You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उदयनराजे-संभाजीराजे छत्रपती यांच्यात कसलंही भांडण नाही- चंद्रकांत पाटील
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठीसाठी
उदयनराजे राजे आणि छत्रपती संभाजीराजे यांचे एकमेकांच्या घराण्याशी चांगले संबंध आहेत. दोन्ही नेते मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर सुशांत सिंग राजपूत प्रकरण, टीआरपी घोटाळा, एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराच्या चर्चा अनेक मुद्यांवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं. बीबीसी मराठीला त्यांनी दिलेली ही मुलाखत.
MPSCची परीक्षा होऊ देणार नाही असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. भाजपची काय भूमिका आहे?
इतके दिवस सरकार काय झोपा काढतंय का? संबंधित घटकांच्या बैठका घेऊन यावर चर्चा केली पाहीजे. परीक्षा घेतली तर काय नाही? घेतली तर काय? हे बघितलं पाहीजे. सरकार हाताची घडी घालून बसणार असेल तर ते चालणार नाही. मराठा समाजाने त्यांच्या भावना काही आज व्यक्त केल्या नाहीत. गेले अनेक दिवस ते करतायेत. लाखो विद्यार्थी परीक्षेला बसणार आहे. सरकारने लवकरात लवकर बैठक घेऊन भूमिका घ्यावी.
तुमचं काय मत आहे परीक्षा व्हावी की नाही?
सरकारने बैठक घेऊन चर्चा करून निर्णय करावा.
MPSCची परीक्षा रद्द केली तर मराठा विद्यार्थ्यांबरोबर इतर विद्यार्थ्यांचंही नुकसान होईल असं काही विद्यार्थी संघटनांचं म्हणणं आहे?
मला तेच म्हणायचं आहे. राज्य चालवताना खुर्ची खूप चांगली वाटते. आता हे विषय अंगावर घेतले पाहिजेत. त्यामुळे दोन्ही बाजू ऐकून तातडीने निर्णय करावा.
याचा अर्थ संभाजी राजे यांची भूमिका पक्षाची नसून ती व्यक्तिगत आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला?
संभाजी राजे हे मराठा समाजाचे नेतृत्व करताहेत. ते नेतृत्व करत असताना त्यांची जी भूमिका आहे ती त्यांनी स्पष्ट केली.
शरद पवार यांनी म्हटलं आहे की मराठा आरक्षणाबाबत बोलणारे दोन्ही राजे हे भाजपकडून खासदार आहेत. त्यांनी केंद्रात जाऊन प्रश्न सोडवावा?
गेली 10 वर्षे त्यांचं राज्यातही सरकार होतं आणि केंद्रातही होतं हे इतकं सोपं होतं तर मग हे अज्ञान आहे की कांगावा आहे. मला असं वाटतं कांगावा आहे. राजस्थानमध्ये आंदोलन झालं, गुजरातमध्ये आंदोलन झालं पण हा केंद्र सरकारला असा निर्णय करता येत नाही. हा राज्याचा विषय आहे राज्याने सोडवावा.
तामिळनाडूच्या आरक्षणाला स्टे मिळालेला नाही. ते कोर्टात प्रलंबित आहे. शरद पवारांना माझा प्रश्न आहे की 1995 ते 1999 सोडलं तर केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार होतं. बेळगाव सीमावाद असू दे किंवा मराठा आरक्षण तुम्ही का नाही निर्णय घेतला.
उदयनराजे यांनी म्हटलेलं होतं की मराठा आरक्षण देता येत नसेल तर जातीनिहाय आरक्षण रद्द करा. यावर टीका करताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलय, एक राजा बिनडोक आहे,अशा लोकांना भाजप राज्यसभेवर कसं पाठवू शकतं?
प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. उदयनराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. संभाजी राजे हे छत्रपती शाहू महाराजांचे वंशज आहेत. ही तीनही घराणी मोठी आहेत. त्यामुळे एकमेकांची प्रतिष्ठा जपली पाहीजे. प्रकाश आंबेडकरांना मी आवाहन करेन शब्द आणू नये.
जसं तुम्ही म्हणालात की संभाजी राजे मराठा आरक्षणाचं नेतृत्व करतायेत. उदयनराजे हे सुध्दा अनेक मराठा संघटनांशी चर्चा करताहेत. पण ते एकत्रित येऊन काही करताना दिसत नाहीयेत. यामुळे मराठा आंदोलनात एकवाक्यतेची कमतरता जाणवतेय. तुम्हाला वाटतं या दोन्ही राजांनी एकत्र येऊन काम करावं? त्यांना एकत्र आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का?
मराठा समाजाचं आरक्षण सुप्रीम कोर्टात 'स्टे' झालं आहे. त्यामुळे सर्वांनीचं हातावर हात ठेवून काम केलं पाहीजे. दोन्ही राजांनी एकत्र येऊन काम करावं हे म्हणण्यासाठी मी खूप लहान आहे. पण आम्ही प्रयत्न करू. खरंतर काही राजकीय नेत्यांनी हेतू पुरस्कृत मिडीयासमोर निर्माण केलेला हा वाद आहे. त्यांचे एकमेकांशी अतिशय चांगले संबंध आहेत. ते काही एकमेकांच्या विरोधात नाहीयेत.
मग ते बैठकांना किंवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणं का टाळतात?
त्यांचे एकमेकांशी अतिशय चांगले संबंध आहेत. हा जो काही अनावश्यक वाद निर्माण होतोय, राजे वगैरे तो सोडवायला ते समर्थ आहेत. आमच्यासारख्यांचा खारीचा वाटा असेल तर तो ही प्रयत्न करू.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणी ज्या भाजपच्या नेत्यांनी मुंबई पोलीसांची बदनामी केली त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटल होतं. तुम्ही मागणार आहात माफी?
महाराष्ट्र म्हणजे काय संजय राऊत आहे काय? काय महाराष्ट्र महाराष्ट्र लावलं आहे. जगातल्या दोन देशांची संख्या सोडली तर त्यापेक्षा जास्त कोरोना रूग्णांची संख्या महाराष्ट्रात जास्त आहे त्याने बदनामी होत नाही महाराष्ट्राची...? रोज उठून बलात्कार होताहेत, क्वारंटाईन सेंटरमध्ये विनयभंग होतायेत आणि महाराष्ट्राची बदनामी आम्हाला शिकवता का तुम्ही.
भाजपने कधीही सुशांत सिंह राजपूत प्रकरणी आत्महत्या आहे की हत्या हे म्हटलेलं नाही. मुंबई पोलीस हे अतिशय सक्षम आहेत. राज्यकर्त्यांच्या दबावामुळे त्यांनी सुशांत सिंग प्रकरणी 55 दिवस त्यांनी एफआयआर दाखल करून घेतला नाही. सुशांतच्या वडीलांनी सीबीआयकडे केस द्यावी ही मागणी केली. आम्ही हे म्हटलं की त्यांच्या वडिलांना वाटतय की सीबीआयकडे द्यावं तर दिलं पाहीजे. बरं सीबीआयकडे कोणी दिलं तर सुप्रीम कोर्टाने दिलं. आम्ही दिलं का? काय चाललंय काय नाटक?
मुंबई पोलीस आयुक्तांनी टीआरपी घोटाळा झाल्याचं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. त्यांनी थेट अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक चॅनलचं नावं घेतलं आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे?
पोलीस विभागाची ही नवीन कार्यपद्धती कधीपासून सुरू झाली काही माहिती नाही. मुंबई पोलीस हे सक्षम आहेत. तिघाडीचं सरकारही चालू आहे. चौकशी करा, कारवाया करा आमचा यात काही संबंध नाही.
एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत?
आज दिवसभर नाथाभाऊ बैठकीत होते. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होते पण दिवसभर होते. पंकजाताई लंडनहून बैठकीला उपस्थित होत्या. तिथेच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रश्न संपतो.
एकनाथ खडसे हे उघडपणे तुमच्या पक्षाच्या नेत्यांवर टीका करताना दिसतात. त्यांच्यावर पक्ष कारवाई करणार आहे का?
नाही. ते आमचे पालक आहेत. आमचं काही चुकलं तर थोबाडीत मारण्याचा अधिकार त्यांना आहे. पण बंद खोलीत मारा सारखे टिव्ही चॅनल कशाला लागतात. आमचे वडील आहेत ते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)