You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नीलम गोऱ्हे म्हणतात, 'नारायण राणेंची अवस्था विक्रम वेताळ कथेतील वेताळासारखी'
शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज पत्रकार परिषदेत विरोधकांवर निशाणा साधला.
"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्याने भाजपच्या मर्मावर आघात झाला आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठी भाजपला वेळ लागतोय," असा खोचक टोला शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी लगावला आहे.
भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला.
त्या म्हणाल्या, "नारायण राणे निराश आहेत. त्यांची अवस्था विक्रम-वेताळसारखी झाली आहे. विक्रमादित्य काही काम करायला लागला की त्याच्या खांद्यावर जावून बसायचे आणि त्रास द्यायचा."
नारायण राणे यांनी 12 डिसेंबरपर्यंत शिवसेनेवर केलेल्या सर्व दाव्यांचे पुरावे दाखवावे अन्यथा माफी मागावी असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
"ठाकरे कुटुंबाविरोधात काहीतरी मिळेल. ते एखाद्या प्रकरणात सापडतील अशी आशा बाळगणारे अनेक लोक आहेत. त्यांना आजतागायत काहीही मिळालेले नाही," भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली.
त्या पुढे म्हणाल्या, "किरीट सोमय्या हे असे आरोप करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे रविंद्र वायकर यांनी म्हटल्याप्रमाणे ते पांचट आहेत याच्याशी मी सहमत आहे,"
महाराष्ट्रात 'ऑपरेशन कमळ'?
दिवाळीनंतर महाराष्ट्रात 'ऑपरेशन कमळ' होणार असा दावा नारायण राणे यांनी केला होता. यासंदर्भात मी काही दिवसांनी सविस्तर बोलेन असंही राणे म्हणाले होते.
याविषयी बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, "सिंधुदुर्गात कचाकड्यांचे कमळ मिळते का ते मला माहिती नाही."
'रश्मी ठाकरे मॉडलिंग आणि मेकओव्हर करत नाहीत'
उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या सामान्य असून त्यांना मॉडेलिंग करणं, गाणी म्हणणं, मेक ओव्हर करणं जमत नाही असा टोला नीलम गोऱ्हे यांनी अमृता फडणवीस यांना लगावला. तसंच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारातील गुन्हेगारांना सरकार पाठीशी घालत नाही. असे एकही उदाहरण चित्रा वाघ यांच्याकडे असेल तर त्यांनी ते समोर आणावे असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
शिवसेना आजही हिंदुत्ववादी पक्ष आहे. आम्ही आमच्या भूमिकांमध्ये कुठेही तडजोड केलेली नाही असंही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)