आत्ताच घोषित झाले त्यांचं काम मी मनापासून करणार आहे."

मेधा कुलकर्णी

फोटो स्रोत, Nitin Nagarkar

फोटो कॅप्शन, मेधा कुलकर्णी

आपण नाराज नसल्याचं मेधा कुलकर्णींनी म्हटलं असलं तरी आपल्यालाही काहीतरी जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

त्या म्हणाल्या, "कुठल्याही कार्यकर्तीला पदापेक्षा काम हवं असतं. मी गेली अनेक वर्ष भाजपसाठी झोकून देऊन काम केलं आहे आणि तो माझा पिंड आहे. तेव्हा एखाद्या सक्रीय व्यक्तीला कामाविना ठेवणं, यातून जी जाणीव होते, त्याविषयीच्या या भावना आहेत. मला खूप तळमळ आहे. समाजासाठी काहीतरी करायचं आहे. ते करण्यासाठी म्हणून काहीतरी जबाबदारी असावी. अगदी मला चीनच्या बॉर्डरवरही पाठवलं तरी मला चालणार आहे."

पक्षाकडून आश्वासन पूर्तीसाठी उशीर का होतोय, या प्रश्नाचं उत्तर आपण सांगू शकत नसलो तरी नेतृत्त्वाने निर्णय देताना सर्वांचा विचार करून निर्णय देणं अपेक्षित असल्याचंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, कोथरुड मतदारसंघातून पुढे विधानसभेची उमेदवारी मिळाल्यास नक्कीच आवडेल, असंही त्या म्हणाल्या. "कोथरुड माझं माहेर आहे. इथून निवडणूक लढवण्यापेक्षा दुसरी कुठलीच आनंदाची गोष्ट असणार नाही. इथे माझी जिवाभावाची माणसं आहे. आज त्यांना माझ्यासाठी हळहळ वाटते. आणि दादांच्या वक्तव्याबद्दल त्यांनाच विचारा. इथून निवडणूक लढवायला मी निश्चितच इच्छुक आहे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज संध्याकाळी आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका. )