प्रकाश आंबेडकर: बिहारमध्ये एनडीएचा विजय झाला असला तरी तो आम्ही मानत नाही #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्या अशा आहेत.

1. बिहारमध्ये एनडीएचा विजय झाला असला तरी तो आम्ही मानत नाही -प्रकाश आंबेडकर

बिहारच्या निवडणूक निकालानंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी हा विजय आम्हाला मान्य नसल्याचं म्हटलं आहे. ही बातमी लोकमतने दिली आहे.

बिहारमध्ये एनडीएचा विजय झाला असला तरी तो आम्ही मानत नाही, असे म्हणत ईव्हीएमच्या मुद्द्यावरुनही प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला थोडक्यात बहुमत मिळाले आहे. 125 जागा जिंकत बिहारच्या मैदानात नितीश कुमार यांचा जेडीयू, भाजप आणि मित्रपक्षांच्या युतीने बाजी मारली आहे, असे असले तरी आपण हा एनडीएचा विजय मानत नाही असं आंबेडकरांनी म्हटलं आहे.

"बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान फायदा करुन घेण्यासाठी भाजपचा बिहारमध्ये दंगली घडवण्याचा डाव होता. पण भाजपचा हा डाव आम्ही पूर्णत्वास जाऊ दिला नाही," असा गंभीर आरोपही आंबेडकर यांनी केला आहेत. तसेच, ईव्हीएम मशिनच्या मतदानावर लोकांचा विश्वास नाही. निवडणुका ह्या बॅलट पेपरवरच घ्यायला हव्यात, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे

2. 2020 मध्ये अझीम प्रेमजी यांनी दररोज दान केले 22 कोटी

आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असणाऱ्या विप्रोचे मालक अझीम प्रेमजी यांनी यावर्षी समाजसेवेसाठी सर्वाधिक दान दिले आहे. ही बातमी न्यूज18 लोकमतने दिली आहे.

यावर्षी कॉरपोरेट डोनेशनचा मोठा हिस्सा पीएम केअर्स फंड मध्ये देखील गेला आहे. अझीम प्रेमजी यांनी 2020 या आर्थिक वर्षात दररोज 22 कोटी रुपये असे एकूण 7,904 कोटी रुपये दान केले आहेत. यानंतर ते या आर्थिक वर्षातील सर्वाधिक दान करणारे भारतीय बनले आहेत.

समाजसेवेसाठी दान देण्यामध्ये त्यांनी HCL टेक्नोलॉजीचे मालक शिव नाडर यांना मागे टाकले आहे. देशात सर्वाधिक दान करणाऱ्या दानशुरांची यादी हुरून इंडिया आणि Edelgive फाउंडेशन यांनी मिळून बनवली आहे. अझीम प्रेमजी यांनी दान केलेली रक्कम गेल्या वर्षींच्या तुलनेत अनेक पटींनी जास्त आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांनी 2020 या आर्थिक वर्षात 458 कोटींचे दान केले आहे. गेल्या वर्षी त्यांनी 402 कोटींचे दान केले होते.

3. आई-वडिलांचा सांभाळ करा अन्यथा पगार कपात करू - लातूर जिल्हा परिषद

शासकीय नोकरदार असूनही अनेकजण वृद्धपकाळात आई-वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवतात. अनेकजण सांभाळही करीत नाहीत. यावर पर्याय म्हणून लातूर जिल्हा परिषदेने अनोखा ठरावच सर्वसाधारण सभेत घेतला आहे.

जो कर्मचारी आई-वडिलांचा सांभाळ करीत नाही, त्याच्या पगारातून 30 टक्के रक्कम ही आई-वडिलांना उदरनिर्वाहसाठी मिळणार आहे. या अनोख्या ठरावाचे कौतुक होत आहे. ही बातमी एबीपीA माझाने दिली आहे.

आई-वडिलांनी पालन-पोषण केल्यानंतरच मुले सक्षम होतात. पण त्यांच्या वृद्धपकाळात मुलांना आई-वडिलांच्या कष्टचा विसर पडतो. अनेकांना नीटनेटकी वागणूकही मिळत नाही. परिणामी मुलगा शासकीय नोकरदार असताना त्यांना वृद्धपकाळात आश्रमात दिवस काढावे लागतात. यावर पर्याय म्हणून लातूर जिल्हा परिषदेने एक ठराव मंजूर केला आहे.

जो कर्मचारी आई-वडिलांचा सांभाळ करीत नाही त्यांच्या पगारातील 30 टक्के रक्कम ही थेट आई-वडिलांच्या खात्यांमध्ये वर्ग केली जाणार आहे.

4. 'देशात स्वतःचा कचरा करुन घेतल्याबद्दल शिवसेनेचं अभिनंदन'

बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 50 जागा लढवणाऱ्या शिवसेनेला एकही जागा मिळवता आलेली नाही. यावरुनच आता भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेना आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

निलेश राणे यांनी सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होणारी शिवसेनेला मिळालेल्या मतांच्या यादीचा मजकूर पोस्ट करत, "वारंवार देशात स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन," असं म्हटलं आहे.

अन्य एका ट्विटमध्ये निलेश यांनी, "संजय राऊत जोपर्यंत शिवसेनेत आहे तोपर्यंत विरोधकांना भीती नाही कारण या निवडणुकीमध्ये शिवसेनेची बिहारमध्ये जी अवस्था केली तशीच शिवसेनेची अवस्था महाराष्ट्रात राऊत करतील अशी खात्री आम्हाला आहे," असा टोला लगावला आहे.

5. भारतात कधीही न आलेली मंदी येण्याची शक्यता - रिझर्व्ह बँक

जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतला जीडीपी 8.6 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे, म्हणजेच भारतात पहिल्यांदाच सलग दोन तिमाहींमध्ये जीडीपीची वाढ निगेटीव्ह असेल. परिणाणी भारतात ऐतिहासित अशी मंदी येण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. ही बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

यासंबंधीची माहिती रिझर्व्ह बँकेच्या मासिकात प्रसिद्ध झालेली आहे. कोव्हिड-19 मुळे अर्थव्यवस्थेवर जो परिणाम झाला हे त्याचंच दृश्य स्वरूप असल्याचंही त्यात म्हटलं आहे.

2020-21 या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच भारतात कागदोपत्री मंदी आल्याचं यात म्हटलं आहे, पण ही मंदी थोड्या काळासाठी असेल आणि गोष्टी पूर्वपदावर यायला लागल्या तर अर्थव्यवस्थेला गती मिळेल असंही अभ्यासकांनी म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)