नरेंद्र मोदी, राहुल गांधी : रिकाम्या बोगद्यातील 'वेव्ह' आणि ट्रॅक्टरवरच्या सोफ्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. एरव्हीदेखील या नेत्यांच्या वक्तव्यांची, कृतीची दखल घेतलीच जाते, पण यावेळेस दोघंही सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी (3 ऑक्टोबर) हिमाचलमधील अटल बोगद्याचे उद्घाटन केलं. उद्घाटनानंतर बोगद्यातून चालत जात असताना हात हलवून दाखवणाच्या मोदींच्या कृतीवरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. कारण यावेळी आजूबाजूला कोणीच नव्हते.

राहुल गांधी ट्रोल होण्याचं कारण म्हणजे पंजाबमध्ये केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात 'शेती वाचवा' या आंदोलनासाठी त्यांनी काढलेली ट्रॅक्टर रॅली. या रॅलीदरम्यान राहुल गांधी ट्रॅक्टरवर कुशन असलेल्या खुर्चीवर बसलेले होते. त्यावरुनच त्यांच्यावर टीका सुरू झाली.

एकीकडे रिकाम्या बोगद्यात पंतप्रधान कोणाला हात उंचावून दाखवत होते, असा प्रश्न अनेक जण विचारत आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधींवर 'व्हीआयपी शेतकरी' अशी टीका होत आहे.

पंतप्रधानांची प्रकृती ठीक आहे ना?- प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर पंतप्रधान मोदींच्या कृतीवर टीका करताना म्हटलं की, निर्मनुष्य असलेल्या बोगद्यात मोदी कोणाकडे पाहून हात हलवत होते? तिथे तर लोक नव्हते. देशाला अनर्थाच्या वाटेवर झोकून देणाऱ्या आत्मग्न पंतप्रधानांच्या प्रकृतीवर तर परिणाम झाला नाहीये ना?

"लोकांना पंतप्रधानांच्या प्रकृतीची माहिती मिळायलाच हवी. विशेष म्हणजे आदरणीय महोदयांनी यापूर्वीही असं केलं आहे," असंही आंबेडकरांनी म्हटलं.

अनेक ट्वीटर युजर्सनेही मोदींच्या या कृतीवर मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

ब्रिजेश कलप्पा यांनी मोदी यांचा असाच एक जुना फोटो ट्वीट करून म्हटलं आहे की, मोदी 'वेव्ह' अजून टिकून आहे.

राहुल मुखर्जी यांनी हा एक पॅटर्न आहे असं म्हणत काश्मिरमधील दाल लेकमधला मोदींचा एक फोटो ट्वीट केला आहे.

मोदी हे भविष्यात त्या बोगद्यातून जे कोणी प्रवास करतील, त्यांना हात हलवून दाखवत आहेत. ते द्रष्टे नेते आहेत, असं एका युजरनं म्हटलं आहे.

हे 'प्रोटेस्ट टूरिझम'- हरदीप सिंह पुरी

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीदेखील या आंदोलनावरून राहुल गांधी यांच्यावर टीका करताना म्हटलं की, राहुल गांधी हे व्हीआयपी शेतकरी आहेत जे ट्रॅक्टरमध्ये बसण्यासाठी सोफा वापरतात.

ट्रॅक्टरवर कुशनवाले सोफा लावून केलेल्या आंदोलनाला 'आंदोलन' म्हणत नाहीत. याला 'प्रोटेस्ट टूरिझम' म्हणतात, अशी टीका केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केली.

राहुल गांधींनी आंदोलनाच्या वेळी घातलेल्या ब्रँडेड गोष्टी हरदीप सिंह पुरींनी फोटोत मार्क केल्या आहेत.

काहींनी राहुल गांधींनी भारतीय 'मिस्टर बिन' असं म्हटलंय.

"राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्येसुद्धा तोंडावर आपटणार. कृषी विधेयकाची चर्चा सभागृहात होत असताना राहुल गांधी परदेशात होते, शेतकऱ्यांना त्यांचं हित बरोबर कळतं," असं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)