You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकनाथ खडसे : 'माझ्या सल्ल्यानेच भाजपच्या माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश' #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1) होय, माझ्या सल्ल्यानेच माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश - एकनाथ खडसे
भाजपचे माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आपण खडसेंच्या आदेशानेच राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे पाडवी म्हणाले आणि खडसेंनीही त्यांच्या या विधानाला दुजोरा दिला आहे. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिली.
राष्ट्रवादीत प्रवेशावेळी पाडवी म्हणाले, "ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक एकनाथ खडसे यांच्या आदेशाने आणि सल्ल्याने मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला."
पाडवींच्या या वक्तव्याबाबत माध्यमांनी एकनाथ खडसेंना विचारलं असता, खडसेंनीही ते मान्य केलं. तसंच, अनेक सहकारी आहेत, जे माझ्यावर विश्वास ठेवत पक्षांतर करतात, असंही खडसे म्हणाले.
एकीकडे एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे अशी वक्तव्य आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना आणखीच उधाण आलं आहे.
2) डिसेंबरपूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते - प्रकाश आंबेडकर
केंद्र सरकार विरूद्ध महाराष्ट्र सरकार या संघर्षातून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते, असा अंदाज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
" राज्य सरकार सातत्याने केंद्राच्या विरोधात भूमिका घेत आहे. केंद्राचे कायदे नाकारले जात आहेत. देशात सध्या अनलॉक प्रक्रिया सुरू आहे. अनेक निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. केंद्राने मंदिरे खुली करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, राज्य सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही. सामान्यांना आजही लोकलची प्रतीक्षा आहे," या गोष्टी नमूद करत प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रपती राजवटीचा अंदाज वर्तवला आहे.
"केंद्राच्या निर्णयाला छेद देणारी भूमिका सातत्याने राज्य सरकार घेत आहे. प्रत्यक्षात घटनेनुसार राज्याला केंद्र सरकारविरोधात जाता येत नाही. पण, महाराष्ट्रात मात्र तसे घडते आहे. त्यातून एक वेगळाच संघर्ष सुरू झाला असून यातून महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीकडे ढकलला जात आहे," असंही आंबेडकर म्हणाले.
3) चंद्रकांत पाटील म्हणतात, 'यांच्या बापाची पेंड आहे का?'
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबावर टीका केली आहे. दोनच दिवसांपूर्वीच अजित पवारांना उद्देशून 'तुमचे बाप आहोत' म्हटलं होतं. आता चंद्रकांत पाटलांनी बारामती बाजार समितीच्या एका निर्णयामुळे टीका केलीय. ही बातमी एबीपी माझाने दिलीय.
"राज्य सरकारने कृषी विधेयकाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने फतवा काढला आणि बाजार समितीच्या आवाराच्या बाहेर देखील शेतकऱ्यांकडून सेस गोळा केला जाईल असं जाहीर केलं. यांच्या बापाची पेंड आहे का," असा सवाल चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला आहे.
केंद्र सरकारने संमत केलेल्या तीन कृषी विधेयकांचं समर्थन करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंडपासून चौफुल्यापर्यंत एका ट्रॅक्टर रॅलीचे भाजपतर्फे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.
4) CBI ला खोटी माहिती देणाऱ्या शेजारणीवर कारवाई करा - रिया चक्रवर्ती
अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने तिच्या शेजारणीविरोधात सीबीआयकडे तक्रार केली आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात खोटी माहिती आणि चुकीचे आरोप करून तपासाची दिशाभूल केल्याचा आरोप रियाने शेजारणीवर केला आहे. एनडीटीव्हीनं ही बातमी दिली आहे.
13 जून रोजी म्हणजे सुशांतने आत्महत्या करण्याच्या आदल्या दिवशी रियाला तिच्या घरी येऊन सोडलं होतं, अशी माहिती शेजारणीने दिली होती. ही माहिती खोटी असल्याचा दावा रियाचा आहे.
शेजारणीने दिलेली माहिती तपासाची दिशाभूल करणारी असून, तिला या प्रकरणी शिक्षा व्हावी, असं रियाने सीबीआयला दिलेल्या पत्रात म्हटलंय. शिवाय, काही माध्यमांनी खोट्या बातम्या चालवल्याचा उल्लेखही रियाने या पत्रात केला आहे.
5) कंगना राणावत आणि कुणाल कामरामध्ये ट्विटरवर सामना
कॉमेडीयन कुणाल कामरा आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यात ट्विटरवर शाब्दिक सामना रंगला. खरंतर या प्रकरणाची सुरुवात कंगना राणावतने केली. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
कंगना राणावतने कुणाल कामरा आणि संजय राऊत यांचा फोटो ट्वीट करून टिप्पणी केली. त्यानंतर मग कुणाल कामराने त्या ट्वीटला उत्तर देत म्हटलं, "मॅडम, वीज तर इकडे गेलीय, तुमचं फ्युज का उडतंय?"
मुंबईत वीज खंडित झाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर कंगनाने हे ट्वीट केलं होतं. मात्र, कुणाल कामराने तिला उत्तर दिल्याने आता कंगना आणखी पुढे काही बोलते का, हे पाहावे लागेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)