You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकनाथ खडसे: 'त्यांनी माझ्यामागे ईडी लावली तर मी त्यांच्यामागे सीडी लावेल'
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे. मी संघर्ष केला पण पाठीत खंजीर खुपसून राजकारण केलं नाही असं खडसे म्हणाले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार प्रफुल पटेल, जयंत पाटील हे उपस्थित आहेत.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरुण गुजराथी यांनी खडसेंना म्हटले एकनाथ खडसे, तुम्ही राष्ट्रवादीचे 3 आमदार पाडले, आता 5 निवडणून आणा त्यानंतर सभागृहात हशा पिकला. एकनाथ खडसे यांच्या वाट्याला कटुता आली असं देखील ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले एकनाथ खडसे यांना भाजपकडून जाणीवपूर्वक पहिल्या रांगेतून शेवटच्या रांगेत बसवण्याचे प्रयत्न झाले.
"सभागृहात विचारलं होतं कटप्पाने बाहुबली को क्युं मारा? सगळे त्यावेळी हसले होते. पण आजही ते (फडणवीस) टीव्ही बघत असतील. आता त्यांना कळलं असेल टायगर अभी जिंदा है आणि पिक्चर अभी बाकी है.."
"केंद्र सरकारच्या शेती कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या हक्काला बाधा निर्माण होत असेल तर त्याविरोधात भक्कम उभं राहायला हवं," असं जयंत पाटील यांनी म्हटलं.
एकनाथ खडसे यांच्या भाषणातील मुद्दे
1. मला विधानसभा निवडणुकीवेळी खूप त्रास देण्यात आला. मी काय गुन्हा केला म्हणून मला छळण्यात आलं, हे मी विचारत होतो, पण ते मला आतापर्यंत सांगण्यात आलं नाही.
2. तुम्हाला राष्ट्रवादीत प्रवेश दिला तर तुमच्या मागे ईडी लावली जाईल, असं जयंत पाटील मला म्हणाले. तर मी जयंत पाटील यांना म्हणालो, त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेल. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, सीडी काय प्रकरण आहे ते.
3. ज्या निष्ठेनं भाजपचं काम केलं, त्याच निष्ठेनं राष्ट्रवादीचं काम करेल. भाजप ज्या वेगानं वाढलं, त्याच्या दुप्पट वेगानं मी राष्ट्रवादी वाढवून दाखवेल
4. मला बऱ्याच पक्षांकडून ऑफर होती. पण, कार्यकर्त्यांची अपेक्षा होती की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायला हवं. दिल्लीतल्या वरिष्ठांनीही राष्ट्रवादीमध्ये जा म्हणून सांगितलं.
5. जळगावमध्ये पक्ष प्रवेशाचा मोठा कार्यक्रम होईल. आतापर्यंतच सगळ्यांत मोठा कार्यक्रम होईल. जळगावमधील सगळ्यात मोठं ग्राऊंड ओतप्रोत भरून दाखवेल.
6. माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भूखंड घेतल्याचा आरोप करण्यात आला. पण काही दिवस जाऊ द्या, कुणी किती भूखंड घेतले ते मी तुम्हाला सांगतो.
7. जर शरद पवारांनी मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला नसता तर माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आली असती.
शरद पवारांच्या भाषणातील मुद्दे
1. जळगाव जिल्हा हा गांधी-नेहरूंच्या विचारांचा जिल्हा होता. या जिल्ह्यावर काँग्रेसची सत्ता होती. पण नव्या पिढीच्या लोक एकनाथ खडसे यांच्या पाठीमागे गेले. संपूर्ण जिल्ह्यातला सर्वांत प्रभावी नेता ते ठरले.
2. एकनाथ खडसे यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यातील ताकद वाढेल.
3. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.
4. अजित पवार नाराज आहेत अशा बातम्या टीव्हीवर येत आहेत पण सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे ते काही दिवसांसाठी क्वारंटाईन झाले.
5. एकनाथ खडसे यांनी कोणतेही पद मागितले नाही. ते म्हणाले माझी कसलीही अपेक्षा नाही.
'बहुजन समाजाचा मुख्यमंत्री हवा हे विधान भोवलं'
याआधी, "बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असला पाहिजे या माझ्या वक्तव्यानंतर जे घडले ते सगळ्यांनी पाहिलं," अशी प्रतिक्रिया देत एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.
आपल्या राजीनाम्यासाठी सर्वस्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत असंही खडसे यांनी म्हटलं होतं.
देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते, "एकनाथ खडसे जे सांगत आहेत, ते अर्धसत्य आहे. त्यावेळी मी आता बोलणार नाही. त्यांच्या माझ्याबद्दल काही तक्रारी होत्या, त्या त्यांनी वरिष्ठांकडे मांडायला हव्या होत्या. असो...अशावेळी कोणाला तरी व्हिलन ठरवावं लागतं, त्यांनी मला ठरवलं."
दरम्यान, गेल्या काही काळात एकनाथ खडसेंनी सातत्याने जाहीरपणे देवेंद्र फडणवीसांवर उघडपणे टीका करत होते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)