हाथरस : भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्यावर कारवाई होऊ शकते?

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय गेल्या काही दिवसांपासून हाथरस प्रकरणी ट्वीट करत आहेत. पण, एका ट्वीटमुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, राष्ट्रीय महिला आयोगानं अमित मालवीय यांच्या ट्वीटची दखल घेणार असल्याचं म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये हाथरसमधील कथित बलात्कार पीडितेचा व्हीडिओ असल्याचा दावा केला जात आहे.

हा व्हीडिओ ट्वीटरवर शेयर करत मालवीय यांनी म्हटलं, "हाथरसची पीडिता अलीगढ मुस्लीम विद्यापाठीबाहेर एका पत्रकाराला सांगत आहे की, तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला."

या व्हीडिओत पीडितेचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे. भारतीय कायद्यानुसार लैंगिक हिंसाचार पीडितेची ओळख जाहीर करता येत नाही. इतकंच काय तर लैंगिक छळ किंवा बलात्काराची साशंकता असतानाही पीडितेची ओळख जाहीर करता येत नाही.

या ट्वीटमध्ये मालवीय यांनी लिहिलं, "याचा अर्थ असा नाही की, जो गुन्हा झाला त्याला कमी लेखलं जात आहे. पण, एका गंभीर गुन्ह्याला दुसऱ्या एखाद्या गंभीर गुन्ह्याचं स्वरुप देणं योग्य नाही."

मालवीय यांनी 2 ऑक्टोबरला हा व्हीडिओ ट्वीट केला होता आणि त्यात पीडितेचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे.

काय शिक्षा होऊ शकते?

अमित मालवीय यांच्या या ट्वीटमुळे वादाला सुरुवात झाली आहे. असं असलं तरी अजून त्यांनी हे ट्वीट डिलीट केलेलं नाहीये.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं, "जर ती बलात्कार पीडिता असेल, तर तिचा व्हीडिओ ट्वीट करणं दुर्दैवी आणि बेकायदेशीर आहे."

उत्तर प्रदेशच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष विमला बाथम यांनीही म्हटलं की, "मी अद्याप तो व्हीडिओ पाहिलेला नाही. पण, त्यातूनन पीडितेची ओळख दिसून येत असेल तर आयोग त्याची दखल घेईल आणि मालवीय यांना नोटीस पाठवेल."

भारतीय दंड सहितेनुसार, जर कुणी लैंगिक हिंसेतील पीडितेची ओळख जाहीर करत असेल, तर संबंधित व्यक्तीला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

2018मध्ये सर्वोच्च न्यायालयानं हेसुद्धा स्पष्ट केलं होतं की, IPCच्या सेक्शन 228A(2)चा अर्थ फक्त पीडितेचं नाव जाहीर करणं इतक्यापुरता मर्यादित नसून मीडियात आलेल्या कोणत्याही माहितीच्या आधारे तिची ओळख जाहीर व्हायला नको.

कुटुंबीयांनी परवानगी दिल्यानंतरही पीडितेची मृत्यूनंतर ओळख जाहीर करता येऊ शकत नाही, असंही न्यायालयानं म्हटलंय.

मालवीय यांचे एकामागून एक ट्वीट

हाथरस येथील प्रकरण लैंगिक हिंसेचं नाही, हे मालवीय अनेक ट्वीटच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.

एका ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलंय, "19 सप्टेंबरला काँग्रेस नेते श्यौराज जीवन यांच्याशी भेट झाल्यानंतर 22 सप्टेंबरला सामूहिक बलात्काराची आरोप करण्यात आला."

त्यांनी 2 ऑक्टोबरला आणखी एक व्हीडिओ ट्वीट केला आहे. घटना घडल्यानंतर पीडितेच्या आईचं वक्तव्य त्यात असल्याचं त्यांनी म्हटलंय.

या व्हीडिओत संबंधित महिला संदीप नावाच्या व्यक्तीचं नाव घेत आहे आणि पीडिता जमिनीवर पडलेली दिसून येत आहे. या व्हीडिओतही पीडितेच्या आईचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे.

"उत्तर प्रदेशला बदनाम करण्याचा कट रचला जात आहे," हे सांगण्याचा प्रयत्न मालवीय यांनी या ट्वीटच्या माध्यमातून केला आहे.

भाजप आमदाराचं आक्षेपार्ह वक्तव्य

हाथरसच्या घटनेनंतर भाजपच्या एका आमदाराचं आक्षेपार्ह वक्तव्य समोर आलं आहे.

वृत्तसंस्था एएनआयनं यासंबंधीचा व्हीडिओ शेयर केला आहे.

या व्हीडिओत हाथरस घटनेविषयी बोलताना आमदारांनी म्हटलं, "आपल्या तरुणी मुलींना संस्कारीत वातावरणात राहण्याच्या, चालण्याच्या आणि एक शालीन व्यवहार दर्शवण्याच्या पद्धती शिकवणं हा आई-वडिलांचा धर्म आहे. अशा घटना केवळ चांगल्या संस्कारांनीच थांबवल्या जाऊ शकतात. अशा घटनांना शासन आणि तलवारी रोखू शकत नाहीत."

भाजप आमदाराच्या या वक्तव्यावर टीका केली जात आहे.

हाथरस प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. असं असलं तरी विशेष तपास पथक (एसआयटी) त्यांची चौकशी चालूच ठेवेल, अशी बातमी वृत्तसंस्था एएनआयनं दिली आहे.

शनिवारी (03 ऑक्टोबर) उत्तर प्रदेश सरकारमधील अधिकारी आणि राहुल आणि प्रियंका गांधी यांनी हाथरसला जाऊन पीडित कुटंबीयांची भेट घेतली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)