देवेंद्र फडणीसांचा टोला 'उद्धव ठाकरे यांनी थिल्लरबाजी करू नये'

महाराष्ट्रात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राजकारण पेटताना दिसत आहे, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

त्यांनी म्हटलं, "बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा राज्यात जर एवढं मोठं संकट आलं आहे, तर सर्वांनी एकजुटीनं केंद्राकडे मदत मागायला हवी."

उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याविषयी विचारल्यावर फडणवीसांनी म्हटलं, "अतिशय असंवेदनशील अशाप्रकारचं हे वक्तव्य आहे. आता लोकांना मदत अपेक्षित आहे, पण अशा प्रकारची थिल्लरबाजी ही मुख्यमंत्र्यांनी करणं शोभत नाही. मुख्यमंत्र्यांना माहिती असेल की मोदीजी डायरेक्ट लडाखला जातात, तिथं कुणीही जाऊ शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यानी उगीच स्वत:ची तुलना पंतप्रधानांशी करू नये.

"मोदींनी स्वत: फोन करून मदत करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. पण, अशा प्रकारच्या गंभीर दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी असं थिल्लर वक्तव्य करणं योग्य नाही.

केंद्र सरकार पाहिजे तेव्हा मदत करत नाही, या उद्धव ठाकरेंच्या आरोपावर फडणवीस यांनी म्हटलं, "केंद्रानं कोणतेही पैसे अडकवलेले नाहीत. जीएसटी सरकार भरून देत आहे. काहीही आलं की फक्त टोलवाटोलवी करायची. तुमच्यात दम नाही का, मदत करायची? हिमतीनं काम करावं लागतं. यांना मदत करायची नाही, म्हणून केंद्राकडे बोट दाखवलं जातंय.

"आतापर्यंत राज्यातनं 50 हजार कोटींचं कर्ज काढलंय, अजून 70 हजार कोटींचं कर्ज काढण्याची महाराष्ट्राची क्षमता आहे, त्यावर बोलायला हवं आणि मदत करायला हवी. "

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)