You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राधे मा : बिग बॉसच्या घरातील स्वतःला देवीचा अवतार म्हणणारी स्पर्धक
स्वतःला देवीचा अवतार म्हणवणाऱ्या राधे मा कधी बॉलिवुडच्या गाण्यांवर थिरकताना दिसतात तर कधी आपल्या भक्तांना 'I Love You' म्हणताना दिसतात. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना गुलाबाचं फुलंही त्या देतात.
सध्या राधे मा चर्चेत आहेत ते 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमुळे. बिग बॉसच्या 14व्या सिझनमध्ये राधे मादेखील एक स्पर्धक आहेत आणि सोशल मीडियावर सध्या त्यांच्याविषयी बरीच चर्चा सुरू आहे.
राधे मा बिग बॉसच्या घरात
कलर्स वाहिनीने बिग बॉस सिझन 14 चा प्रोमो प्रसिद्ध करताच राधे मा पुन्हा चर्चेत आल्या. या प्रोमोमध्ये त्या बिग बॉसच्या घरात एन्ट्री करताना आणि घराला आशीर्वाद देताना दिसत आहेत.
या व्हीडियोमध्ये त्या म्हणतात, "ये घर हमेशा बना रहे. बिग बॉस इस बार बहुत चले"
मात्र, राधे मानी या कार्यक्रमात सहभागी होणं काही संन्यासिनींना पटलेलं नाही. काही सन्यासिनींनी याविरोधात एक दिवसाचा उपवास करत राधे मांवर कारवाई करण्याची मागणी आखाडा परिषदेकडे केल्याची बातमी काही प्रसार माध्यमांनी दिली आहे.
गाझियाबादच्या शिवशक्ती धाममधल्या सन्यासिनींनी अखिल भारतीय संत समिती आणि आखाडा परिषदेकडे याविषयीची तक्रार केल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे.
स्वतःला संत म्हणवून घेणाऱ्याने बिग बॉसच्या घरात जाण्याने संत परंपरेचा अपमान झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
दरम्यान, राधे मावरून उठलेला हा काही पहिलाच वाद नाही. राधे मा आणि वाद यांचं अतूट नातं आहे.
पंजाबमधल्या दोरांगला गावापासून बिग बॉसच्या घरापर्यंतचा राधे मां यांचा हा प्रवास अनेक वादांची वळणं घेऊन जातो.
कोण आहेत राधे मा?
हाती त्रिशूळ, गडद लाल रंगाचे वस्त्र, लालेलाल लिपस्टिक आणि केसात लाल गुलाबाचं फूल माळलेल्या राधे मा यांचं खरं नाव आहे सुखविंदर कौर.
1965 मध्ये पंजाबच्या गुरूदासपुर जिल्ह्यातील दोरांगला गावात सुखविंदर कौर यांचा जन्म झाला. दोघा भावांमध्ये सुखविंदर एकटीच बहीण होती.
लहानपणापासूनच राधे माचा ओढा हा अभ्यासापेक्षा आध्यात्माकडेच जास्त होता, असं दोरांगलाचे रहिवासी सांगतात.
वयाच्या 17व्या वर्षी त्यांचा विवाह मुकरियाच्या मोहन सिंह यांच्याशी झाला. पण ते नोकरीसाठी परदेशी गेल्यावर राधे माचा ओढा आध्यात्माकडेच राहिला.
घराजवळच्या काली मंदिरात त्या दिवसदिवसभर पूजाअर्चा करायच्या.
कालांतराने आजूबाजूचे लोक त्यांच्याभोवती जमा व्हायला लागले. राधे मा समोर कोणताही नवस मागितला की तो पूर्ण होतो, असा समज लोकांमध्ये तग धरू लागला.
हळूहळ राधे माची ख्याती पंजाबबाहेर इतर राज्यांमध्ये पसरू लागली. पंजाबशिवाय महाराष्ट्र आणि इतर राज्यातील लोक पण राधे माचे शिष्य होऊ लागले.
दोरांगलाच्या जवळपास प्रत्येक घरात राधे मांचे छायाचित्र पहायला मिळतं. नंतर राधे मा मुंबईला शिफ्ट झाल्या आणि तिथं त्यांनी एक आश्रम उघडला.
राधे मां आणि वाद
राधे मा वर अनेक आरोप झाले. विविध व्हीडिओंमधून त्या सोशल मीडियावर झळकू लागल्या आणि त्यावर अनेक वादही झाले.
राधे माच्या गावातले लोक आधी राधे मांचं कौतुक करताना थकत नव्हते. पण गुरमीत राम रहीमच्या प्रकरणानंतर मात्र गावातले त्यांचे शिष्य माध्यमांशी बोलणं टाळतात.
एरवी आपल्या दरबारात कायम लाल वस्रांमध्ये असणाऱ्या राधे मां यांचा 2015 मध्ये मिनी स्कर्टमधला फोटो बराच गाजला होता.
बराच वाद झाल्यानंतर आपल्या एका भक्तानेच आपल्याला तो स्कर्ट गिफ्ट केला होता आणि त्याच्या विनंतीवरून आपण तो घातल्याचं स्पष्टीकरण राधे मानी दिलं होतं.
2017 साली डेरा सच्चा सौदाचा प्रमुख आणि स्वतःला आध्यात्मिक गुरू म्हणवणारा बाबा गुरमित राम रहिम याला सीबीआय कोर्टाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर पंजाबमधल्या एका व्यक्तीने राधे मा विरोधातही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
राधे माविरोधात बोलत असल्याने त्या रात्री-अपरात्री फोन करून आपल्याला धमकावत असल्याचं या याचिकेत म्हटलं होतं. या याचिकेनंतर उच्च न्यायालयाने पोलिसांना राधे मा विरोधात FIR नोंदवण्याचे आदेश दिले होते.
राधे माच्या भक्तांच्या यादीत केवळ सामान्यांचाच नाही तर सेलिब्रेटिंचाही भरणा आहे. मग पॉप सिंगर दिलेर मेहंदी असो, अभिनेते आणि भाजप खासदार रवीकिशन, गायक हंसराज हंस, भोजपुरी गायक मनोज कुमार, टीव्ही कलाकार डॉली बिंद्रा, चंदेरी दुनियेतल्या अनेकांसोबतचे राधे माचे फोटो मीडियात आले.
मात्र, 2017 साली दिल्लीच्या विवेक विहार पोलीस ठाण्याचे एचएसओ संजय शर्मा यांनी राधे मा यांना चक्क एचएसओंच्या खुर्चीतच बसवलं. या फोटोवरूनही वाद झाला होता.
राधे माची एकेकाळची भक्त टीव्ही कलाकार डॉली बिंद्रानेही राधे मावर गंभीर आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली होती. राधे माच्या सांगण्यावरून आपला लैंगिक छळ करण्यात आल्याचा आरोप डॉली बिंद्राने केला होता.
तर मुंबईतच एका गृहिणीने राधेमांच्याच सांगण्यावरून तिच्या सासू-सासऱ्यांनी हुंड्यासाठी तिचा छळ केल्याची तक्रार दाखल केली होती.
काही वर्षांपूर्वी जेव्हा जगभरात सोशल मीडियावरून 'मी टू' चळवळ सुरू झाली होती. त्यावेळी राधे मा यांनी अशाप्रकारे सोशल मीडियावर उशिराने व्यक्त होणं चुकीचं असल्याचं म्हटलं होतं. अत्याचार झाल्याक्षणीच स्त्रियांनी आवाज उठवायला हवा, असं त्यांचं म्हणणं होतं. या वक्तव्यावरूनही त्यांना बरंच ट्रोल करण्यात आलं होतं.
2019 सालच्या कुंभ मेळ्यात राधे मा यांना शाही स्नानात सहभागी व्हायचं होतं. मात्र, त्यांना परवानगी नाकारण्यात आली होती.
आपल्या सत्संगांमध्ये बॉलीवुड गाण्यावर थिरकताना त्यांचे भक्त त्यांना उचलून घेतात. यावरूनही त्यांच्यावर बरीच टीका झालेली आहे. मात्र, हे भक्तांचं प्रेम असल्याचं राधे माचं म्हणणं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)