You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL 2020 : यंदाचं आयपीएल महेंद्र सिंह धोनीचा उत्तराधिकारी ठरवणार?
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी
स्वातंत्र्यदिनी भारताचा माजी कर्णधार, बॅट्समन आणि विकेटकीपर महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
धोनी टेस्ट क्रिकेटमधून आधीच निवृत्त झाला होता. मात्र वनडे आणि ट्वेन्टी-20मध्ये तो भारतीय संघाचा अविभाज्य भाग होता.
मात्र गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्ड कपनंतर धोनीने संघनिवडीकरता उपलब्ध नसल्याचं निवड समितीला कळवलं होतं. त्यामुळे जवळपास वर्षभर धोनी दिसला नव्हता. स्वातंत्र्यदिनी चाहत्यांना धक्का देत धोनीने क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला.
पंधरा वर्षं आपल्या खेळाने टीम इंडियाला विजयपथावर नेण्यात धोनीचा सिंहाचा वाटा होता. त्याचा अनुभव संघातल्या युवा खेळाडूंसाठी मोलाचा ठरत होता. म्हणूनच त्याच्या निवृत्तीच्या निर्णयाने जगभरातील चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
2020मध्ये ऑस्ट्रेलियात ट्वेन्टी-20 वर्ल्ड कप होणार होता. मात्र कोरोनाच्या प्रकोपामुळे या वर्ल्डकपचं आयोजन पुढे ढकलण्यात आलं. धोनी हा वर्ल्डकप खेळून निवृत्त होईल असा होरा होता.
मात्र तो वर्ल्डकपच पुढे गेल्याने सगळी समीकरणं बदलली. एप्रिल-मे महिन्यात होणारी आयपीएल स्पर्धा लांबणीवर गेली. धोनीने हे सगळं लक्षात घेऊन निवृत्तीचा निर्णय घेतला.
धोनीच्या निवृत्तीने टीम इंडियाच्या वनडे आणि ट्वेन्टी-20 संघात विकेटकीपर-बॅट्समन या जागेसाठी दावेदारी निर्माण झाली आहे.
टीम इंडिया सातत्याने खेळत असते त्यामुळे संघात दोन विकेटकीपर असतात. लांबणीवर गेलेला ट्वेन्टी-20 वर्ल्डकप पुढच्या वर्षी होणार आहे. त्या वर्ल्डकपसाठी यंदाचं आयपीएल ही रंगीत तालीमच मानली जात आहे.
त्यामुळे आयपीएल स्पर्धेत खणखणीत कामगिरीसह निवड समितीसमोर दावेदारी सिद्ध करण्याचा युवा विकेटकीपर बॅट्समनचा प्रयत्न आहे.
ऋषभ पंत
धोनीनंतर टीम इंडियाने मूळच्या उत्तराखंडच्या मात्र दिल्लीकडून खेळणाऱ्या ऋषभ पंतवर विश्वास ठेवला.
आक्रमक फटकेबाजी आणि चांगलं कीपिंग या गुणवैशिष्ट्यांच्या बळावर ऋषभने स्थानिक क्रिकेटमध्ये छाप उमटवली.
2015 मध्ये ऋषभने U19 वर्ल्डकपमध्ये खेळताना 18 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. पुढच्याच वर्षी रणजी क्रिकेटमध्ये ऋषभने महाराष्ट्राविरुद्ध खेळताना 308 रन्सची मॅरेथॉन इनिंग्ज रचली.
त्याच वर्षी ऋषभने रणजी करंडक स्पर्धेत सगळ्यांत वेगवान शतकाचा विक्रम नावावर केला. त्याने झारखंडविरुद्ध 48 बॉलमध्येच शतक पूर्ण केलं.
2017 मध्ये ऋषभने आंतरविभागीय ट्वेन्टी-20 मॅचमध्ये 32 बॉलमध्ये शतक झळकावलं. आयपीएल स्पर्धेत दिल्ली संघाने 1.9 कोटी रुपये खर्चून ऋषभला संघात घेतलं.
असंख्य वेगवान खेळी करत ऋषभने आपली उपयुक्तता सिद्ध केली. 2018 मध्ये त्याने हैदराबादविरुद्ध खेळताना शतकी खेळी साकारली.
वृद्धिमान साहा दुखापतग्रस्त झाल्याने साहाला टेस्ट पदार्पणाची संधी मिळाली. टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्याच बॉलवर सिक्स मारण्याचा अनोखा विक्रम त्याने केला.
इंग्लंडविरुद्ध ढगाळ वातावरणात, बॉल स्विंग होत असताना दर्जेदार आक्रमणाविरुद्ध ऋषभने शतक झळकावलं. हे सातत्य कायम राखत त्याने ऑस्ट्रेलियातही शतक करण्याचा पराक्रम केला.
दोन अव्वल संघांविरुद्ध त्यांच्याच देशात शतक करून ऋषभने टीम इंडियातलं स्थान पक्कं केलं असं चित्र निर्माण झालं. मात्र ऋषभला या कामगिरीत सातत्य राखता आलं नाही.
त्याच्या कीपिंगमधल्या त्रुटी समोर आल्या. मोठे फटके खेळण्याच्या नादात विकेट गमावल्याने मोठी खेळी करण्यात अपयश येऊ लागलं.
वनडे आणि ट्वेन्टी-20 मध्ये ऋषभला पर्याय नाही का? असे प्रश्न विचारण्यात येऊ लागले. तूर्तास तरी निवडसमितीने ऋषभच्या कौशल्यावर विश्वास ठेवत त्याला संघात कायम राखलं आहे.
परंतु ट्वेन्टी-20 वर्ल्डकप लक्षात घेता आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या विकेटकीपर बॅट्समनकडे निवडसमितीचं लक्ष आहे.
ऋषभची आयपीएलमधली कामगिरी दमदार अशी आहे. त्याचा स्ट्राईकरेट उत्तम आहे. तो सातत्याने रन्स करतो आहे.
मात्र बाकी विकेटकीपर बॅट्समनही चांगलीच कामगिरी करत असल्याने ऋषभला सातत्याने चांगलं खेळावं लागणार आहे. अन्यथा टीम इंडियातल्या त्याच्या स्थानाला धक्का बसू शकतो.
संजू सॅमसन
यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 74 तर पंजाबविरुद्ध 85 धावांच्या खेळीने सगळीकडे संजू सॅमसनच्या नावाची चर्चा आहे.
पण खरंतर 25व्या वर्षीच संजू आयपीएलचा अनुभवी खेळाडू आहे. कारण गेली जवळपास 7 वर्षं संजू आयपीएलमध्ये धावांच्या राशी ओततो आहे.
आयपीएल स्पर्धेत त्याच्या नावावर दोन शतकंदेखील आहेत. खणखणीत फटके लगावणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे मात्र कामगिरीत सातत्य राखता न येणं हे त्याचं उणेपण आहे.
संजूचं कीपिंग उत्तम आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये तो केरळ संघाचं नेतृत्वही करतो. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये कर्णधार, कीपर आणि बॅट्समन म्हणून त्याची कामगिरी उत्तम आहे.
यंदाच्या आयपीएलमधल्या संजूने खेळलेल्या इनिंग्ज पाहून जगप्रसिद्ध फिरकीपटू शेन वॉर्न म्हणाला, मला आश्चर्य वाटतं की एवढं चांगलं खेळूनही संजू टीम इंडियाच्या टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी-20 संघात कसा खेळत नाही? उर्वरित मॅचेसमध्ये संजूचा खेळ पाहण्यासाठी मी आतूर आहे.
दरम्यान काही वर्षांपूर्वी संजूचा खेळ पाहून काँग्रेस नेते शशी थरूर यांनी त्याला पुढचा धोनी असं म्हटलं होतं. संजू एक जागतिक दर्जाचा खेळाडू आहे हे तेव्हाच लक्षात आलं होतं.
थरूर यांच्या ट्वीटला भारताचा माजी सलामीवीर आणि आता भाजप खासदार असलेल्या गौतम गंभीरने उत्तर दिलं आहे-संजू सॅमसनला कोणासारखं किंवा पुढचा अमुक होण्याची गरज नाही. तो भारतीय क्रिकेटचा संजू सॅमसन असेल. देशातला सर्वोत्तम युवा बॅट्समन अशा शब्दांत गंभीरने संजूला शाबासकी दिली आहे.
चांगलं खेळूनही संजूला टीम इंडियात स्थान मिळत नाही याचं आश्चर्य वाटतं असं गंभीरने पुढे म्हटलं आहे.
दरम्यान आयपीएल आणि फर्स्ट क्लास क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या संजूने टीम इंडियासाठी फक्त 4 ट्वेन्टी-20 मॅचेस खेळल्या आहेत.
2015 मध्ये त्याला पदार्पणाची संधी देण्यात आली. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर यंदा त्याला खेळण्याची संधी मिळाली. टीम इंडियात स्थान पटकावून पक्कं करायचं असेल तर संजूला बॅटिंगमध्ये सातत्य आणावं लागेल.
इशान किशन
धोनीच्याच झारखंडचा प्रतिनिधी इशान किशन हा टीम इंडियात येण्यासाठीचा प्रबळ दावेदार आहे. 22वर्षीय इशानची बॅट स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्याने तळपताना दिसते.
2016 मध्ये इशानने रणजी करंडक स्पर्धेत दिल्लीविरुद्ध 273 रन्सची खेळी केली होती. विजय हजारे ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सातत्याने रन्स करणाऱ्यांच्या यादीत इशानचं नाव असतं.
इंडिया ए संघाचा इशान नियमित भाग असतो. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये झारखंडसाठी खेळताना बॅटिंग आणि कीपिंग दोन्ही आघाड्या तो उत्तमरीत्या सांभाळतो.
आयपीएल स्पर्धेत इशान दोन हंगाम गुजरात लायन्ससाठी खेळला. त्यानंतर 2018 मध्ये मुंबई इंडियन्सने 5.5 कोटी रुपये खर्चून ताफ्यात समाविष्ट केलं.
कमीत कमी बॉलमध्ये जास्तीत जास्त रन्स, चौकार-षटकारांची आतषबाजी, रनिंग बिटविन द विकेट्स चांगलं असणं आणि दर्जेदार कीपिंग यामुळे इशान मुंबई इंडियन्सच्या योजनांचा महत्त्वाचा भाग आहे.
मुंबईने क्विंटन डी कॉककडे कीपिंग सोपवल्याने इशानला बॅटिंगमध्ये नैपुण्य दाखवण्याची संधी आहे. यंदाच्या हंगामात पहिल्या दोन सामन्यात सौरभ तिवारी खेळला.
तिसऱ्या मॅचला सौरभ दुखापतग्रस्त असल्याने इशानला संधी देण्यात आली. त्याने 58 बॉलमध्ये 99 रन्सची धुवाधार खेळी केली. त्याने 2 फोर आणि 9 षटकार लगावत मुंबईला मॅच जिंकून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
लोकेश राहुल
कोणत्याही स्वरुपाचं क्रिकेट असेल तरी कॅप्टन्सी, कीपिंग आणि ओपनिंग अशा तीन आघाड्या सांभाळणं अवघड आहे. परंतु लोकेश राहुलने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत हे शिवधनुष्य पेलण्याचा निर्णय घेतला आहे.
20 ओव्हर कीपिंग करता करता कॅप्टन्सी करणं आणि त्यानंतर जवळपास तेवढ्याच ओव्हर सलामीला येत बॅटिंग करणं हे शारीरिकदृष्ट्या थकवणारं आहे.
परंतु राहुल तिन्ही भूमिका सक्षमतेने निभावताना दिसतो आहे. टीम इंडियासाठी टेस्ट आणि वनडे ओपनर तसंच वनडेत मिडल ऑर्डरमध्ये खेळलेल्या राहुलने संघाची जी गरज असेल त्यानुसार जुळवून घेतलं आहे.
राहुल द्रविडप्रमाणे या राहुलनेही वनडे आणि ट्वेन्टी-20 मध्ये विकेटकीपिंग केल्याने टीम इंडियाला अतिरिक्त बॉलर खेळवण्याची संधी मिळाली आहे.
स्थानिक क्रिकेटमध्ये कर्नाटकसाठी रनमशीन असलेल्या राहुलने टीम इंडियासाठीही चांगल्या खेळी केल्या आहेत. मात्र प्रत्येक मॅचगणिक बॅटिंग पोझिशन बदलत असल्याने त्याच्या भूमिकेत बदल होतो आहे.
राहुलने बॅटिंगमध्ये सातत्य आणल्यास टीम इंडियाचा बॅट्समन-कीपर ही त्याची ओळख पक्की होऊ शकते. आयपीएल स्पर्धेत राहुलने यंदा पहिलं शतक झळकावलं.
मात्र याआधीही बेंगळुरू तसंच पंजाबसाठी खेळताना राहुलने धावांची टांकसाळ उघडली आहे. यंदा संघात निकोलस पूरन हा विकेटकीपर बॅट्समन असतानाही राहुलने कीपिंगची जबाबदारी स्वत:कडेच ठेवली आहे.
वृद्धिमान साहा
सनरायझर्स हैदराबाद संघासाठी जॉनी बेअरस्टो कीपिंग करतो आहे. त्यांच्याकडे वृद्धिमान साहा आहे. साहा हा टीम इंडियाचा शिलेदार आहे.
टेस्ट टीममध्ये साहाचं स्थान पक्कं आहे. परंतु वय आणि दुखापती लक्षात घेता साहा आणखी किती वर्षं खेळणार हा प्रश्न आहे.
साहाचं कीपिंग उत्तम आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये साहाच्या नावावर शतकही आहेत. आयपीएल स्पर्धेत काही वर्षांपूर्वी साहाने पंजाबसाठी खेळताना फायनलमध्ये शतकी खेळी साकारली होती. मात्र परवा 31 बॉलमध्ये 30 रन्सची संथ खेळी केल्याने साहावर प्रचंड टीका झाली होती.
चेन्नई सुपर किंग्ससाठी वर्षानुवर्षे महेंद्रसिंग धोनीने कॅप्टन्सी आणि कीपिंग अशा दोन्ही आघाड्या समर्थपणे सांभाळल्या आहेत.
चेन्नईला आयपीएल तसंच चॅम्पियन्स लीगचं जेतेपदं मिळवून देण्यात धोनीचा सिंहाचा वाटा आहे. चाळिशीकडे झुकलेल्या धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये तो खेळतो आहे. मात्र कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनचा परिणाम धोनीच्या खेळावरही झालेला दिसतो आहे.
धोनी आणखी किती वर्षं आयपीएल खेळणार याविषयी साशंकता आहे. धोनीनंतर चेन्नईला कॅप्टन आणि कीपर अशा दोन महत्त्वपूर्ण भूमिकांसाठी गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.
दिनेश कार्तिक
कोलकाताचा कॅप्टन आणि कीपर दिनेश कार्तिक आहे. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवत असताना जेव्हा संधी मिळेल तेव्हा दिनेश कार्तिकने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.
ट्वेन्टी-20 फिनिशर, वनडेत मिडल ऑर्डर बॅट्समन आणि फिनिशर, टेस्टमध्ये ओपनिंग अशा विविध भूमिका दिनेशने पेलल्या आहेत.
दिनेशचं विकेटकीपिंग वाखाणण्यासारखं आहे. टीम इंडिया, फर्स्ट क्लास क्रिकेट आणि आयपीएल असा दिनेशकडे खंडप्राय अनुभव आहे.
35व्या वर्षीही दिनेश फिट आहे. मात्र त्याचं वय लक्षात घेता तो निवडसमितीच्या स्कीम ऑफ थिंग्जमध्ये असण्याची शक्यता कमी आहे.
गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत दिनेश टीम इंडियाचा भाग होता. 2007 मध्ये झालेल्या ट्वेन्टी-20 वर्ल्डकप विजेता संघाचाही दिनेश भाग होता. निधास ट्रॉफीतली त्याची खेळी आजही क्रिकेटरसिकांच्या स्मरणात आहे.
पार्थिव पटेल
17व्या वर्षी टीम इंडियासाठी पदार्पण करणारा पार्थिव पटेल हा चिरतरुण विकेटकीपर बॅट्समन आहे. 34व्या वर्षीही पार्थिव फिट आहे आणि अजूनही त्याच्याकडे पाहिलं की वय जाणवत नाही.
धोनी अधिराज्य करत असताना जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा पार्थिवने आपल्या नैपुण्याची झलक दाखवली आहे.
25 टेस्ट, 38 वनडे आणि 2 ट्वेन्टी-20 ही आकडेवारी ऐतिहासिक नसली तरी 194 फर्स्ट क्लास मॅचेस आणि 204 ट्वेन्टी-20 मॅचेस हे पाहिल्यावर पार्थिवची उपयुक्तता लक्षात यावी.
आयपीएलमध्ये पार्थिव सहा संघांसाठी खेळला आहे. पार्थिव कधीही टीम इंडियात येऊ शकतो असा त्याचा फिटनेस आणि प्रदर्शन आहे.
गुजरातला रणजी करंडक जिंकून देणारा कर्णधार अशीही त्याची ओळख आहे. पार्थिवचा अनुभव टीम इंडियासाठी मोलाचा ठरू शकतो परंतु त्याचं वय लक्षात घेता निवड समिती त्याच्या नावाचा विचार करेल का याविषयी शंका वाटते.
आदित्य तरे
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात अनुभवी आदित्य तरेही आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मुंबईचं नेतृत्व करणारा आदित्य मुंबई इंडियन्सचाही महत्त्वाचा भाग आहे.
रन्स आणि कीपिंग दोन्ही आघाड्यांवर आदित्यची कामगिरी उत्तम आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव असणारा आदित्य 32व्या वर्षी निवड समितीच्या स्कीम ऑफ थिंग्जचा भाग असेल असं वाटत नाही.
अनुज रावत
राजस्थानच्या ताफ्यात 20 वर्षांचा तरणाबांड अनुज रावतही आहे. दिल्लीसाठी खेळणारा अनुज अजून लहान आहे. टीम इंडियासाठी त्याच्या नावाचा विचार होण्यासाठी त्याला फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये, आयपीएलमध्ये कीपिंग आणि बॅटिंग दोन्ही आघाड्यांवर संधी मिळायला हवी.
श्रीवत्स गोस्वामी
बारा वर्षांपूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने U19 वर्ल्डकप जिंकला. त्या संघात श्रीवत्स गोस्वामी होता. त्याच वर्षी आयपीएलमधल्या बेंगळुरू संघाने त्याला संघात घेतलं.
मात्र पुढच्या बारा वर्षात विराट कोहलीच्या कारकीर्दीने जी उत्तुंग भरारी घेतली तसलं काहीच श्रीवत्सच्या बाबतीत घडलं नाही.
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये बंगालसाठी तो खेळत राहिला. आयपीएलमध्ये त्याला कोणता ना कोणता संघ समाविष्ट करत होता, मात्र संधी अतिशय मर्यादित राहिल्या.
तो आतापर्यंत चार आयपीएल संघांसाठी खेळला आहे. 31व्या वर्षी श्रीवत्स निवडसमितीच्या योजनांमध्ये आहे असं वाटत नाही.
रॉबिन उथप्पा
भात्यात उत्तमोत्तम फटके आणि कीपिंगही करू शकणारा रॉबिन उथप्पा खरंतर पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-20 वर्ल्डकपविजेत्या भारतीय संघाचा भाग होता.
मात्र महेंद्रसिंग धोनीच्या बहरण्याच्या काळातच उथप्पा टीम इंडियाची दारं ठोठावत राहिला. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या रॉबिनने 46 वनडे आणि 13 ट्वेन्टी-20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं.
आयपीएल स्पर्धेत रॉबिन पाच संघांकडून खेळला आहे. त्याने ऑरेंज कॅपही पटकावली होती. 34व्या वर्षी रॉबिन फिट आहे आणि आयपीएल खेळतो आहे, मात्र भविष्यासाठी निवड समिती त्याच्या नावाचा विचार करेल का याविषयी शंका वाटते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)