आमदार फोडणे ही आमची संस्कृती नाही - चंद्रकांत पाटील #5मोठ्याबातम्या

चंद्रकांत पाटील

फोटो स्रोत, facebook

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. आमदार फोडणे ही आमची संस्कृती नाही - चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा प्रचंड वाढला आहे. फुटीची शक्यता पाहता इतर पक्षांनी आपल्या पक्षातील आमदारांशी संपर्क साधू नये, याची काळजी राजकीय पक्ष घेत आहेत. याबाबत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

"आम्ही कोणाचे आमदार फोडत नाही. आमदार फोडणे ही आमची संस्कृती नाही," असं पाटील यांनी म्हटलं. ही बातमी सकाळनं दिली आहे.

पाटील यांनी म्हटलं, की गेल्या पाच-दहा वर्षांत भाजपमध्ये आलेले लोक भाजपची कार्यपद्धती, विकासाची दृष्टी पाहून आले आहेत. आम्ही कोणालाही कोणतेही आमिष दाखवले नाही, कोणालाही ईडीची धमकी दिली नाही.

"लोकांनी विधानसभा निवडणुकीत पूर्ण जनादेश किंबहुना स्पष्ट जनादेश देऊनही सरकार स्थापनेला विलंब होत आहे. जनतेसाठी ही धक्कादायक बाब आहे. यातून लवकरात लवकर काही तरी मार्ग काढावा लागेल," असंही पाटील यांनी म्हटलं.

दरम्यान, राज्यात जर राष्ट्रपती राजवट लागू झाली तर ते फक्त भाजपचं पाप असेल, अशी प्रतिक्रिया आमदार धनंजय मुंडे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली आहे.

2. संभाजी भिडे मातोश्रीवरुन आल्यापावली माघारी

मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरुन शिवसेना-भाजपमध्ये तणावाचं वातावरण असताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे हे गुरुवारी (7 नोव्हेंबर) मातोश्रीवर गेले होते. पण उद्धव ठाकरे उपस्थित नसल्यामुळे संभाजी भिडे यांना मातोश्रीवरुन माघारी फिरावे लागले. त्यामुळे त्यांचा मध्यस्थीचा प्रयत्न अपयशी ठरल्याची चर्चा आहे. ही बातमी लोकमतने दिली आहे.

संभाजी भिडे

फोटो स्रोत, Raju sanadi

गुरूवारी (7 नोव्हेंबर) शिवसेनेच्या आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये शिवसेना आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं होतं. त्यानंतर अचानक संभाजी भिडे ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले. मात्र दोघांचीही भेट होऊ शकली नाही.

3. एअरफोर्स HALकडून विकत घेणार 300 फायटर आणि ट्रेनर विमाने

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी मालकीच्या कंपनीकडून स्वदेशी बनावटीची जवळपास 300 फायटर जेट आणि बेसिक ट्रेनर विमानं खरेदी करणं आवश्यक आहे, असं इंडियन एअर फोर्सकडून सरकारला सांगण्यात आलंय. ही बातमी हिंदुस्थान टाइम्सनं प्रसिद्ध केली आहे.

फायटर जेट

फोटो स्रोत, Iaf

फोटो कॅप्शन, प्रातिनिधीक छायाचित्र

तेजस मार्क-2 चे दहा स्क्वाड्रन, 36 अॅडव्हान्स मिडियम (एएमसीए) फायटर विमानं तसंच नवीन बनवण्यात आलेली HTTP-40 ही ट्रेनर विमाने एचएएलकडून खरेदी करणार असल्याचे आयएएफने सरकारला सांगितले आहे.

4. 'माहा' चक्रीवादळाचा धोका टळला

अरबी समुद्रातील 'माहा' चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन त्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाल्याने गुजरातच्या किनारपट्टीवरचा संभाव्य धोका टळला आहे. दीवच्या किनारपट्टीपासून 90 किलोमीटर आणि वेरावळपासून 100 किलोमीटरवर हे चक्रीवादळ पोहोचले आहे.

'कयार' या चक्रीवादळापाठोपाठ आलेल्या 'माहा' या चक्रीवादळाने अतितीव्र स्वरूप धारण केले होते. हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता होती.

वादळ

फोटो स्रोत, Getty Images

हवामान विभागाकडून गुजरातमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आल्यानं गुजरात सरकारकडून नागरिकांच्या स्थलांतरासाठीची तयारी करण्यात आली होती. तसेच राज्यातील आपत्ती निवारण यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली होती.

मात्र, या चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊ लागल्याने गुजरात राज्यात किनारपट्टीजवळ राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

5. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; सोशल मीडियावर अमिताभ ट्रोल

अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती'मध्ये त्यांच्या संयत सूत्रसंचालनाच्या शैलीसाठी ओळखले जातात. पण त्यांच्या कार्यक्रमात एका प्रश्नाच्या पर्यायातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्याचा आरोप झाल्यानं नवा वाद ओढवला आहे.

अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे. यामुळेच अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली आहे.

अमिताभ बच्चन

फोटो स्रोत, Getty Images

नुकत्याच प्रसारित झालेल्या केबीसीच्या एका एपिसोडमध्ये अमिताभ यांनी हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाला मुघल सम्राट औरंगजेबसंबंधी प्रश्न विचारला. त्याच्या उत्तराला चार पर्याय देण्यात आले आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करण्यात आला. त्यामुळे नाराजी पसरली आहे आणि बिग बींनी याबद्दल माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)