बिहार निवडणूकः तेजस्वी यांनी काँग्रेसला 70 जागा देऊन चूक केली का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दिलनवाझ पाशा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
बिहार निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत मित्रपक्ष म्हणून निवडणूक लढवताना कॉंग्रेसने 70 जागांवर आपले उमेदवार उभे केले. मात्र, कॉंग्रेसचे फक्त 19 उमेदवार आमदार म्हणून विधानसभेत निवडून आले आहेत. बिहार निवडणुकीत कॉंग्रेसचा स्ट्राइक रेट त्यांच्या अपेक्षांपेक्षा फार कमी आहे.
बिहाच्या राजकारणात गेल्या काही दशकातील निवडणूक निकालांचं आकलन करता, कॉंग्रेसचा हा निकाल धक्कादायक म्हणावा लागेल.
2015 च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने नितीश कुमारांच्या जनता दल युनायटेड आणि राष्ट्रीय जनता दलासोबत युती करून 41 जागा लढल्या होत्या. यातील 27 जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आले होते.
तर, 2010 मध्ये कॉंग्रेस पक्षाने निवडणुकीत सर्व 243 जागा लढवल्या होत्या. मात्र फक्त चार जागांवर कॉंग्रेसला समाधान मानावं लागलं होतं. 2005 साली बिहारमध्ये दोन वेळा निवडणूक झाली. फेब्रुवारी 2005 मध्ये आणि विधानसभा विसर्जित झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये.
फेब्रूवारी 2005 मध्ये झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने 84 जागांवर निवडणूक लढवून 10 जागा जिंकल्या होत्या. तर, ऑक्टोबरमध्ये झालेल्या निवडणुकीत 51 जागांवर लढून काँग्रेसच्या पदरात फक्त 9 जागा पडल्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
वर्ष 2000 मध्ये बिहारचं विभाजन झालं नव्हतं. सध्याचं झारखंड राज्य बिहारचाच एक हिस्सा होतं. 2000 च्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने 324 जागांवर उमेदवार उभे केले. मात्र, पदरी निराशाच पडली.
कॉंग्रेसचे फक्त 23 उमेदवार विधानसभेत पोहोचू शकले. तर, 1995 च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने 320 जागांवर आपले उमेदवार दिले होते. मात्र, बिहारच्या जनतेने फक्त 29 कॉंग्रेस उमेदवारांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवलं.
1990 च्या आकडेवारीनुसार, कॉंग्रेसने लढलेल्या 323 जागांपैकी त्यांना फक्त 71 जागा जिंकता आल्या होत्या.
बिहारच्या निवडणुकीत कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं होतं 1985 साली. 323 पैकी 196 जागा जिंकून कॉंग्रेसने बिहारमध्ये आपली सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर तब्बल 35 वर्ष बिहारमध्ये कॉंग्रेसला सत्ता स्थापन करता आलेली नाही.
गेली 35 वर्ष भारतातील एकेकाळचा सर्वात मोठा पक्ष कॉंग्रेस बिहारमध्ये आपलं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करतोय.
तेजस्वी यांनी का दिल्या कॉंग्रेसला 70 जागा?
वरिष्ठ पत्रकार मणिकांत ठाकूर सांगतात, कॉंग्रेसच्या पराभवाला निवडणुकीसाठी त्यांनी अजिबत न केलेली तयारी काराणीभूत आहे.
ते म्हणतात, "सर्वांना दिसत होतं, संपूर्ण राज्यात कॉंग्रेसची तयारी कुठेच नव्हती. संघटनात्मक स्तरावर पार्टी कुठेच नव्हती. पक्षाकडे निवडणूक लढवण्यासाठी सक्षम उमेदवार नव्हते. महागठबंधनकडून 70 जागा घेणाऱ्या कॉंग्रेसला निवडणुकीत 40 उमेदवार उभे करताना नाकीनऊ आले होते."
बिहार निवडणुकीत कॉंग्रेसच्या अत्यंत खराब प्रदर्शनानंतर प्रश्न असा उपस्थित होतोय की, तेजस्वी यादव यांनी कॉंग्रेसला 70 जागा देऊन चूक केली?
वरिष्ठ पत्रकार सुरेंद्र किशोर सांगतात, "कॉंग्रेसबद्दल तेजस्वी यादव यांनी दाखवलेली उदारता योग्य नव्हती. याचा परिणाम चांगला राहिला नाही. तेजस्वी यांना आता वाटत असेल की कॉंग्रेसला 70 जागा देऊन त्यांनी मोठी चूक केली."
पण, मणिकांत ठाकूर यांच्या म्हणण्याप्रमाणे, तेजस्वी यादव यांनी काही अडचणींमुळे कॉंग्रेसला 70 जागा दिल्या असतील.
ते म्हणतात, "कॉंग्रेसच्या नेतृत्वाने तेजस्वी यादव यांच्यावर 70 जागा देण्यासाठी दबाव टाकला. जागा दिल्या नाहीत तर आघाडीतून बाहेर पडू असा इशाराही दिला होता. कॉंग्रेस महागठबंधन आघाडीतून बाहेर पडली असती तर तेजस्वी यांच्यासाठी परिस्थिती फार खराब झाली असती. त्यामुळे तेजस्वी यांच्यासमोर फार पर्याय उपलब्ध नव्हते."
बिहारच्या निवडणुकीत केंद्रीय नेतृत्वाचं योगदान काय?
सुरेंद्र किशोर यांच्या सांगण्याप्रमाणे, बिहार निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या झालेल्या वातहतीला कमकुवत केंद्रीय नेतृत्व जबाबदार आहे. कॉंग्रेस 2014 पासून केंद्राच्या सत्तेपासून दूर आहे. पक्षावर कॉंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाची पकड ढिली पडली आहे.
किशोर पुढे म्हणतात, "मंडल आयोग, भागलपूर दंगल आणि मंदिर आंदोलन यांचा कॉंग्रेसवर उलटा परिणाम झालाय. कॉंग्रेसने मंडल आयोगाचं समर्थन केलं नाही. त्यामुळे बिहारमध्ये कॉंग्रेस पक्ष कमकुवत झाला आणि लालूप्रसाद यादव मजबूत झाले. त्याचसोबत मंदिर आंदोलनात कॉंग्रेसने कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. याचे परिणाम कॉंग्रेस पक्षाला भोगावे लागत आहेत."
बिहारच्या भागलपुर जिल्ह्यात 1989 मध्ये उसळलेली दंगल आणि 1990 मध्ये सुरू झालेलं मंदिर आंदोलन. यामुळे बिहारच्या राजकारणात हिंदुत्वाचा अजेंडा रुतला. याचा थेट परिणाम बिहारच्या निवडणुकांवर दिसून आला.
कॉंग्रेस पहिल्यापासून आपण एक धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचं लोकांना दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या राज्यांमध्ये लोकांकडे धर्मनिरपेक्ष पक्षाचा पर्याय आहे. त्या राज्यांमध्ये कॉंग्रेस अधिकाधिक कमकुवत होत आहे.
सुरेंद्र किशोर यांच्या म्हणण्याप्रमाणे, "बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांनी मुसलमान मतदारांना एक सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला. त्यामुळे कॉंग्रेस दिवसेंदिवस कमकूवत बनत गेली."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








