IPL 2020 : तेजस्वी यादव जेव्हा आयपीएलचा भाग होते

बिहार निवडणुकांमध्ये आरजेडीचा चेहरा असलेले तेजस्वी यादव आयपीएल स्पर्धेत खेळायचे सांगितलं तर!

बिहारमध्ये निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे. नितीश कुमार, लालूप्रसाद यादव या मोठ्या नेत्यांची दुसरी फळीही आता रिंगणात आहे. लालूप्रसाद यांचे चिरंजीव आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री असलेले तेजस्वी यादव यांच्या राजकीय कारकीर्दीसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.

बिहारच्या राजकारणात उपमुख्यमंत्रिपदापर्यंत आगेकूच करणाऱ्या तेजस्वी यांनी क्रिकेटच्या मैदानावर विशेषत: आयपीएल स्पर्धेत मुशाफिरी केली आहे असं सांगितलं तर! विश्वास बसत नाहीये? पण हे अगदी खरं आहे. तेजस्वी यादव 2009 ते 2012 या कालावधीत दिल्ली डेअरडेव्हिल्स या आयपीएल संघाचा भाग होते.

2012 मध्ये आयपीएलमधील एकेक वाद उफाळून समोर येत होते. संसदेत यावर बोलताना लालू प्रसाद यादव म्हणाले होते की, माझा मुलगी तेजस्वी आयपीएल स्पर्धेत दिल्ली संघाचा भाग आहे. पण त्याला संघात निवड झालेल्या खेळाडूंना पाणी देण्यासाठीच ठेवलं आहे. खेळायची संधीच देत नाहीत.

लालूंचे हे उद्गार एका राजकारण्याचे नसून, एका त्रस्त बापाचे होते.

तेजस्वी यांचा आयपीएल प्रवास

बॅटिंग करू शकणारा बॉलर अशी तेजस्वी यांची डोमेस्टिक क्रिकेटमधली ओळख होती. प्रत्येक आयपीएल संघ नव्या तरुण खेळाडूंना ताफ्यात सामील करतो, जेणेकरून त्यांना शिकण्याची संधी मिळावी. याच विचारातून तेजस्वी यांना दिल्लीने संघात समाविष्ट केलं.

2009 मध्ये वीरेंद्र सेहवाग दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार होता. त्यावेळी दिल्ली संघात पॉल कॉलिंगवूड, एबी डीव्हिलियर्स, तिलकरत्ने दिलशान, गौतम गंभीर, ग्लेन मॅकग्रा, आशिष नेहरा, डॅनियल व्हेटोरी, डेव्हिड वॉर्नर अशा एकापेक्षा एक खेळाडूंचा समावेश होता.

2009 मध्ये दिल्लीने प्लेऑफ्समध्ये प्रवेश केला होता. पहिल्या सेमी फायनलमध्ये डेक्कन चार्जर्सने दिल्लीला ६ विकेट्सनी नमवलं होतं.

2010 मध्ये दिल्लीचं नेतृत्व गौतम गंभीरच्या हाती आलं. मात्र तरीही तेजस्वीला एकाही मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. दिल्लीला त्या हंगामात प्लेऑफ्ससाठी पात्र होता आलं नाही. 14 मॅचेसमध्ये त्यांनी 7 मॅचेस जिंकल्या तर 7 हरल्या. दिल्लीला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.

2011 मध्ये पुन्ही वीरेंद्र सेहवागकडे दिल्लीचं नेतृत्व सोपवण्यात आलं. मात्र तरीही तेजस्वीला एकाही मॅचमध्ये खेळवण्यात आलं नाही. त्या हंगामात दिल्लीने जेमी होप्स, वरुण आरोन, अजित आगरकर, आरोन फिंच, कॉलिन इन्ग्राम, इरफान पठाण, रोलँफ व्हँन डर मर्व्ह यांना संघात समाविष्ट केलं होतं. त्या हंगामात दिल्लीची कामगिरी सर्वसाधारण झाली. 14 पैकी त्यांना फक्त 4 मॅचेस जिंकता आल्या तर 9 मध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं.

2012 मध्येही वीरेंद्र सेहवागच दिल्लीचा कर्णधार होता. त्या हंगामात दिल्लीने डग ब्रेसवेल, महेला जयवर्धने, ग्लेन मॅक्सवेल, मॉर्ने मॉर्केल, केव्हिन पीटरसन, आंद्रे रसेल, रॉस टेलर अशा मोठ्या खेळाडूंना ताफ्यात समाविष्ट केलं. तेजस्वीच्या नशिबी सलग चौथ्या हंगामातही एकही मॅच खेळण्याचं भाग्य नव्हतं. दिल्लीने दमदार प्रदर्शन करत प्राथमिक फेरीत 16 पैकी 11 मॅचेस जिंकल्या आणि प्लेऑफसाठी पात्र होण्याचा मान मिळवला. पहिल्या क्वालिफायर मॅचमध्ये कोलकाताने दिल्लीला 18 रन्सनी नमवलं. दुसऱ्या क्वालिफाइंग मॅचमध्ये चेन्नईने दिल्लीला 86 रन्सने नमवलं.

2013 मध्ये महेला जयवर्धनकडे दिल्लीचं कर्णधारपद देण्यात आलं. गुलाम बोदी, जोहन बोथा, जीवन मेंडिस, बेन रोहरर या खेळाडूंना घेण्यात आलं. सेहवागही संघात होता. परंतु तेजस्वीला संघात स्थान मिळालं नाही. दिल्लीला गुणतालिकेत तळाचं स्थान मिळालं. दिल्लीने 16पैकी फक्त 3 मॅचेस जिंकल्या.

स्थानिक क्रिकेटमध्ये तेजस्वी यांची कामगिरी

केंद्रीय मंत्री या नात्याने लालूंचं वास्तव्य दिल्लीत असताना तेजस्वीने क्रिकेटची धुळाक्षरं गिरवली. दिल्लीतल्या डीपीएस आरकेपुरम शाळेचे विद्यार्थी असतानाही त्यांनी ही आवड जोपासली होती.

तेजस्वीने दिल्लीच्या U15 टीमचं नेतृत्व करताना संघाला पॉली उम्रीगर ट्रॉफी जिंकून दिली होती.

तेजस्वीने रणजी स्पर्धेत झारखंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. कारण त्यावेळी बिहारचा संघ नव्हता. 2009 मध्ये धनबाद इथे विदर्भविरुद्धच्या सामन्यात तेजस्वी खेळला होता. त्याने सातव्या क्रमांकावर येत बॅटिंग केली आणि 19 रन्स केल्या. पाच ओव्हर्स टाकल्या पण त्याला विकेट मिळू शकली नाही.

तेजस्वीने 2 लिस्ट ए मॅचेसमध्ये झारखंडचं प्रतिनिधित्व केलं. ओडिशा आणि त्रिपुराविरुद्ध तेजस्वी खेळला. दोन्ही मॅच मिळून तेजस्वीने 14 रन्स केल्या आणि एक विकेट मिळवली.

तेजस्वीने झारखंडचं चार ट्वेन्टी-20 मॅचेसमध्ये प्रतिनिधित्व केलं. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत तेजस्वीने चार मॅचेस मिळून तीन रन्स केल्या आणि त्याने बॉलिंग केली पण एकही विकेट मिळाली नाही.

राजकीय वाटचाल

आयपीएल स्पर्धेत चार वर्ष संधीच्या प्रतीक्षेत घालवल्यानंतर तेजस्वी यांचे वडील लालूप्रसाद यांनी निर्णय घेतला. क्रिकेटसाठी तेजस्वी यांनी शाळा अर्धवट सोडली. त्यानंतर व्यावसायिक क्रिकेटपटू होण्यासाठी उमेदवारी केली मात्र क्रिकेटमधल्या कारकीर्दीचं स्वप्न प्रत्यक्षात साकारताना दिसेना. लालूप्रसाद यादव चारा घोटाळ्यात दोषी आढळले आणि त्यांना शिक्षाही झाली. यामुळे तेजस्वी यांना क्रिकेटच्या मैदानातून राजकीय रिंगणात उतरावं लागलं. आरजेडीचा ते चेहरा झाले.

तेजस्वी यांचा राजकीय प्रवेश मोक्याच्या वेळी झाला. जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार यांनी त्यावेळी भाजपपासून फारकत घेतली होती. यामुळे तेजस्वी यांच्या आरजेडीने जेडीयुशी युती केली आणि 2015 मध्ये बिहारची निवडणूक एकत्रित लढवली.

या युतीने प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडवला. आरजेडीने 81 जागांवर विजय मिळवला. बिहार विधानसभेत आरजेडी सर्वाधिक मताधिक्याचा पक्ष ठरला. तेजस्वी स्वत: राघोपूर मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडून आले. लालूप्रसाद यांनी ठरलेलं वचन पाळलं आणि नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री तर तेजस्वी उपमुख्यमंत्री झाले.

काही वर्षांपूर्वी आयपीएल स्पर्धेत अंतिम अकरातल्या खेळाडूंना पाणी आणि एनर्जी ड्रिंक देण्याचं काम करणारे तेजस्वी 26व्या वर्षी बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. देशातले सगळ्यांत तरूण उपमुख्यमंत्री असा मानही त्यांनी मिळवला.

परंतु नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी होतं. केंद्रीय अन्वेषण विभागाने आयआरसीटीसी घोटाळ्यात एफआयआर दाखल केला. हा घोटाळा 2006 मध्ये म्हणजे लालूप्रसाद यादव केंद्रीय रेल्वेमंत्री असताना झाल्याचा दावा सीबीआयने केला. तेजस्वी त्यावेळी 17 वर्षांचे होते. मात्र एफआयआरमध्ये आरोपी म्हणून त्यांचं नाव होतं.

घोटाळ्यातील आरोपी उपमुख्यमंत्रिपदी नको या भूमिकेतून तत्कालीन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी युती तोडण्याचा निर्णय घेतला. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देत त्यांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्याच काळात बहुप्रलंबित चारा घोटाळ्याचा निकाल लागला आणि जामिनावर बाहेर असलेले लालूप्रसाद यादव पुन्हा तुरुंगात गेले. आरजेडी पक्षाची जबाबदारी तेजस्वी यांच्या खांद्यावर येऊन पडली.

गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांवेळी आरजेडीने काँग्रेससह जाण्याचा निर्णय घेतला. आरजेडीला एकही जागा जिंकता आली नाही तर काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं.

भाजप-जेडीयू-एलजेपी या आघाडीने 39 जागांवर विजय मिळवत दणदणीत वर्चस्व गाजवलं. आरजेडीचा धुव्वा उडेल अशी शक्यता-भाकीत कोणीच वर्तवलं नव्हतं. लालूप्रसाद तुरुंगात, तेजस्वी यांच्याकडे पक्षाची धुरा आणि निवडणुकीत झालेली दारुण हार यामुळे आरजेडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.

लालूप्रसाद यांनी वय लक्षात घेऊन तेजस्वी हेच राजकीय वारसदार असं स्पष्ट केलं आहे. मात्र तेजस्वी यांचे बंधू तेजप्रताप यादव यांना हे मान्य दिसत नाही. लोकसभा निवडणुकीवेळी तेजप्रताप यांनी प्रतिस्पर्धी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता.

तेजस्वी यांच्या भगिनी मिसा भारती यांनाही राजकीय महत्वाकांक्षा आहे. लालूप्रसाद यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांना घरातील सगळ्यांनी एकत्र नांदावं असं वाटत आहे. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे.

अवघ्या महिनाभरावर आलेल्या निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली आहे. कोरोनाचा धोका असतानाही भाजपने या निवडणुकीसाठी मौखिक प्रचार, सोशल मीडिया, व्हर्च्युअल रॅली असं सगळं खूप आधीपासूनच सुरू केलं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही बिहारच्या निवडणुकीत सक्रिय केलं आहे. भूपेंद्र यादव यांच्याकडे बिहारची सूत्रं देण्यात आली आहेत.

विरोधी पक्षनेता असलेल्या तेजस्वी यांनी फेब्रुवारीतच बेरोजगार यात्रा काढली होती. काही दिवसांपूर्वीच कृषि विधेयकाला विरोध म्हणून तेजस्वी यांनी ट्रॅक्टर चालवत आंदोलन केलं होतं.

निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. यंदाच्या निवडणुकीवेळी तेजस्वी यांना वडील लालूप्रसाद यांची साथ मिळणार नाही. त्यांना मैदानात एकट्यानेच उतरून लढायचं आहे.

तेजस्वी आयपीएल स्पर्धेत दिल्ली संघाचा भाग असताना त्यांना खेळण्याची संधी मिळाली नाही. एक तप स्पर्धेचा भाग असूनही दिल्ली संघाला एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही.

तेजस्वी बिहारच्या रणसंग्रामात नशीब आजमावत असताना दिल्ली पहिल्यांदा आयपीएल जेतेपदाची कमाई करणार का? हेही पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)