You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बिहार निवडणूक: नरेंद्र मोदी म्हणतात 'जनतेनी घराणेशाही आणि गुंडगिरीला पराभूत केलंय'
बिहारमध्ये एकीकडे दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या अररिया जिल्ह्यात सभा घेतली.
यावेळी ते म्हणाले "बिहारच्या लोकांना आपलं मत बनवलं आहे. घराणेशाही आणि चमकधमक हरत आहे. घोटाळे पराभूत होत आहेत. लोकांचे न्याय्य हक्क जिंकत आहेत."
यावेळी त्यांनी म्हटले की "प्रत्येक गरीब व्यक्तीला घर दिले जाईल. कोरोनामुळे प्रत्येकाला पक्कं घर मिळण्याचं काम मंदावलं आहे पण ते पुन्हा सुरू होईल."
मोदी म्हणाले "बिहारच्या जनतेच्या मनात अजून जुन्या काळातल्या निवडणुकीच्या नोंदी ताज्या असतील. या लोकांनी निवडणुका म्हणजे खेळ बनवला होता. निवडणुका म्हणजे चोहीकडे हत्या, हिंसा, बूथ कॅप्चरिंग हेच होत असे. सामान्य माणसाचा मतदानाचा अधिकार पण हिरावला गेला होता. बिहार ने अशा जंगलराज आणि डबल-डबल युवराजांना नाकारलं आहे."
बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये दुसऱ्या टप्प्यात 94 जागांसाठी आज (3 नोव्हेंबर) मतदान होत आहे. 17 जिल्ह्यांमधल्या या जागांसाठी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होईल.
निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण 1,463 उमेदवार रिंगणात आहेत. मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव, त्यांचे मोठे भाऊ तेज प्रताप यादव यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांचं भवितव्य मतदानाच्या या दुसऱ्या टप्प्यात निश्चित होईल. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जिल्हा असलेल्या नालंदामध्येही मतदान होत आहे.
बिहारमध्ये 243 विधानसभा जागांसाठी तीन टप्प्यांत मतदान होत आहे. मतदानाचा पहिला टप्पा 28 ऑक्टोबरला पार पडला. यामध्ये 71 जागांसाठी मतदान झालं.
मंगळवारी (3 नोव्हेंबर) बिहारसोबतच 10 अन्य राज्यांमध्येही एकूण 54 जागांसाठी पोटनिवडणुका होत आहेत.
दुसऱ्या टप्प्यात भाजप 46 जागांवर निवडणूक लढवत आहे आणि जेडीयू 43 जागांवर निवडणूक लढवत आहेत. पाच जागांवर मुकेश सहनी यांचा पक्ष वीआय मैदानात आहे. विरोधी पक्षांमध्ये आरजेडी 56 जागांवर तर काँग्रेस 24 जागांवर निवडणूक लढवत आहे.
31 वर्षांचे तेजस्वी यादव हे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. ते दुसऱ्यांदा राघोपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. 2015 साली ते राघोपूर मतदारसंघातून निवडून आले होते. तेजस्वींसमोर भाजपचे माजी आमदार सतीश राय यांचं आव्हान आहे.
राघोपूर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाची पारंपरिक सीट आहे. इथून लालू यादव 1995 आणि 2000 साली निवडून आले होते. 2005 साली त्यांची पत्नी राबडी देवी इथून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. 2010 साली सतीश राय यांनी राबडी देवींना पराभूत केलं होतं.
लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव समस्तीपूर जिल्ह्यातील हसनपूरमधून निवडणूक लढवत आहेत. 2015 साली ते महुआमधून आमदार म्हणून निवडून आले होते.
चिराग पासवान यांचा लोक जनशक्ति पक्ष यावेळी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी लोक जनशक्ति पक्षाचे 52 उमेदवार मैदानात आहेत.
मध्य प्रदेशमध्ये पोटनिवडणूक
मध्य प्रदेशमध्ये 28 जागांसाठी पोटनिवडणूक होत असून एकूण 355 उमेदवार मैदानात आहेत. त्यामध्ये 12 मंत्र्यांचाही समावेश आहे. शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री राहणार की नाही याचा निर्णय याच पोटनिवडणुकीत होईल.
या 28 जागांसाठी एकूण 63 लाख मतदार मतदान करतील. 28 पैकी 16 जागा या ग्वाल्हेर-चंबळ भागात आहेत. हा भाग भाजपचे राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो.
230 जागा असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेत सध्या भाजपचे 107, काँग्रेसचे 87, बहुजन समाज पक्षाचे दोन आणि समाजवादी पक्षाचा एक आमदार आहेत. चार अपक्ष आमदार असून एक जागा रिक्त आहे. भाजपला बहुमतासाठी 115 आमदारांची गरज आहे. ज्या 28 जागांसाठी मतदान होत आहे, तिथे 27 आमदार हे काँग्रेसचे होते. त्यापैकी 25 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर कमलनाथ सरकार कोसळलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)