चंद्रकांत पाटील म्हणतात, 'कोल्हापुरातून निवडणूक हरलो तर हिमालयात जाईन'

चंद्रकांत पाटील

फोटो स्रोत, facebook

1. 'कोल्हापुरातून निवडणूक लढवण्यास तयार, निवडून आलो नाही तर हिमालयात जाईन' - चंद्रकांत पाटील

'कोल्हापुरातून निवडून आलो नाही तर हिमालयात जाईन,' अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. टीव्ही 9 ने हे वृत्त दिले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी 2019 विधानसभा निवडणूक पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून लढवली होती. कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटलांना निवडून येण्याची खात्री नव्हती म्हणूनच कोल्हापूर ऐवजी कोथरूड मतदारसंघ निवडला अशी टीका विरोधकांकडून करण्यात येते.

यालाच प्रत्युत्तर देत असताना चंद्रकांत पाटील म्हणाले, "मी आजही कोल्हापुरातून निवडणूक लढण्यास तयार आहे. मी निवडून आलो नाही तर हिमालयात जाईन. पुण्यात सुरक्षित मतदारसंघ म्हणून नाही तर पक्षाने आदेश दिल्याने निवडणूक लढवली. तेव्हाही मला कोल्हापुरातूनच निवडणुक लढवण्याची इच्छा होती."

2. 'राज्यात 23,182 लोकांना रोजगार उपलब्ध होणार'- उद्धव ठाकरेंची माहिती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडॉऊनमुळे राज्याची अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना राज्य सरकारने गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. राज्य सरकारने परदेशी कंपन्यांसोबत 34,850 कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. लोकसत्ताने हे वृत्त दिले आहे.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Twitter

15 परदेशी कंपन्यांसोबत हा सामंजस्य करार केला असून त्यामुळे 23,182 लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. राज्यात 1 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे लक्ष्य असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.

केमिकल, डेटा, मॅनिफॅक्चरिंग, लॉजिस्टिक अशा विविध क्षेत्रातील या कंपन्या आहेत. यासाठी 60 जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. भविष्यात महाराष्ट्र डेटा सेंटरच्या बाबतीत महत्त्वाचे केंद्र बनेल असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

3. राज्यसभेत भाजपचे संख्याबळ वाढले, 8 खासदारांची बिनविरोध निवड

राज्यसभेतील 10 खासदारांचा कार्यकाळ 25 नोव्हेंबरला संपत आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली असून राज्यसभेत आता भाजपची ताकद वाढली आहे. दहा पैकी आठ जागांवर भाजपचे खासदार बिनविरोध निवडून आलेत. झी 24 तासने हे वृत्त दिले आहे.

मोदी

फोटो स्रोत, Getty Images

उत्तर प्रदेशातून भाजपचे आठ, समाजवादी पक्ष आणि बसपाचा प्रत्येक एक खासदार बिनविरोध निवडून आला आहे. राज्यसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत असलेल्या खासदारांमध्ये 3 भाजप, 4 समाजवादी पार्टी, 3 बसपाच्या खासदारांचा समावेश होता.

राज्यसभेत भाजपचे 92 खासदार असून एनडीएचे संख्याबळ आता 112 खासदार एवढे झाले आहे. राज्यसभेत बहुमत आणण्यासाठी भाजपला आता केवळ 10 खासदारांची आवश्यकता आहे. यामध्ये राष्ट्रपती नियुक्त 12 खासदार असतात. राज्यसभेत खासदारांची एकूण संख्या 245 आहे.

4. 'आता मी भाजपला ताकद दाखवतो' - एकनाथ खडसे

एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरानंतर आता रविवारी (2 नोव्हेंबर) भाजपचे 60 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 'आता मी भाजपला ताकद दाखवतो.' या शब्दात खडसेंनी भाजपला आव्हान दिले आहे. प्रभातने हे वृत्त दिले आहे.

एकनाथ खडसे

फोटो स्रोत, Getty Images

जळगावात नुकताच हा कार्यक्रम पार पडला. "आता मी भाजपला ताकद दाखवून देतो. उत्तर महाराष्ट्रात आता केवळ राष्ट्रवादी काँग्रेस असेल. भाजपचे स्थानिक कार्यकर्ते पक्षावर नाराज असून तेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील," असं एकनाथ खडसे म्हणाले.

जळगावात काही दिवसांपूर्वीच भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यावेळी एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरामुळे पक्षाला काही फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी दिली होती. तर कुणाच्या पाठीमागे किती लोक उभे राहतात हे लवकरच समजेल असा पलटवार खडसेंनी केला आहे.

5. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ प्रचार करू शकणार, सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मध्य प्रदेशात 28 जागांवर पोटनिवडणूक होत असताना कमलनाथ यांना प्रचार करता येणार नसल्याचं निवडणूक आयोगाने सांगितले होते. पण आता सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावर स्थगिती दिली आहे. अशी बातमी इंडियन एक्सप्रेसनी दिली आहे.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात काँग्रेसकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. पक्षाचा प्रचार कोण करेल हे निवडण्याचा अधिकार पक्षाचा आहे असा दावा करत काँग्रेसकडून याचिका दाखल करण्यात आली होती.

मध्य प्रदेशात प्रचार संपल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल आला आहे. "आम्ही तुमच्या निर्देशावर स्थगिती आणत आहोत. पक्षाच्या नेत्याला प्रचार करण्यापासून रोखण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?" या शब्दात सरन्यायाधीश एस ए बोबडे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती दिली.

सरन्यायाधीशांसह दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.' रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीचे कोरोना पॉडकास्ट तुम्ही फेसबुकवर पाहू शकता.)