पंकजा मुंडे : 'मी माझ्या शत्रूलाही कधी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची वेळ आणली नाही' #5मोठ्याबातम्या

पंकजा मुंडे

फोटो स्रोत, TWITTER@PANKAJAMUNDE

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1) पंकजा मुंडे: 'मी माझ्या शत्रूलाही कधी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची वेळ आणली नाही'

"मी आतापर्यंत राजकारणात आहे. मात्र, मी माझ्या शत्रूलाही कधी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची वेळ आणली नाही," असं भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्यात. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिली आहे.

पंकजा मुंडे यांनी नाव न घेता त्यांच्या राजकीय विरोधकांवर टीका केलीय खरं, पण ही टीका धनंजय मुंडे यांच्यावर आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

पंकजा मुंडे

फोटो स्रोत, Getty Images

"तुम्ही मला बीडसाठी पाच वर्षं झटताना पाहिलं आहे. या पाच वर्षांत निधी असेल किंवा इतर गोष्टीत कधीही राजकारण केलं नाही. माझ्या शत्रूलाही पोलीस स्टेशनला जायची वेळ आणली नाही. मी कधीही शत्रूच्या कार्यकर्त्यांवर, त्यांच्या संस्थांवर, संस्थाचालकांवर किंवा त्या संस्थांच्या अध्यक्षांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना ट्रॅप करण्याचे प्रयत्न केले नाहीत," असं पंकजा मुंडे म्हणाल्यात.

तसंच, बीड जिल्ह्यात अगदी शत्रूच्या माध्यमातूनही चार रोजगार निर्माण होत असतील तर त्यांना ताकदच देण्याचा प्रयत्न केल्याचंही त्या म्हणाल्या.

2) उदयनराजे म्हणतात, 'महाराष्ट्र दिशाहीन, फडणवीसांनी सत्ता ताब्यात घ्यावी'

सध्या महाराष्ट्राचं वातावरण दिशाहीन असून ज्यांनी आपल्याला मतदान केलं, त्या मतदारांची ससेहोलपट होत आहे, असं म्हणत खासदार उदयनराजे यांनी देवेंद्र फडणवीसांना उद्देशून म्हटलं, महाराष्ट्राची सूत्रे आता फडणवीसांनी ताब्यात घ्यावी.

"राज्यात भाजपला बहुमत मिळवून फक्त राजकारणामुळे सत्ता मिळाली नाही. केवळ स्वार्थासाठी आलेली आजची महाविकास आघाडी सरकारची अवस्थाही अस्थिर आहे आणि त्यामुळे निर्णायक निर्णय होत नाहीत," असं उदयनराजे म्हणाले. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

उदयनराजे भोसले

फोटो स्रोत, TWITTER/@CHH_UDAYANRAJE

सरकार कुणाचेही असो, स्थिरता असेल तरच शासन करू शकतो, असंही उदयनराजेंनी नमूद केलं.

"राज्यात लोकांना स्थिर सरकार हवं आहे. त्यामुळे मला खात्री आहे. लवकरच राज्यात काहीतरी चांगले घडेल," असा विश्वास उदयनराजेंनी व्यक्त केला.

3) मुंबईसाठी उरणमध्ये 1000 मेगावॅटचा वायू वीज प्रकल्प उभारणार

मुंबईची भविष्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेता उरणमध्ये तब्बल एक हजार मेगावॅट क्षमतेचा वायू वीज प्रकल्प उभारणार असल्याचे महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं. त्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महानिर्मितीला त्यांनी दिले आहे. सामनाने ही दिली आहे.

मुंबईच्या खंडित झालेल्या वीज पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी काल (22 ऑक्टोबर) उरण वायू वीज प्रकल्पाला भेट दिली.

वीज

फोटो स्रोत, Getty Images

सध्याची मुंबईची कमाल मागणी 3500 मेगावॅट एवढी असून, 2030 पर्यंत ती पाच हजार मेगावॅटपर्यंत वाढणार आहे.

उरणच् वायू वीज केंद्राची क्षमता 672 मेगावॅट असली तरी त्यातील दोन संच बंद आहेत. त्यामुळे येथून केवळ 280 मेगावॅटपर्यंत वीजनिर्मिती होते. या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्र्यांनी प्रकल्पाच्या गॅस टर्बाइनची पाहणी केली.

4) ब्राह्मणही बहुजन, त्यामुळे फडणवीसही बहुजन - रामदास आठवले

"एकनाथ खडसे हे सध्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत. मात्र, ब्राह्मण हेही बहुजन असल्याने फडणवीस बहुजन आहेत," असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.

"फडणवीसांनी अतिशय चांगल्याप्रकारे काम केलं आहे. भाजपने ज्येष्ठांना विश्रांती देत तरुणांना संधी दिल्याने खडसेंना बाजूला ठेवले होते," असं आठवले म्हणाले.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Twitter

खडसेंना राष्ट्रवादीत घेतल्याने फडवीस किंवा आमची तोंडं बंद होणार नाहीत, असंही आठवले म्हणाले.

5) लडाख चीनमध्ये दाखवल्यानं ट्विटरला भारत सरकारचा इशारा

भारत सरकारनं ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांना पत्र लिहून भारतीय नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखवल्याबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. देशाच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेचा अनादर करण्याचा हा प्रयत्न स्वीकार करण्याजोगा नाही, असं भारत सरकारनं पत्रात म्हटलंय. न्यूज 18 नं ही बातमी दिलीय.

भारत सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अजय सावनी यांनी ट्विटरच्या सीईओंना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.

ट्विटरनं काही दिवसांपूर्वी लेहला चीनचा भाग दाखवला होता. त्यावरून भारत सरकारनं ही नाराजी व्यक्त केली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)