MPSC परीक्षा पुढे ढकलली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

MPSC ची 200 जागांसाठी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा संघटनांनी MPSC परीक्षांना विरोध दर्शवला होता. ही परीक्षा 11 ऑक्टोबर रोजी नियोजित होती.

याआधी 2 वेळा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

लवकरच MPSC शी चर्चा करून पुढची तारीख जाहीर केली जाईल, तसंच आता जे विद्यार्थी पात्र आहेत त्यातील एकही विद्यार्थी अपात्र ठरवला जाणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

तसंच विद्यार्थ्यांच्या मागण्या होत्या म्हणून परीक्षा पुढे ढकलल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

मराठा संघटना आणि इतर लोकांच्यासुद्धा परीक्षा पुढे ढकलण्यासाठी मागण्या आल्याचं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे.

सह्याद्री अथितीगृहात एक बैठक झाली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्री अशोक चव्हाण, जयंत पाटील, छगन भुजबळ आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते. सायंकाळी साडेचार वाजता ही बैठक सुरू झाली होती.

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

"येत्या 11 तारखेला MPSC ची 200 जागांसाठीची परीक्षा नियोजित होती. पण गेल्या चार महिन्यांमध्ये शाळा, कॉलेज, अभ्यासिका वर्ग बंद होते, त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणं शक्य झालं झाली नाही. त्यांना अभ्यासासाठी अवधी मिळण्यासाठी ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला," अशी माहिती मुख्य़मंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

"ही परीक्षा देण्यास यावेळी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना कधीही ही परीक्षा देण्यात येणार आहे, त्यामुळे वयोमर्यादा वाढवण्याची आवश्यकता भासणार नाही," असं ठाकरे यांनी सांगितलं.

दरम्यान, परीक्षा पुढे ढकलण्याचं कारण मराठा आरक्षण नसून कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यासाठी कुणाचा दबाव नाही, असं मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

MPSC परीक्षा रद्द करण्याची मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली होती. मराठा समाजाच्या भावनांचा आदर राखून परीक्षा पुढे ढकण्याचा निर्णय घेतल्याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

MPSC परीक्षा तत्काळ पुढे ढकला - संभाजीराजे

दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईत झालेल्या एका बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी MPSC परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

ही परीक्षा पुढे ढकलण्यासाठी त्यांनी कोरोनाचंही कारण पुढे केलं होतं. परीक्षा पुढे न ढकलल्यास सरकारला वाईट परिणाम भोगावे लागतील, असं वक्तव्य संभाजीराजे यांनी त्यावेळी केलं होतं.

हीच भूमिका संभाजीराजे यांनी अजूनपर्यंत कायम ठेवली.

बीबीसीशी बोलताना संभाजीराजे म्हणाले होते, "आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज अत्यंत दुःखी आहे. समाजाला न्याय मिळाला पाहिजे. MPSC परीक्षा तत्काळ पुढे ढकलण्यात याव्यात. दोन ते तीन महिन्यांनी या परीक्षा घेता येऊ शकतात."

"या परीक्षा घेण्याऐवजी सरकारने गेल्यावर्षी पास झालेल्या सुमारे 400 उमेदवारांच्या नियुक्त्या कराव्यात. त्यांची नियुक्ती अजून करण्यात आली नाही, याकडे सरकारने लक्ष द्यावं," असं संभाजीराजे म्हणाले.

सध्या MPSC ची तयारी करणारे विद्यार्थी परीक्षा व्हाव्यात का होऊ नयेत, याविषयीची मतं सोशल मीडियावर मांडत होते.

संभाजीराजे यांच्या वक्तव्यानंतर काही एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे आमच्या भविष्यासोबत खेळणं झालं असं काही जणांचं म्हणणं आहे.

बीबीसी मराठीने या संदर्भात बातमी दिली होती. त्यावर विद्यार्थ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. बीबीसीचे वाचक राम शिंदे म्हणतात की "आमच्या भवितव्याशी खेळू नका. मुलं 4-5 वर्षांपासून परीक्षेची तयारी करतात."

तुमच्या मताशी कुणीही सहमत असणार नाही अशी प्रतिक्रिया बाबा भवर यांनी दिली आहे. ते म्हणतात मुलं 5-6 वर्षं तयारी करतात आणि परीक्षा पुढे ढकलली तर त्यांचं नुकसान होऊ शकतं.

बाहेरगावी राहणारी मुलं फक्त एका परीक्षासाठी येऊन पैसा खर्च करतात. जर मुलांच्या परीक्षा पुढे जाव्या असं वाटत असेल तर त्यांचा खर्च तुम्ही उचलावा असं बाबा भवर म्हणतात.

काही जणांचं म्हणणं आहे परीक्षा पुढे ढकलल्यास वर्ष जाणार नाही. पण परीक्षा दिवाळीनंतर व्हायला हवी.

दिवाळीनंतर परीक्षा घेतल्यास तोपर्यंत कदाचित कोरोनाची परिस्थिती काहीशी निवळली असेल आणि मराठा आरक्षणावर तोडगा निघेल असं काहींनी म्हटलंय.

तर आरक्षणासोबतच कोव्हिडचा विचार व्हावा, ग्रामीण भागातले अनेक विद्यार्थी UPSC ला बसू शकले नाहीत, हे विचारात घ्यावं असं काहींचं म्हणणं आहे.

पण ही परीक्षा यापूर्वी तीनदा पुढे ढकलण्यात आलेली असल्याने विद्यार्थ्यांच्या मनःस्थितीचा विचार करत आता ही परीक्षा घ्यावी असंही काहींनी ट्वीट केलंय.

तर परीक्षा केंद्रापर्यंत कसं पोहोचायचं याचं नियोजन करावं लागत असल्याने सरकारने परीक्षा होणार की नाही हे आधीच जाहीर करावं, शेवटच्या क्षणी घोषणा करू नये, असाही विचार मांडण्यात आलाय.

परीक्षा अगदी चार दिवसांवर आलेली असताना सुरू असलेल्या या वादाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मनःस्थितीवर होत असल्याने लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, असंही काहींनी म्हटलंय.

NEET, JEE परीक्षा पुढे ढकलण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाणाऱ्या सरकारला MPSCची परीक्षा घेण्याची घाई का आहे, असाही सवाल काहींनी केलाय.

परीक्षांना करण्यात येणारा विरोध म्हणजे या विषयाचं राजकारण करण्यात येत असल्याचं मत काहीजणांनी मांडलंय.

MPSC ची परीक्षा वेळेवर होऊ द्यावी आणि दुसरीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा असं मत मराठा समाजातल्याच काही मुलांनी मांडलंय.

गरजू उमेदवारांची महत्त्वाची वर्षं वाया जाऊ देऊ नयेत, परीक्षा होऊ द्याव्या आणि निकाल आरक्षणाप्रमाणे लावता येऊ शकतो, असं काहींनी म्हटलंय.

MPSC च्या परीक्षेसाठी 11 ऑक्टोबरची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून याबाबत खासदार संभाजीराजेंनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. राज्य सरकारने मराठा समाजाचं ऐकलं नाही, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)