मानसिक आरोग्य : तुमचा मानसिक ताण जेव्हा लैंगिक संबंधांची इच्छा मारतो...

    • Author, अनंत प्रकाश
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

कल्पना करा... सोमवारचा दिवस आहे. तुम्हाला ऑफिसला पोहोचण्यासाठी उशीर होत आहे. रेल्वे स्टेशनवर पाय ठेवण्यासाठी जागा नाही. पण बऱ्याच वेळानंतर एक लोकल ट्रेन येते.

तुम्ही या गाडीत प्रवेश करता, पण तुम्ही चुकीची गाडी पकडल्याचं तुमच्या लक्षात येतं...

अशा वेळी तुम्ही काय करता?

तुम्हाला चुकीची गाडी पकडल्याचं कळल्यानंतर तुम्ही गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणं स्वाभाविक आहे.

पण गाडी सुटलेली असल्यास पुढचं स्टेशन कोणतं आहे, तिथून कोणती गाडी पकडावी लागेल, ती गाडी किती वेळात मिळेल, ऑफिसला जायला तिथून किती वेळ लागेल, या गोष्टींचा तुम्ही विचार कराल.

हे सगळं करण्यात काही वेळ जाईल. यानंतर तुम्ही विचार कराल की ऑफिसला उशीरा पोहोचल्यास काय होईल. कुणाला मेसेज करून निरोप द्यावा लागेल इत्यादी. अखेरीस तुम्ही लोकल ट्रेन पकडून ऑफिसला पोहोचाल.

पण, चुकीची गाडी पकडल्यापासून ते योग्य गाडी पकडणं आणि ऑफिसला पोहोचणं या कालावधीत तुम्हाला तणाव आला, त्याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल, याचा तुम्ही विचार केला आहे का?

या काळात तुमचा मेंदू किती वेगाने काम करत होता, तुम्ही इतक्या चपळाईने योग्य गाडी कशी काय पकडू शकलात?

या दरम्यान, तुमच्या शरीरात जे काही बदल झाले, असेच बदल चित्ता मागे लागलेल्या हरणाच्या शरीरातही होत असतात.

तुमचा मेंदूही तेच करत असतो. आपला जीव वाचवण्यासाठी तुम्हाला वेगाने धावण्याची गरज असते, तेव्हा तुम्ही धावता. एखाद्या वेळी धाडस दाखवायचं असेल, ते तुम्ही दाखवता. तसंच अंधारात पाहायचं असल्यास तुमच्या डोळ्यांची बुबुळं त्यानुसार लहान-मोठी होतात.

सोप्या शब्दात सांगायचं तर, तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होते, त्यावेळी आपला मेंदू शरीराची सगळी ऊर्जा त्या स्थितीशी निपटण्यासाठी खर्ची घालतो.

उदाहरणार्थ, कुणी तुमच्यावर चाकूने हल्ला करणार असेल, अशा वेळी तुमचा मेंदू तुमच्या पायांमध्ये किंवा मांडीत शक्ती एकवटतो, त्यामुळे त्या ठिकाणाहून तुम्ही पळून जाऊ शकता.

त्याठिकाणी, अशा वेळी, मेंदू दैनंदिन जेवणातून मिळालेली ऊर्जा अन्न पचवण्यासाठी खर्च करणार नाही. किंवा एखादी जखम भरून निघण्यासाठीही उर्जा वापली जाणार नाही. कारण, ती वेळ जीव वाचवण्याची असेल, त्यामुळे तिथं लक्ष केंद्रित केलं जाईल.

त्यामुळे तणावपूर्ण स्थिती टाळणं हेच तुमच्यासाठी फायदेशीर आहे. तुम्हाला ताण देणाऱ्या घटना सारख्यासारख्या होत असल्यास ते 'क्रोनिक स्टेस'मध्ये रुपांतरीत होऊ शकतात.

क्रोनिक स्ट्रेस काय असतो?

दिल्लीच्या सेंट स्टीफन्स रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रुपाली शिवलकर यांच्या मते, "तणाव ही एक मानसिक आणि शारिरीक प्रतिक्रिया आहे. विचित्र आणि अवघड परिस्थितींमध्ये ही स्थिती समोर येते."

दैनंदिन आयुष्यातील कोणत्याही घटनांमधून तणाव निर्माण होऊ शकतो.

उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला प्रपोज करणं, ब्रेक-अप होणं, नोकरीच्या मुलाखतीस जाणं, नोकरीवरून काढण्याची नोटीस मिळणं, मुलाला मार लागणं, केसगळती, पोट साफ होणं किंवा आयफोन हातातून पडणं, अगदी कोणत्याही गोष्टीवरून.

पण हा तणाव जास्त काळ कायम राहिल्यास त्याचा तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होऊ लागतो. यामुळे तुम्हाला मधुमेह, हृदयविकार, अल्सर किंवा अस्वस्थता, डिप्रेशन यांच्यासारखे मानसिक विकार होऊ शकतात.

डॉ. रुपाली सांगतात, "काही प्रमाणात तणाव घेणं कधी-कधी चांगलंही असतं. वैद्यकीय भाषेत याला पॉझिटिव्ह स्ट्रेस असं संबोधतात. हा तणाव तुम्हाला पुढे जाण्यासाठी उपयोगी ठरतो. पण हाच तणाव जेव्हा तुमच्या विचारक्षमतेवर परिणाम करू लागतो, त्याला निगेटिव्ह स्ट्रेस असं म्हणतात.

नकारात्मस तणाव अनेक आजार, व्याधी किंवा विकारांचं मूळ ठरू शकतो. तो मेंदूत हायपोतेमलस भागावर आघात करतो. यामुळे अस्वस्थतेसोबतच, शारीरीक किंवा भावनिक लक्षणं दिसून येऊ शकतात. तुमचं लक्ष एका ठिकाणी केंद्रीत होऊ शकत नाही. मेंदू सुन्न पडला, तो कोणतीच प्रतिक्रिया देत नाही, असंही कधी कधी वाटतं.

डॉ. रुपाली यांच्या मते, "शारिरीक लक्षणं तुमच्या शरीरावर दुष्परिणाम दिसतात. हृदयाचे ठोके वाढतात. वारंवार शौचास आल्याचा भास होतो, घसा कोरडा पडतो, पोटात खड्डा पडल्यासारखं वाटू लागतं"

क्रोनिक स्ट्रेसच्या तावडीत आपण कसे सापडतो?

क्रोनिक स्ट्रेस एक नकारात्मक तणाव आहे. हा तुमच्या शरीरावर परिणाम दाखवू लागतो. त्याचे परिणाम अत्यंत गंभीरसुद्धा असू शकतात.

डॉक्टरांच्या मते, सातत्याने तणावात राहिल्याने संबंधित व्यक्ती आजारी पडू लागतो. त्यांच्यात इरिटेबल बाऊल सिंड्रोम यांच्यासारखी लक्षणं दिसू लागतात.

डॉ. रुपाली सांगतात, "क्रोनिक स्ट्रेसच्या स्थितीत लोकांना सायकोसोमेटिक डिसऑर्डरचा सामना करावा लागू शकतो. याचा अर्थ तुमच्यामध्ये मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात.

तसंच इरिटेबल बाऊल सिंड्रोम, अॅसिडीटी, अस्थमा यांच्यासारखीही लक्षणं काही जणांना दिसून येतात.

असंच एक प्रकरण डॉ. रुपाली शिवलकर यांच्याकडे आलं होतं.

त्या सांगतात, "संबंधित व्यक्ती सरकारी नोकरीत होती. त्यांना अनेक दिवसांपासून बद्धकोष्ठतेची समस्या होती. त्यांचा गॅस्ट्रोवरचा उपचारही सुरू होता. पण काहीच फरक पडत नव्हता. सहा ते आठ महिन्यांनंतर डॉक्टरांनी त्यांना मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घेण्यास सांगितलं. सदर व्यक्ती आमच्याकडे आली तेव्हा त्यांना साधं जेवणही जात नव्हतं किंवा झोपही येत नव्हती."

"सदर व्यक्तीची नोकरी अशी होती की त्यांना सातत्याने सतर्क राहण्याची गरज होती. रात्रं-दिवस कधीही ड्यूटी लागायची. तासनतास उभं राहायचं. तब्येत खराब झाल्यामुळे त्यांनी सुट्टी घेतली. सुट्टी संपूनही कामावर न परतल्याने त्यांना नोटीससुद्धा मिळाली. याचा अर्थ, असंच होत राहिल्यास नोकरी हातातून जाईल आणि आजारपणासोबतच नोकरी गमावण्याबाबतचा तणाव."

"त्यांच्याशी बोलल्यानंतर मला कळलं की ते प्रचंड तणावाखाली आहेत. याचा परिणाम त्यांच्या शरीरासोबतच कौटुंबिक जीवन आणि कामावरही होत होता. बद्धकोष्ठतेवर उपचार सुरू होते, पण त्यांच्या या स्थितीचं मूळ कारण तणाव हे होतं."

वैवाहिक जीवनावर परिणाम

तणाव तुमच्या शरीरासोबतच वैवाहिक संबंधांवरही वाईट परिणाम करतो. यामुळे तुमची लैंगिक संबंध ठेवण्यातली रुची कमी होती. प्रजननविषयक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डॉ. रॉबर्ट सोप्लोस्की यांनी तणाव या विषयावर 30 वर्षे संशोधन केलं आहे.

त्यांनी या विषयावर 'व्हाय झेब्राज डोंट गेट अल्सर्स' या पुस्तकात सविस्तरपणे सांगितलं आहे.

ते लिहितात, "तुम्ही सातत्याने तणावाखाली असाल, तर प्रजननाशी संबंधित अनेक डिसॉर्डर समोर येऊ शकतात. महिलांमध्ये मासिक पाळी अनियमित होणं, किंवा पूर्णपणे बंद होणं, यांसारखी लक्षणं दिसतात. पुरुषांमध्ये स्पर्म काऊंट किंवा टेस्टोस्टेरोन लेव्हल कमी होणं, यांच्यासारखी लक्षणं दिसतात. महिला आणि पुरुष दोघांमध्येही लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी होऊ शकते.

अनेकवेळा तुम्ही एखाद्या गोष्टीमुळे तणावात असता पण त्यामुळे दुसराच तणाव निर्माण होतो. अशा प्रकारे तणावाचं एक दुष्टचक्र सुरू होतं. त्यातून तुम्ही बाहेर पडू शकत नाही.

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्स (NIMHNS) ने 2016 मध्ये देशातील 12 राज्यांमध्ये एक सर्वेक्षण केलं होतं. यामध्ये चिंताजनक आकडेवारी समोर आली.

भारतात 15 कोटी लोकांना कोणत्या ना कोणत्या मानसिक समस्येमुळे तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज आहे.

तर, सायन्स मेडिकल जर्नल लॅन्सेटच्या 2016 च्या अहवालानुसार, भारतात 10 गरजूंपैकी केवळ एका व्यक्तीला डॉक्टरांची मदत मिळू शकते. प्रौढांसोबतच लहान मुलांनाही तणावाच्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे.

तुम्ही तणावात असाल तर काय करावं?

  • तणावाची समस्या निर्माण होत असेल, तर खालील गोष्टी करू शकता.
  • सकाळी फिरायला जाणं, व्यायाम करणं
  • आपल्या मित्रांना किंवा कुटुंबीयांना मनातील अडचणी मोकळेपणाने सांगणं.
  • स्वतःसाठी वेळ काढणं, यादरम्यान काम किंवा इतर गोष्टींबाबत विचार न करणं
  • दारू, सिगारेट किंवा इतर गोष्टींचं व्यसन लावून न घेणे
  • इतरांना मदत करणं
  • सकारात्मक विचार करणं

या गोष्टी करूनसुद्धा तुमच्या समस्या दूर होत नसल्यास तत्काळ मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या. तणाव सहन करण्याच्या क्षमतेबाबत इतरांशी तुलना करणं चुकीचं आहे, यामुळे तुमचा तणाव जास्त वाढणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)