You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तेव्हा रामविलास पासवान म्हणाले, 'दलिताने आयुष्यभर भीक मागावी ही तुमची मानसिकता आहे’
- Author, अपूर्व कृष्ण
- Role, बीबीसी प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री 74 वर्षीय रामविलास पासवान यांचं गुरुवारी दिल्लीत निधन झालं. त्यांचे चिरंजीव चिराग पासवान यांनी यासंबंधीची माहिती दिली.
गेले अनेक दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती आणि त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. केंद्रातल्या बहुतांश सरकारमध्ये मंत्रिपद भूषवणाऱ्या रामविलास पासवान यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. त्यांना राजकारणाचे हवामानतज्ज्ञ म्हटलं जायचं.
रामविलास पासवान - 1977 च्या निवडणुकीनंतर संपूर्ण देशाने हे नाव ऐकलं. बिहारमधल्या एका जागेवरून एक उमेदवार इतक्या प्रचंड मतांनी निवडून आला की त्याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली, अशा बातम्या त्यावेळी झळकल्या होत्या.
त्या निवडणुकीत रामविलास पासवान यांनी जनता पार्टीच्या तिकिटावरून हाजीपूर मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराला तब्बल सव्वा चार लाख मतांनी पराभूत करत लोकसभेत पाऊल ठेवलं होतं.
या निवडणुकीच्या आठ वर्षांपूर्वी पासवान आमदारकीची निवडणूक जिंकले होते. मात्र, 1977 च्या निवडणुकीने रामविलास पासवान यांना राष्ट्रीय नेते म्हणून प्रस्थापित केलं. पुढे चार दशकांहून अधिक काळ त्यांनी राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली.
ते 9 वेळा खासदार म्हणून निवडून गेले. 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत 1984 आणि 2009 या दोन वेळाच त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
1989 नंतर नरसिंह राव आणि मनमोहन सिंह यांच्या दुसऱ्या यूपीए सरकारला वगळता त्यांनी प्रत्येक सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलं.
तिसऱ्या आघाडीच्या सरकारमध्येही ते मंत्री होते. काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील यूपीए सरकारमध्येही आणि भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकारमध्येसुद्धा. ते भारतातले एकमेव असे नेते आहेत ज्यांनी 6 पंतप्रधानांच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळवलं.
विश्वनाथ प्रताप सिंह यांच्यापासून ते एच. डी. देवेगौडा, आय. के. गुजराल, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंह आणि नरेंद्र मोदी अशा वेगवेगळ्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळवू शकण्याच्या त्यांच्या या कौशल्यावरच उपहासात्मक टीका करताना त्यांचे एकेकाळचे सहकारी आणि पुढे राजकीय विरोधक बनलेले लालू प्रसाद यादव यांनी त्यांना राजकारणाचे 'हवामान तज्ज्ञ' म्हटलं होतं.
असं म्हणतात की आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत रामविलास पासवान केवळ एकदा राजकीय वाऱ्याची दिशा ओळखण्यात चुकले. 2009 साली ते काँग्रेस सोडून लालू प्रसाद यादव यांच्यासोबत गेले आणि ज्या हाजीपूर मतदारसंघातून ते विक्रमी मतांनी निवडून यायचे त्याच मतदारसंघातून पराभूत झाले.
मात्र, या चुकीचीही भरपाई त्यांनी पुढच्याच वर्षी केली. त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या मदतीने राज्यसभेची जागा मिळवली.
राजकीय खेळीत मातब्बर समजले जाणारे रामविलास पासवान यांना सुरुवातीपासूनच राजकारणात रस होता, अशातला भाग नाही.
डीएसपी म्हणून निवड आणि राजकारणी म्हणून कारकीर्द
बिहारच्या खगडिया जिल्ह्यातल्या एका दलित कुटुंबात जन्माला आलेले रामविलास पासवान अभ्यासात हुशार होते.
बिहारची प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण करून ते पोलीस उप-अधीक्षक म्हणजेच डीएसपी पदावर नियुक्त झाले.
मात्र, त्या काळी बिहारचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं होतं. याच दरम्यान रामविलास पासवान यांची भेट बेगूसरायमधल्या एका समाजवादी नेत्याशी झाली. त्यांनीच रामविलास पासवान यांचं कौशल्य हेरून त्यांना राजकारणात पाऊल ठेवण्याची प्रेरणा दिली.
1969 साली ते संयुक्त सोशलिस्ट पक्षाच्या तिकीटावरून अलौली मतदारसंघातून निवडणूक लढले आणि इथूनच त्यांच्या राजकीय जीवनाचा शुभारंभ झाला.
पुढे ते जेपी आंदोलनातही सहभागी झाले आणि 1975 च्या आणीबाणीनंतर जवळपास दोन वर्षं तुरुंगातही काढले.
मात्र, सुरुवातीला त्यांची गणती बिहारच्या मोठ्या तरुण नेत्यांमध्ये होत नव्हती.
ज्येष्ठ पत्रकार अरविंद मोहन सांगतात की, विद्यार्थी आंदोलन आणि जेपी आंदोलनादरम्यान लालू प्रसाद यादव, नितीश कुमार, सुशीलकुमार मोदी, शिवानंद तिवारी, वशिष्ठ नारायण सिंह यासारख्या नेत्यांची नावं कानावर यायची. मात्र, रामविलास पासवान हे नाव 1977 च्या निवडणुकीनंतरच गाजलं.
अरविंद मोहन सांगतात, "पासवान यांचं नाव फारसं ऐकिवात नव्हतं. कारण 1974 च्या नेतृत्त्वामध्ये त्यांचं नाव नव्हतं. निर्णय घेणाऱ्यांमध्ये ते नव्हते. त्यांना तिकीट मिळालं कारण ते दलित होते आणि एकदा आमदरकीची निवडणूक जिंकलेही होते. 1977 च्या निवडणुकीत त्यांच्याकडे लक्ष वेधलं गेलं. कारण एवढ्या मोठ्या मताधिक्याने निवडून येणारा कोण, याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता होती."
या निवडणुकीनंतर मात्र रामविलास पासवान यांनी संसदेच्या व्यासपीठाचा पूरेपूर वापर केल्याचं अरविंद मोहन सांगतात.
ते म्हणतात, "सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांची गणना व्हायची. ते बरंच वाचन-लेखन करायचे. प्रत्येक मुद्द्यावर प्रश्न विचारायचे. यामुळे त्यांची प्रतिमा झपाट्याने बदलली आणि म्हणूनच जे नवीन तरूण नेतृत्त्व पुढे आलं त्यात त्यांचीही गणना झाली."
बिहारचे दलित नेते
1977 नंतर 1980च्या निवडणुकीतही सहज विजय मिळवत रामविलास पासवान यांनी संसद आणि केंद्राच्या राजकारणात आपला ठसा कायम ठेवला. मात्र, इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर 1984 सालची निवडणूक ते हरले.
अरविंद मोहन सांगतात की त्यावेळी देशात दलित उत्थानाचं राजकारण गाजत होतं. त्यावेळी रामविलास पासवान यांनी हरिद्वार, मुरादाबाद यासारख्या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत जात दलित नेत्याची आपली प्रतिमा मजबूत करण्याचा प्रयत्न केला. इथूच त्यांनी बिहारच्या बाहेर राजकारणाचा मार्ग प्रशस्त केला आणि दिल्लीशी जोडले गेले.
ते म्हणतात, "पासवान कांशीराम किंवा मायावती यांच्या पातळीचे नेते होऊ शकले नसले तरीही देशात जेव्हा-जेव्हा दलित नेत्यांचं नाव घेतलं जाईल तेव्हा त्यात रामविलास पासवान यांचंही नाव असेल."
अरविंद मोहन यांच्या मते मतांचं ध्रुवीकरण त्यांची सर्वांत मोठी ताकद होती. राजकारणात कुणाही नेत्याकडे 10% मतं असतील तर त्या नेत्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.
याच ताकदीच्या बळावर त्यांनी 2000 साली संयुक्त जनता दलाची साथ सोडून स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला - लोक जनशक्ती पार्टी.
पाटण्यातले ज्येष्ठ पत्रकार मणिकांत ठाकूरदेखील सांगतात की रामविलास पासवान त्यांच्या समाजाचे मोठे नेते म्हणून नावारूपास आले आणि याचा त्यांना फायदाही झाला.
मणिकांत ठाकूर म्हणतात, "बिहारमधल्या सर्व दलितांमध्ये पासवान जातीत सर्वाधिक आक्रमकता बघायला मिळते. एखाद्या परिसरात बऱ्याच दलित जातीचे लोक असतील आणि त्यात पासवानही असेल तर वर्चस्व पासवानांचं असतं. याचा रामविलास पासवान यांनाही फायदा झाला आणि त्यांच्या पक्षाचा विस्तारही झाला."
मात्र, रामविलास पासवान यांनी दलितांसाठी काय केलं?
अरविंद मोहन सांगतात की रामविलास पासवान यांनी बहुजन समाज पक्ष किंवा आंबेडकरांप्रमाणे दलितांसाठी कधीच आंदोलन केलं नाही. मात्र, राज्यघटनेने दलितांना जे अधिकार दिलेत त्यावर गदा येत असेल तर त्यासंबंधी पासवान आक्रमकपणे बोलायचे.
अरविंद मोहन सांगतात, "राज्यघटनेत असेलल्या कायद्यांना कायम राखणं, हादेखील दलित राजकारणाचा महत्त्वाचा भाग आहे. रामविलासजींसारख्या नेत्यांची उपस्थिती यासाठी महत्त्वाची असते. या मुद्द्यावरून कधी त्यांनी आंदोलन केलं किंवा सरकारमधून बाहेर पडले, असं कधीच झालं नाही. मात्र, संधी मिळाल्यावर त्यावर बोलायचे."
पासवान दलितांमधले सर्वाधिक यशस्वी नेते असल्याचं सांगत मोहन म्हणतात, "बहुजन समाज पक्षाचा वेगाने उत्कर्ष झाला. दलितांच्या आयुष्यावरही त्याचा मोठा परिणाम झाला. मात्र, पुढे हा पक्ष भ्रष्टाचारात अडकला आणि जातीय द्वेषाला खतपाणी घातलं. पासवानांच्या राजकारणात असं कधीच घडलं नाही."
काम करणारे मंत्री
रामविलास पासवान यांना पहिल्यांदा मंत्रिपद मिळालं ते व्ही. पी. सिंह यांच्या सरकारमध्ये. या सरकारमध्ये ते कामगार मंत्री होते. त्यानंतर पुढे वेगवेगळ्या सरकारमध्ये त्यांनी रेल्वे, खणिकर्म, रसायन आणि उर्वरक, ग्राहक आणि खाद्य यासारख्या वेगवेगळ्या मंत्रालयाची जबाबदारी पार पाडली.
रेल्वे मंत्री असताना त्यांनी बिहारमधल्या आपल्या हाजीपूर मतदारसंघात रेल्वेचं प्रादेशिक कार्यालय स्थापन केलं.
मणिकांत ठाकूर सांगतात की यात पासवान यांचं मोठं योगदान होतं आणि अधिकाऱ्यांवर दबाव टाकून कसं काम करून घ्यायचं, याची त्यांना चांगलीच जाण होती.
ते म्हणतात, "रामविलास पासवान म्हणायेच की विकासासंबंधी कुठलीही गोष्ट म्हटल्यानतंर प्रशासकीय अधिकारी काहीतरी अडथळा आणायचे. त्यामुळे आम्ही त्यांना हे काम होईल की नाही, असं विचारायचोच नाही. आम्ही त्यांना सांगायचो की हे काम करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हीच मार्ग शोधा. असं केल्यानंतर कामं होऊ लागली."
अधिकाऱ्यांकडून काम करवून घेण्यात रामविलास पासवान यांचा हातखंडा होता, हे अरविंद मोहनदेखील मान्य करतात. ते म्हणतात बिहारमध्ये जेपी आंदोलनातून जे तीन तरूण नेते उदयास आले त्यापैकी लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्याप्रमाणेच रामविलास पासवान यांनाही राज्यकारभार सांभाळण्याची संधी मिळाली असती तर कदाचित चित्र वेगळं असतं.
ते म्हणतात, "त्यांना संधी मिळाली असती तर कदाचित बिहारचं रुप वेगळं दिसलं असतं. कारण रेल्वे मंत्री म्हणून त्यांनी बिहारसाठी जे काम केलं ते आदर्श नसलं तरी त्यातून त्यांनी किती तत्परतेने कामं केली, हे दिसतं."
मात्र, रेल्वेमंत्री असताना त्यांच्यावरही आरोप झाल्याकडे मणिकांत ठाकूर लक्ष वेधतात.
ते म्हणतात, "कुठल्याच घोटाळ्याची कधी चर्चा झाली नसली तरी सामान्य जनतेत ही चर्चा असायची की ते जिथे-जिथे मंत्री होते तिथे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ते तत्पर असल्याचं कधीच दिसलं नाही."
घराणं आणि घराणेशाही
रामविलास पासवान यांच्या राजकारणाप्रमाणेच त्यांच्या कुटुंबाचीही बरीच चर्चा व्हायची.
रामविलास पासवान यांनी दोन लग्नं केली होती. त्यांच्या पहिल्या पत्नी ग्रामीण पार्श्वभूमी असणाऱ्या होत्या. त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला गावातच सोडल्याची टीकाही त्यांच्यावर व्हायची. पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन मुली आहेत. रामविलास पासवान यांनी नामांकन अर्ज भरताना जी माहिती दिली त्यानुसार त्यांनी पहिली पत्नी राजकुमारी देवी यांना 1981 साली त्यांनी घटस्फोट दिला.
काही वर्षांनंतर त्यांनी दुसरं लग्न केलं. त्यांच्या दुसऱ्या पत्नी रीना शर्मा एअर हॉस्टेस होत्या. दुसऱ्या पत्नीपासून त्यांना चिराग पासवान आणि आणखी एक मुलगी आहे.
मणिकांत ठाकूर सांगतात की त्यांच्या पत्नींविषयी चर्चा व्हायच्या आणि यावरून वादही झाला होता.
ते सांगतात, "अनेकदा अशी टीका झाली की त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला सोडलं. मात्र, आम्ही बघितलं की पासवान भावंडांमध्ये इतकं प्रेम होतं की वाटावं जणू एकमेकांसाठी जीवही देतील. घरात यावरून काही वाद असतील, असं अजिबात वाटायचं नाही."
कुटुंबाप्रतीचं त्यांचं प्रेम त्यांच्या राजकारणावरही वरचढ होतं. 2019 च्या निवडणुकीत याची झलक दिसते. या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने ज्या सहा जागांवरून निवडणूक लढवली त्यातल्या तीन जागांवर पासवान यांचे नातेवाईकच रिंगणात होते.
मुलगा चिराग पासवान आणि पशुपती पारस आणि रामचंद्र पासवान हे दोघे भाऊ. तिघेही निवडणूक जिंकले. त्यानंतर रामविलास पासवानदेखील राज्यसभेवर गेले आणि अशाप्रकारे संसदेत सर्वांत मोठं घराणं कुठलं असेल तर ते रामविलास पासवान यांचं होतं.
मात्र, रामचंद्र पासवान यांच्या निवडणुकीचा निकाल आल्यानंतर दोनच महिन्यात त्यांचं आजाराने निधन झालं. छोट्या भावाच्या मृत्यूने रामविलास पासवान खूपच दुखावले गेल्याचं सांगितलं जातं.
मणिकांत ठाकूर सांगतात की रामविलास पासवान यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत घराणेशाहीने त्यांचा पिच्छा केला. मात्र, त्यांनी कधीही यातून बाहेर पडण्याचा प्रयत्नही केला नाही.
ते सांगतात घराणेशाहीविषयी प्रश्न विचारल्यावर ते म्हणायचे, "आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतो त्यालाच पुढे करतो. यावर काही निर्बंध आहेत का? आमचा समाज मागास आहे आणि त्यात कुणी काम करणारा असेल तर आम्ही त्याचा वापर करतो."
मणिकांत ठाकूर हे पासवान यांच्या कुटुंबप्रेमाविषयी सांगतात की त्यांनी चिराग पासवानला पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा दिली आहे तर भावाचा मुलगा प्रिंस राजची बिहारच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
अरविंद मोहन हे पासवान यांच्यावर करण्यात येणाऱ्या घराणेशाहीच्या आरोपांचं विश्लेषण करताना म्हणतात की विचारधारा किंवा संघटना नसलेल्या प्रत्येकच पक्षात ही समस्या आहे. रामविलास पासवानसुद्धा ज्या-ज्या पक्षात होते त्या पक्षांनी कधीच संघटना मजबूत करण्यावर भर दिला नाही की विचारधारेला पुढे नेण्यावर भर दिला नाही.
ते असंही म्हणतात, "यासाठी त्यांना दोष देणं योग्य नाही. खरंतर कुटुंबीयांव्यतिरिक्त इतर कुणावर विश्वास ठेवणं आजच्या काळात शक्य नाही. संघटनेपेक्षा घरातल्या गोष्टी चव्हाट्यावर येण्याची जास्त भीती असते."
सुटाबुटातले दलित नेते
रामविलास पासवान यांच्या कुटुंबाप्रमाणेच त्यांच्या स्टाईलचीही बरीच चर्चा व्हायची.
पासवान ज्या पिढीचे आणि ज्या समाजाचे नेते होते त्यात त्यांनी स्वतःचा वेगळा मार्ग तयार केला. यात त्यांच्या जीवनशैलीचा खासकरून त्यांचा पेहरावाचाही हातभार आहे.
अरविंद मोहन यांनी 2018 साली बीबीसी हिंदीसाठी लिहिलेल्या एका लेखात एका घटनेचा उल्लेख केला होता. रामविलास पासवान यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांच्या 72 व्या वाढदिवसाची माहिती दिली होती.
त्यावर पासवान यांचे जुने सहकारी आणि आता राजकीय विरोधक असणारे शिवानंद तिवारी यांनी विचारलं होतं, "रामविलास भाई तुम्ही काय खाऊन वय थांबवलं आहे? आम्ही 75 गाठली असताना तुम्ही कसे काय अजून 72 वरच आहात?"
शिवानंद तिवारी यांनी पासवान 1969 सालीच आमदार झाल्याची आठवण करून दिली होती. त्यावेळी आमदारकीसाठीचं किमान वय जरी गृहित धरलं तरीही तुम्ही 75 वर्षांचे असाल, असं तिवारी यांनी म्हटलं होतं.
मणिकांत ठाकूर सांगतात की रामविलास पासवान यांना त्यांच्या 'फाईव्ह स्टार दलित नेत्याच्या' प्रतिमेविषयी विचारल्यावर ते चिडायचे.
त्यांचं उत्तर असायचं, "ही तुमची ती मानसिकता आहे की दलित म्हणजे त्याने आयुष्यभर भीक मागावी, गरिबीत रहावं आणि आम्ही हे तोडून पुढे जात आहोत तर तुम्हाला का त्रास होतोय?"
रामविलास पासवान कोण होते आणि काय म्हणून ते लक्षात राहतील, याचं उत्तर अरविंद मोहन एका ओळीत देतात. ते म्हणतात, "रामविलास पासवान यांनी कधीच खूप आदर्श राजकारण केलं नाही. मात्र, एका दलित कुटुंबात जन्माला येऊनसुद्धा कुणाचीही मदत न घेता किंवा कुठलीही पार्श्वभूमी नसताना इतक्या वर मजल मारणं यातून त्यांची महत्त्वाकांक्षा दिसते."
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)