You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाऊस : दक्षिण भारताला पावसाचा फटका, किमान 30 जणांचा मृत्यू
तेलंगणामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हैदराबाद शहरातले अनेक भाग जलमय झाल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे.
बंगालच्या खाडीत तयार झालेल्या चक्रीवादळाचा फटका आंध्र प्रदेशातल्या किमान 6 जिल्ह्यांना बसला आहे. तीनशेहून जास्त गावांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. आंध्र प्रदेशात रस्त्यांचं मोठं नुकसान झालं आहे आणि अनेक ठिकाणचा वीजपुरवठाही खंडित झाला आहे.
तेलंगणामधली परिस्थिती अत्यंत बिकट आहे. हैदराबाद शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या अपघातांमध्ये जवळपास एक डझन लोकांचा मृत्यू झाला आहे.
हैदराबादजवळची धरणं काठोकाठ भरली आहेत. शहरात रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तसंच सखल भागात, नदी किंवा तलावांजवळ राहणाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दक्षिण भारतातल्या या दोन राज्यांव्यतिरिक्त कर्नाटक आणि केरळ याशिवाय महाराष्ट्र आणि ओडिशामध्येसुद्धा मुसळधार पाऊस कोसळतोय.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओडिसाच्या अनेक भागात पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान खात्याने 14 ऑक्टोबरला अॅलर्ट घोषित करून पुढचे दोन ते तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता.
मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अॅलर्ट घोषित करण्यात आला आहे.
याशिवाय उत्तर कर्नाटकातल्या बिदर, कलबुर्ग, यादगिरी, रायचूर, बल्लारी, विजयपुरा आणि बागलकोट या जिल्ह्यांमध्येही जोराचा पाऊस झाला.
भारताच्या दक्षिण टोकाला असलेल्या केरळमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे.
तर मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात भीमा नदीवरच्या सोना धरणातून 2,23,000 क्यूसेक्स पाणी सोडण्यात आलंय. महाराष्ट्रात NDRF च्या दोन तुकड्या तैनात आहेत. एक तुकडी लातूर तर दुसरी तुकडी सोलापूरला तैनात आहे.
तर बारामतीतही संततधार सुरू असल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
कर्नाटकातही अनेक शहरांमध्ये पाणी साचलं आहे. राज्य आणि केंद्र सरकार कर्नाटकातल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून पावसासंबंधीच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिल्याचं सांगितलं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही ट्वीट करत तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)