अमेरिका निवडणूक निकाल: डोनाल्ड ट्रंप निवडणूक हरण्याची शक्यता किती?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सिद्धनाथ गानू
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हरू शकतात का?
अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष कोण असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एका बाजूला आहेत सक्रिय राजकारणात आल्यानंतर थेट राष्ट्राध्यक्ष झालेले डोनाल्ड ट्रंप आणि दुसरीकडे अनेक दशकं राजकारणात असलेले माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बायडन. कोण जिंकेल?
बायडन यांना अमेरिका संधी देईल का? की ट्रंप आणखी चार वर्षं सत्तेत राहतील? आणि ट्रंप हरले तर ते शांतपणे सत्ता सोडतील का? या सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं शोधणार आहोत.
मतदानाचा दिवस उजाडण्यापूर्वीच ट्रंप यांच्या एका विधानाने खळबळ माजवली. आपण निवडणूक हरलो तर सुप्रीम कोर्ट आपल्याला मदत करेल अशा आशयाचं त्यांनी विधान केलं, पण त्याबद्दल बोलण्याआधी पाहू या ट्रंप आणि बायडन यांच्यात कोण आघाडीवर आहे?
डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांची सुरुवातीला पक्षाची उमेदवारी मिळवतानाच दमछाक झाली होती. पण एकदा त्यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर त्यांनी गोष्टी आपल्या बाजूने वळवायला सुरुवात केली.
गेले अनेक महिने बायडन राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणांमध्ये म्हणजे नॅशनल पोल्समध्ये सातत्याने ट्रंप यांच्या पुढे आहेत. शेवटच्या 3-4 दिवसांत बायडन यांनी ट्रंपवर 11 पॉइंट्सची आघाडी घेतलीय.
2016 मध्ये ट्रंप आणि हिलरी क्लिंटन यांच्यात अत्यंत चुरशीची स्पर्धा होती, पण यावेळेला चित्र बरंच स्पष्ट दिसतंय. पण अमेरिकेच्या निवडणूक पद्धतीत एक गोष्ट जराशी वेगळी आहे. लोकांनी केलेल्या मतदानात तुम्हाला बहुमत मिळतंय का हे तसं गौण आहे. तुम्हाला पुरेसे डेलिगेट्स मिळतायत की नाही यावर ठरतं तुम्ही राष्ट्राध्यक्ष होणार का.

फोटो स्रोत, Reuters
डेलिगेट्सची मॅजिक फिगर आहे 270. प्रत्येक राज्याकडे एक ठराविक डेलिगेट्स म्हणजे प्रतिनिधी असतात. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी महत्त्वाची राज्य जिंकत किमान 270 डेलिगेट्स जिंकणं आवश्यक असतं, सगळ्या राज्यांचे मिळून 538 डेलिगेट्स आहेत. या निवडणुकीत 14 राज्यं बॅटलग्राउंड स्टेट्स मानली जातायत, यातल्या फक्त 2 राज्यांत ट्रंप यांच्याकडे आघाडी आहे.
4 राज्यांमध्ये ट्रंप बायडन यांच्या फक्त 1 टक्क्याने मागे आहेत, पण बाकीच्या राज्यांमध्ये बायडन यांच्याकडे चांगली आघाडी दिसतेय.
या आघाड्या आणि पोल्सचे निकाल प्रत्यक्षात किती खरे ठरतात हे 4 नोव्हेंबरला स्पष्ट होईल. पण यानंतर काय घडेल हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे आणि त्याची उत्तरं तितकीच इंटरेस्टिंग आहेत. मतदानचा दिवस उजाडण्यापूर्वीच ट्रंप यांनी एका प्रचारसभेत म्हटलं, "एकतर मंगळवार आपण जिंकू, किंवा मग नंतर सुप्रीम कोर्टाचे खूप खूप आभार".
ट्रंप यांनी निवडणुकीतील संभाव्य पराभवाविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी केलीय आणि अलिकडेच एमी बेनेट यांची सुप्रीम कोर्टावर नियुक्ती केल्यानंतर कोर्टात 6-3 असं कॉन्झर्व्हेटिव्ह बहुमत असल्याचा ते फायदा घेऊ पाहतील असा एक कयास या विधानातून बांधला जातोय.
निवडणूक हरल्यानंतरच्या परिस्थितीबद्दल ट्रंप यांना यापूर्वीही अनेकदा विचारलं गेलंय. सप्टेंबरमध्ये त्यांना जेव्हा तुम्ही शांतपणे सत्ता सोडाल का असं विचारलं गेलं तेव्हाचा ट्रंप आणि प्रश्नकर्त्या पत्रकाराबद्दलचा संवाद असा होता.

फोटो स्रोत, Getty Images
ट्रंप: आपल्याला पाहावं लागेल काय घडेल ते. तुम्हाला माहीत आहे मी मतपत्रिकांबद्दल तक्रार करत आलोय. या मतपत्रिका म्हणजे एक संकटच आहेत.
प्रश्न: हो पण दंगली होतायत. तुम्ही शांततामय मार्गाने सत्तांतरण होईल याची हमी देताय का?

फोटो स्रोत, Getty Images
ट्रंप: मतपत्रिका काढून टाका म्हणजे मग... सत्तांतरण होणार नाही. आमचीच सत्ता पुन्हा असेल.
यंदा विक्रमी संख्येने अमेरिकन मतदारांनी पोस्टल व्होटिंग म्हणजे टपालाद्वारे मतदान केलंय. संपूर्ण प्रचारादरम्यान डॉनल्ड ट्रंप यांनी सातत्याने पोस्टल व्होटिंगबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत. त्यात घोटाळा होऊ शकतो असेही आरोप केलेत. एकप्रकारे आपला पराभव झालाच तर त्याला हा असा घोटाळा कारणीभूत असेल असंच सूतोवाच त्यांनी करून ठेवलं.
अमेरिकेच्या इतिहासात यापूर्वी निवडणूक निकालांविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची घटना घडली 2000 साली जॉर्ज बुश विरुद्ध अल गोर यांच्यात. फ्लोरिडा राज्यातले निकाल वादग्रस्त ठरले, गोर यांनी हार पत्करल्याचं जाहीर केलं त्यानंतर त्यांनी ती नाकबूल करत कोर्टात धाव घेतली अखेर अनेक दिवस चाललेल्या मतमोजणी आणि न्यायिक प्रक्रियेनंतर बुश यांना विजयी घोषित केलं गेलं. बुश यांनी 271 डेलिगेट्सची मतं मिळवली आणि गोर यांनी 266.
डॉनल्ड ट्रंप यांनी 'जो बायडन हे कमकुवत आहेत, ते अमेरिकेत समाजवादी धोरणं राबवतील,' अशी टीका तर केली आहेच. पण बायडन यांच्यासारख्या कमकुवत उमेदवारापुढे हरणं हे फार लाजीरवाणं असेल असं म्हणत त्यांना खिजवण्याचाही प्रयत्न केलाय.
ट्रंप यांनी अनेक प्रचारसभांमध्ये आपण हरलो तर काय याबद्दलची विधानं केली आहेत. त्यात त्यांनी पराभव झाला तर देश सोडून जाण्याची वेळ येईल असंही म्हटलं होतं. याचाच धागा पकडत बायडन कॅम्पेनने 'Promise?' असं कॅप्शन देत ट्रंप यांना लक्ष्य केलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
खरंतर जून महिन्यात फॉक्स न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत ट्रंप यांनी आपण जिंकलो तर ठीक, हरलो तर आयुष्यात इतर गोष्टी करू असं म्हटलं होतं. पण त्यानंतर प्रचारादरम्यान त्यांनी कधीही सत्ता हस्तांतरणाच्या प्रश्नावर कधीही सरळ उत्तर दिलं नाही.
2016 मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान ट्रंप यांना हाच प्रश्न विचारला होता. पण त्यांनी कधीही आपण शांतपणे पराभव मान्य करू असं म्हटलं नव्हतं. उलट प्रचारादरम्यान एकमेकांवर टीका करणारे उमेदवार निकालानंतर दुसऱ्याचं अभिनंदन आणि कौतुक कसं करतात? आपण तसं करणार नाही असं म्हटलं होतं. त्यापेक्षा आपण स्कॉटलंडमधल्या आपल्या खासगी गोल्फ कोर्सवर गोल्फ खेळण्यासाठी निघून जाऊ असंही त्यांनी म्हटलं होतं.
कोरोना व्हायरसच्या साथीमुळे अनेक गोष्टींवर परिणाम झालाय. अमेरिकन निवडणुकीत त्यामुळेच पोस्टल व्होटिंगला प्राधान्य मिळतंय. सुप्रीम कोर्टाने या मतपत्रिकांच्या मोजणीसाठी वाढील मुदतही दिलीय ज्यामुळे ट्रंप नाराज आहेत. निकाल यायला यंदा नेहमीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. कुठल्याही परिस्थितीत 20 जानेवारी 2021 ला अमेरिकेच्या 46व्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी होणं अपेक्षित आहे. आता ही निवडणूक कोण जिंकतं आणि सत्तेचं हस्तांतरण कसं होतं हे फक्त पाहायचं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








