नरेंद्र मोदींवर प्रकाश आंबेडकरांनी अटल बोगद्यावरून साधला निशाणा #5मोठ्याबातम्या

आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झाले्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. निर्मनुष्य बोगद्यात हात हलवणाऱ्या पंतप्रधानांची प्रकृती ठीक आहे ना?- प्रकाश आंबेडकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (3 ऑक्टोबर) हिमाचलमधील अटल बोगद्याचे उद्घाटन केलं. उद्घाटनानंतर बोगद्यातून चालत जात असताना हात हलवून दाखवणाच्या मोदींच्या कृतीवरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली.

रिकाम्या बोगद्यामध्ये कोणीही नसताना पंतप्रधान कोणाला हात उंचावून दाखवत होते असा प्रश्न अनेकांना पडला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही हाच प्रश्न उपस्थित करून पंतप्रधानांवर टीका केली आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

"निर्मनुष्य असलेल्या बोगद्यात मोदी कोणाकडे पाहून हात हलवत होते? तिथे तर लोक नव्हते. देशाला अनर्थाच्या वाटेवर झोकून देणाऱ्या आत्मग्न पंतप्रधानांच्या प्रकृतीवर तर परिणाम झाला नाहीये ना?" असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

"लोकांना पंतप्रधानांच्या प्रकृतीची माहिती मिळायलाच हवी. विशेष म्हणजे आदरणीय महोदयांनी यापूर्वीही असं केलं आहे," असंही आंबेडकरांनी म्हटलं.

2. राज्यांना GST भरपाईचे 20 हजार कोटी देणार : निर्मला सीतारमण

राज्यांना जीएसटी भरपाईचे 20 हजार कोटी रुपये देण्यात येतील, अशी घोषणा निर्मला सीतारमण यांनी सोमवारी (5 ऑक्टोबर) केली. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

"केंद्राच्या प्रस्तावाला वीस राज्यांनी सहमती दर्शविली. पण काही राज्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. एक प्रकारे जीएसटी भरपाईचा प्रश्न बैठकीत सुटलेला नाही. पुढील हे प्रश्न सोडवण्यावर पुन्हा चर्चा केली जाईल," असं सीतारमण यांनी म्हटलं.

राज्यांना झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम केंद्र सरकार नाकारत नाहीये कोरोना संकटामुळे अशी काही परिस्थिती निर्माण होईल याची कोणीही यापूर्वी कल्पनाही केली नव्हती. केंद्र सरकार निधी देण्यास नकार देत नाहीये. मात्र त्यासाठी कर्ज घ्यावे लागेल, असं सीतारमण यांनी स्पष्ट केलं.

कर्ज घेण्याच्या पर्यायावर सर्वांनी पुन्हा एकत्र बसून चर्चा करण्याची गरजा आहे, अशी सूचना बिहारचे अर्थमंत्री सुशील कुमार मोदी यांनी केल्याचंही त्यांनी सांगितलं.

यासंदर्भात पुन्हा 12 ऑक्टोबरला बैठक होणार आहे आणि या समस्येवर चर्चा केली जाईल, अशी माहिती सीतारामन यांनी दिली.

3. 'GDP, विरोधी पक्षातील नेते पडत आहेत आणि पंतप्रधान मात्र आठ हजार कोटींच्या विमानात उडत आहेत'

घसरलेला जीडीपी, बाबरी मशीद प्रकरणी आलेला निकाल आणि हाथरस बलात्कार पीडितेला भेटण्यासाठी निघालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झालेली धक्काबुक्की या सर्व प्रकरणांवर जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष आणि सीपीआय नेते कन्हैय्या कुमार यांनी टीका केली आहे.

मशीद स्वत:च पडली. अर्थव्यवस्थेची पडझड होत आहे. राहुल यांच्या फोटोवर 'विरोधी पक्षाचे नेते कॅमेरा पाहून पडतात' अशी टीका भाजप समर्थकांनी केली. तसंच मागील आठवड्यामध्ये पंतप्रधानांबरोबर विशेष व्यक्तींच्या प्रवासासाठी 8 हजार कोटींहून अधिक किंमतीचे विमान दाखल झाले. या सर्व गोष्टींचा संदर्भ कन्हैया यांनी एकाच ट्वीटमध्ये दिला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

"मशीद आपोआप पडली, जीडीपी स्वत:च पडत आहे, विरोधी पक्षातील नेते कॅमेरा बघून पडत आहेत. केवळ प्रधान-सेवक वर उठताना दिसत आहेत. त्यांनी उडण्यासाठी ८ हजार कोटींच्या विमानाची व्यवस्था केली आहे," असं ट्विट कन्हैया यांनी केलं आहे.

4. दलित अत्याचाराविरुद्ध मूग गिळून बसणाऱ्या संजय राऊतांनी आम्हाला शिकवू नये- रामदास आठवले

"संजय राऊत यांनी आजपर्यंत कधीही दलित अत्याचाराविरुद्ध ब्र शब्द काढला नाही. ते दलित अत्याचारविरुद्ध कधीही पुढे आले नाहीत," असा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे. TV9मराठीनं ही बातमी दिलीये.

"जिथं जिथं दलित अत्याचार होईल तिथं मी पोहोचलेलो आहे. दलित अत्याचाराविरुद्ध सतत लढत राहिलो आहे. दलित पँथरच्या चळवळीतून मी पुढे आलो आहे. त्यामुळे दलित अत्याचारांच्या प्रश्नांवर नेहमी मूग गिळून बसणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी आम्हाला दलित अत्याचाराविरुद्ध लढण्याचं शिकवू नये," असंही आठवले यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी रामदास आठवलेंवर टीका करताना हाथरस प्रकरण घडत असताना आठवले नटींच्या घोळक्यात होते, असा आरोप केला होता.

रामदास आठवले यांनी त्यालाही उत्तर दिलं. रामदास आठवले यांनी म्हटलं, "संजय राऊत हे नटींच्या घोळक्यात असतात की नाही ते माहीत नाही. मात्र मी नटींच्या घोळक्यात नसतो, तर नेहमीच कार्यकर्त्यांच्या घोळक्यात असतो."

5. राज्यातील कारभार हुकूमशाही पद्धतीनं- चंद्रकांत पाटील

"केंद्राचा कायदा लागू करायचा नसेल तर राज्यात पर्यायी कायदा करावा लागतो. मात्र, असा कोणताही कायदा न करता केवळ एका आमदाराच्या पत्रावर सरकारनं राज्यात नवा कृषी कायदा लागू केला नाही. राज्यातील कारभार हुकूमशाही पद्धतीनं सुरू असल्याचं यावरूनच दिसतंय," अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सकाळनं ही बातमी दिलीये.

ज्यावेळी लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर केलेला कायदा राज्यात लागू करायचा नसेल, तर राज्याचा नवा कायदा करावा लागतो. त्या कायद्यावर राष्ट्रपतींची सही घ्यावी लागते. मात्र असं काही न करता आमदार शशिकांत शिंदे यांच्या पत्रावर केंद्राचा कायदा राज्यात लागू करणार नसल्याचं सरकारनं ठरवलं, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)