You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी : 'मला इशारा देऊ नका, ते काम जनता करेल'
"काही पक्षांची घराणेशाही लोकशाहीसाठी धोकादायक आहे," अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. बिहार आणि इतर काही राज्यांमधल्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर ते बोलत होते.
दिल्लीतील भाजपच्या मुख्य कार्यालयातून ते संवाद साधत होते.
त्यांनी म्हटलं, "घराणेशाही असलेले राजकीय पक्ष लोकशाहीसाठी धोकादायक बनत चालले आहेत. एका घराण्यापुरते मर्यादित राहिलेले राजकीय पक्ष असो वा घराणेशाही असलेले राजकीय पक्ष असो ते लोकशाहीसाठी सर्वांत मोठा धोका आहेत. अनेक वर्षं देशाचे नेतृत्व करणारा पक्ष एका कुटुंबाभोवती अडकला आहे. हे अत्यंत दुर्देवी आहे. यामुळे भाजपची जबाबदारी आणखी वाढते."
काही राज्यांमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हत्येसंदर्भातही ते बोलले.
"जे लोक लोकशाहीच्या माध्यमातून आमच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत. त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांची हत्या करण्याचा मार्ग स्वीकारला. भाजपच्या लोकांची हत्या करून त्यांचे संकल्प पूर्ण होतील असे त्यांना वाटते. मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो. मला इशारा देण्याची गरज नाही. ते काम जनता करेल," असंही त्यांनी म्हटलं.
त्यांनी पुढं म्हटलं, "निवडणुका येतात-जातात. विजय-पराभव होत राहतो. पण हा मृत्यूचा खेळ लोकशाहीला अनुसरून नाही. हत्या करून मतं मिळत नाहीत."
"बिहारच्या यशाने हे दाखवून दिलं आहे की आज देशामध्ये सर्वांत महत्त्वाचा मुद्दा विकासच आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये जनता दाखवत आहे की जे विकासाबद्दल बोलतील त्यांनाच निवडून दिलं जाईल अन्यथा त्यांचे डिपॉजिटही जप्त होईल," असं मोदी यांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांचेही आभार मानले. महिला या भाजपच्या 'सायलेंट वोटर' आहेत असा दावा त्यांनी केला आहे. तसंच भाजप-एनडीएचे कार्यकर्ते नितीश कुमार यांच्या नेतृत्वात आत्मनिर्भर बिहारची संकल्पपूर्ती करतील असंही त्यांनी म्हटलं.
"वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनेल्सवर सायलेंट वोटर्सची चर्चा होत आहे. हे सायलेंट वोटर्स देशाच्या महिला आहेत. भाजपच्या राज्यात महिलांना सन्मान आणि सुरक्षा दोन्ही मिळते आहे," असंही मोदींनी म्हटलं.
"आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी तरुणांनी हातात कमळ घ्यावं," असं आवाहनही नरेंद्र मोदींनी केले आहे.
त्यांनी म्हटलं, "भाजपात अंतर्गत लोकशाही कायम राखायची आहे. तेव्हाच देशाचा पंतप्रधान बोलू शकतो, 'नड्डाजी आगे बढो हम तुम्हारे साथ है'. ज्या तरुणांसाठी राष्ट्रहित सर्वप्रथम आहे, ज्या तरुणांमध्ये लोकशाहीसाठी बांधिलकी आहे अशा तरुणांना मी आवाहन करतो. त्यांनी भाजपच्या माध्यमातून देश सेवा करावी. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातात कमळ घ्यावे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)