You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रामविलास पासवान यांचं निधन
केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांचं गुरुवारी (8 ऑक्टोबर) संध्याकाळी निधन झालं आहे. त्यांचा मुलगा आणि लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. दिल्लीतल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
बिहारमध्ये निवडणुका सुरू असतानाच पासवान यांचं निधन झालं आहे.
आपल्या वडिलांसोबतचा एक जुना फोटो शेअर करताना चिराग यांनी लिहिलं, "पप्पा, तुम्ही आता या जगात नाही. पण मला माहीत आहे, तुम्ही नेहमी आमच्या सोबत असाल, मिस यू पप्पा."
रामविलास पासवान केंद्र सरकारमध्ये ग्राहक संरक्षण मंत्री होते. गेले काही दिवस त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली.
"केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनाने दुःख झाले. राजकारणात प्रदीर्घ अनुभव असलेल्या पासवान यांची सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेली होती, त्यांच्या निधनाने शोषित, दुर्बल घटकांसाठी लढणारा नेता हरपला आहे,"असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
50 वर्षांचं सार्वजनिक जीवन
1969 पासूनच रामविलास पासवान यांनी राजकारणात विविध पदांवर काम केलं. आपल्या कारकिर्दीत बहुतांश काळ ते सत्ताधारी पक्षांसोबतच होते. त्यामुळे त्यांना राजकारणातले हवामान शास्त्रज्ञ असं संबोधलं जायचं.
बिहार पोलिसातील नोकरी सोडून रामविलास पासवान राजकारणात आले. कांशिराम आणि मायावती यांच्या लोकप्रियतेच्या काळातही बिहारमध्ये दलितांचे प्रमुख नेते म्हणून त्यांना ओळखलं जात असे.
1996 नंतरच्या सर्व सरकारांमध्ये मंत्री
रामविलास पासवान यांची राजकीय कारकिर्द 50 वर्षांची राहिली. 1996 नंतर ते पूर्णवेळ सत्तेत होते. 1996 नंतरच्या प्रत्येक सरकारमध्ये ते सहभागी होते. यामध्ये त्यांना प्रत्येकवेळी मंत्रिपद उपभोगायला मिळालं.
देवेगौडा-गुजराल यांच्यापासून अटलबिहारी वाजपेयी, मनमोहनसिंह आणि आता नरेंद्र मोदी या पंतप्रधानांसोबत त्यांनी काम केलं.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत जनता दल-भाजप आघाडीमध्ये रामविलास पासवान यांनी त्यांच्या पक्षाला 6 जागा मिळवून देण्यात यश मिळवलं. या सहाच्या सहा ठिकाणी त्यांच्या पक्षाने विजय मिळवला. तसंच स्वतःला आसाममधून राज्यसभेतलं तिकीट मिळण्याची सोयही त्यांनी करून ठेवली.
गुजरात दंगली आणि धर्मनिरपेक्षतेच्या कारणावरून त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते 2004 ला संयुक्त पुरोगामी आघाडीत सहभागी झाले आणि मंत्रिपदी वर्णीही लागली.
2009 मध्ये ते UPA पासून वेगळे झाले. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2014 ला निवडणुकीचं वारं ओळखून भाजपसोबत आघाडी केली.
यादरम्यान त्यांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर मौन बाळगणं, उत्तम समजलं. या काळात त्यांच्या घरात चालणारी इफ्तार पार्टीसुद्धा बंद झाली होती, हे विशेष.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)