मेलेलं डुक्कर उचलायला लावलं म्हणून सामाजिक कार्यकर्त्याचं आत्मदहन

कोल्हापूर जिल्हातील इचलकरंजी नगरपालिकेत आत्मदहन केलेल्या सामाजिक कार्यकर्त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नरेश सीताराम भोरे असं या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव असून भोरे यांनी नगरपालिकेने तक्रारीवर लक्ष दिल नाही तर आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी आत्मदहन केल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.
गेल्याच आठवड्यात इचलकरंजीमध्ये शहापूर रस्त्यावरून पालिकेच्या घंटागाडीला बांधून मेलेले डुक्कर रस्त्यावरून फरफटत ओढून नेले जात होते. यावर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांनी घंटागाडी चालकाला मृत डुक्कर घंटागाडीत टाकून नेण्यास सांगितलं. यावरून या दोघांमध्ये वाद झाला होता, संबंधित गाडीच्या चालकाने भोरे यांना शिवीगाळ करत मारहाण केली होती.
त्यावेळी भोरे यांना कथितरित्या मेलेले डुकर उचलून घंटागाडीत टाकण्यास भाग पाडले होते. या घटनेची तक्रार करत भोरे यांनी संबंधितांवर कारवाई व्हावी असं निवेदन नगरपालिकेत दिलं होते.
मात्र संबंधित चालकावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने अखेर शुक्रवारी त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज सोमवारी (26 ऑक्टोबर) दुपारी भोरे यांनी नगरपालिकेच्या पार्किंगमध्ये अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन केलं. यात ते गंभीररित्या भाजले.
घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी भोरे यांना आधी आयजीएम रुग्णालयात दाखल केलं . मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सांगलीच्या सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत बोलताना इचलकरंजीच्या अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी सांगितले की, "22 तारखेला भोरे यांनी नगरपालिकेत घंटागाडी चालक लाखे यांच्या विरोधात तक्रार दिली होती. डुक्कर ओढत नेण्यावरून त्यांचा वाद झाला. भोरे यांच्या मृत्यूनंतर आता तक्रारीबाबत माहिती घेऊन जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू."
तर याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सांगितले की, "संबंधित गाडी चालक हा ठेकेदाराकरवी गाडीवर होता. त्यामुळे त्याच्यावर थेट कारवाई करता आली नाही. मात्र आराध्या एंटरप्राईझेस या कंपनीला त्यांच्या या गाडीचालकाच्या वर्तनाबद्दल २३ तारखेला कडक कारवाई करण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. पण आज झालेली दुर्घटना घडायला नको होती."
घडलेल्या प्रकाराबाबत भोरे यांनी तक्रार करूनही त्यावर अंमलबजावणी झाली नाही. आत्मदहनाचा इशारा देऊनही नगरपालिका अधिकारी किंवा प्रशासनाने भोरे यांच्याशी कोणताही संवाद साधला नाही. त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप भोरे यांचा पुतण्या ओंकार भोरे यांनी केला आहे.
तर या प्रकरणी आता दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी इचलकरंजी सोशल वर्कर कमीटीचे अध्यक्ष प्रदिप मळगे यांनी केली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








