You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Bigg Boss: Siddharth Shukla ठरला 13व्या सीझनचा विजेता
अभिनेता सिद्धार्थ शुक्ला हा बिग बॉसच्या 13व्या सीझनचा विजेता ठरला. शनिवारी रात्री कलर्स टीव्हीवर झालेल्या अखेरच्या टप्प्यात सिद्धार्थ आणि असीम रियाज यांच्यात अंतिम मुकाबला रंगला.
यापूर्वी 6 फायनलिस्ट होते - सिद्धार्थ, आसिम यांच्याव्यतिरिक्त शहनाज गिल, आरती सिंह, पारस छाब्रा आणि रश्मी देसाई.
अंतिम एपिसोडमध्ये एलिमिनेशनपूर्वी पारस छाब्रा याने स्वतःहून बिग बॉस हाऊसमधून 10 लाख रुपये घेऊन बाहेर पडणं पसंत केलं. त्यानंतर आरती सिंह, शहनाझ गिल आणि रश्मी देसाई या एक एक करून एलिमिनेट होत गेल्या.
अखेर बिग बॉसच्या घरात सिद्धार्थ शुक्ला आणि आसिम रियाज यांच्यातला सामना होता. तेव्हा सिद्धार्थला विजयश्री घोषित करण्यात आलं. त्याला 50 लाखांचं बक्षीस तसंच एक आकर्षक ट्रॉफी देण्यात आली.
आजवरचा सर्वांत लोकप्रिय सीझन?
बहुचर्चित आंतरराष्ट्रीय रिअॅलिटी शो बिग ब्रदरची भारतीय आवृत्ती असलेला बिग बॉसचा यंदाचा 13वा सीझन होता, आणि हा आजवरचा सर्वात लोकप्रिय सीझन मानला जातोय.
यंदाचा शो हिट होण्यामागे यातल्या प्रतिस्पर्ध्यांमधली वादावादी, भांडणं, धक्का-बुक्की आणि अफेअर्सचाही मोठा हातभार आहे.
बिग बॉसवरून सोशल मीडियावर खूप चर्चा झाली आणि हा कार्यक्रम सोशल मीडियावर कायम ट्रेंड होत असतो.
यंदाच्या बिग बॉसची सुरुवात सप्टेंबर महिन्यात झाली. तेव्हा असं सांगण्यात आलं होतं की पहिली फायनल चार आठवड्यातच होईल. मग नवीन प्रतिस्पर्धी येतील आणि शो पुढे जाईल.
नव्या प्रयोगात बिग बॉस शो सुरू झाल्यावर अभिनेत्री अमिषा पटेलला घराची मालकीण म्हणून पठवण्यात आलं. ती घरातल्या सदस्यांकडून कामं करून घेणार होती.
मात्र, अमिषा पटेल फक्त पहिल्याच भागात दिसली. त्यानंतर ती गायब झाली. चार आठवड्यांनंतर होणारी पहिली फायनलही झालीच नाही.
यंदा बिग बॉसमध्ये काही बदल करण्यात आल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. शो सुरू झाल्यावर मात्र बिग बॉसने आपला पूर्वीचाच पॅटर्न फॉलो केला. मात्र, या सीझनचं वैशिष्ट्य ठरलं ते यावेळी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने प्रतिस्पर्धी शोमध्ये दिसले.
वाईल्ड कार्ड एन्ट्रीमध्येही अनेकजण आले. तेही घरात बराच काळ टिकून होते. एकुणात काहीतरी नवीन करण्याच्या नादात सुरुवात तर वेगळी झाली. मात्र, त्याचा फारसा फायदा झाला नाही.
धक्काबुक्की, भांडण-तंटे
या बिग बॉसच्या प्रतिस्पर्ध्यांमधल्या भांडण-तंट्यांनी नवीन विक्रम रचले. यंदाच्या सीझनमध्ये जेवढी भांडणं झाली, तेवढी यापूर्वी कधीही झाली नव्हती. लहान-मोठी भांडणं प्रत्येकच सीझनमध्ये झाली. मात्र, सिद्धार्थ शुक्ला आणि आसिम रियाज यांच्यातल्या भांडणांनी सगळ्या सीमा ओलांडल्या.
बिग बॉसच्या सुरुवातीला दोघंही मित्र होते. दोघांमध्ये चांगली बॉन्डिंगही दिसत होती. काही काळानंतर मात्र, दोघं वेगळे झाले आणि त्यांच्यात भांडणं सुरू झाली. एकमेकांवर आरडा-ओरड करता करता पुढे धक्काबुक्कीही होऊ लागली.
दोघांनी एकमेकांना अनेकदा धक्का दिला. आधी बिग बॉसमध्ये नियम होता की भांडण करताना कुणीही फिजिकल होता कामा नये. फिजिकल होणाऱ्या प्रतिस्पर्ध्याला शोमधून काढून टाकलं जात होतं. मात्र, वादविवाद आणि भांडणांमुळेच बिग बॉसला लोकप्रियता मिळाली.
कदाचित त्यामुळेच बिग बॉसने या दोघांवरही कारवाई केली नाही. त्यांना वॉर्निंग देऊन किंवा नॉमिनेट करून सोडून देण्यात आलं. या सीझनच्या बिग बॉसमध्ये शिवीगाळही खूप झाली. प्रतिस्पर्ध्यांनी एकमेकांना शिवीगाळ तर केलीच. नातलगांनाही सोडलं नाही.
एकमेकांसोबत टिव्ही मालिकांमध्ये काम केलेल्या सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई या दोघांमध्येही खूप भांडणं झाली. दोघांनी एकमेकांवर गलिच्छ आरोप-प्रत्यारोप केले. रश्मी देसाईचा बॉयफ्रेंड अरहानशी सिद्धार्थचं भांडणंही झालं. सिद्धार्थ आणि रश्मी यांनी एकमेकांवर चहा फेकला. सिद्धार्थने अरहानचं शर्ट फाडलं.
प्रतिस्पर्धांमधल्या भांडणाने हीन पातळी तेव्हा गाठली जेव्हा टिव्ही अॅक्टर विशाल आदित्य सिंह आणि त्याची पूर्वीची गर्लफ्रेंड मधुरिमा यांच्यात जोरदार भांडण झालं. या भांडणात मधुरिमाने फ्राईंग पॅनने विशालला चोप दिला.
बिग बॉसच्या कुठल्याच सीझनमध्ये असं झालेलं नव्हतं. अखेर या वागणुकीमुळे बिग बॉसने मधुरिमाला शोमधून बाहेर काढलं. यावेळी सर्वात जास्त भांडणं केली सिद्धार्थ शुक्लाने. आसिम रियाजव्यतिरिक्त, रश्मी देसाई, अरहान, पारस छाब्रा, विशाल आदित्य सिंह आणि सिद्धार्थ डे यांच्यासोबतही त्याने जोरदार भांडणं केली.
अफेअर्स
मात्र, या सीझनमध्ये केवळ भांडणं झाली, असं नाही. बिग बॉसमध्ये प्रेमाचा ऋतूही फुलला. सर्वात जास्त चर्चा झाली ती सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांच्या नात्याची. आसिम रियाज आणि हिमांशी खुराना दोघांनी तर एकमेकांप्रति असलेलं प्रेम व्यक्तही केलं.
पारस छाबडा आणि माहिरा शर्मा यांच्या मैत्रीचीही खूप चर्चा झाली. दोघांनी प्रेमाचा इनकार केला असला तरी घरातून बाहेर पडल्यावर आपल्या नात्यावर विचार करू, असंही त्यांनी सांगितलं. पारस छाबडा यांची गर्लफ्रेंड आकांक्षा हिच्याविषयीही खूप प्रश्न विचारण्यात आले.
बिग बॉसचा अँकर सलमान खानने पारस छाब्राची खूप खेचली. हिमांशी आणि आसिम यांनाही सावध केलं. सिद्धार्थ शुक्लालाही शहनाजसोबतच्या नात्याविषयी सावध केलं.
एकीकडे हिमांशी आणि आसिम यांच्या प्रेमाची खूप चर्चा झाली आणि ती यासाठी कारण हिमांशीने आपलं पहिलं नातं तोडत आसिमप्रति प्रेमाची कबुली दिली. मात्र, सोबतच ती हेदेखील म्हणाली की ती आसिमविषयी अधिक माहिती घेईल आणि नंतरच निर्णय घेईल.
शहनाज आणि सिद्धार्थच्या नात्याविषयी अशीही चर्चा झाली की शहनाज शोसाठी हे सगळं करतेय. सिद्धार्थनेही कबूल केलं की त्याची शहनाजबरोबर चांगली मैत्री आहे.
रश्मी देसाईचा बॉयफ्रेंड अरहानची शोमध्ये एन्ट्री झाल्यावर मजा आणखी वाढली. सिद्धार्थ आणि रश्मी यांच्यात अधेमधे भांडणंही झाली.
बिग बॉसच्या या सीझनमध्ये पहिल्यांदाच प्रतिस्पर्ध्याच्या खाजगी आयुष्याचीही खूप चर्चा झाली. एकदा तर सलमान खानने अरहान विवाहीत असल्याचं आणि त्याला एक मुलगाही असल्याचं सांगितलं. यामुळे रश्मी देसाई आणि त्याच्या नात्यात दुरावा आला. अखेर रश्मी देसाईने सांगायला सुरुवात केली की तिच्यात आणि अरहानमध्ये आता कुठलंही नातं नाही.
हिमांशी आणि आसिम रियाज यांच्या नात्यासोबतच सिद्धार्थ आणि शहनाज यांच्या नात्याविषयी सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. 'Sidnaaz' ट्रेंडिंग टॉपिक बनलं.
अंडरडॉग
कॉमेडियन कृष्णाची बहीण आरतीसुद्धा सहा फायनलिस्टमध्ये आहे. आरती फायनलमध्ये जाईल, असं कुणाला वाटलंही नव्हतं.
आरतीच्या चालीची सलमान खाननेही बरीच स्तुती केली. मात्र, आरती प्रत्येक बाबतीत हस्तक्षेप करते, असे आरोपही झाले.
याची दुसरी बाजू म्हणजे कदाचित यामुळेच तिला फुटेज मिळालं असेल. आरतीचं नाव सिद्धार्थ शुक्लाबरोबरही जोडण्यात आलं होतं.
आरतीची वहिनी कश्मिरा शहा काही दिवसांसाठी शोमध्ये आली होती तेव्हा ती हेदेखील म्हणाली होती की तिचं लग्न सिद्धार्थशी का नाही होऊ शकतं.
यानंतर सिद्धार्थबरोबरच्या नात्यावरून आरतीलाही बरेच प्रश्न विचारण्यात आले.
आरतीव्यतिरिक्त टिव्ही इंडस्ट्रीची माहिरा शर्मादेखील टॉप 7 मध्ये पोहोचण्यात यशस्वी झाली. माहिरा शर्मा पारस छाब्रासोबतच्या नात्यामुळे चर्चेत होती.
तिच्याविषयी हेदेखील म्हणण्यात आलं की पारस नसेल तर शोमध्ये तिचं काहीच अस्तित्व नाही. माहिराने मात्र, हे कधीच मान्य केलं नाही.
काहीही असलं तरी पारसने अनेक मोठमोठ्या चेहऱ्यांना मागे टाकत टॉप 7 मध्ये स्थान पटकावलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)