You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विराट-अनुष्का यांच्यावरील कमेंटनंतर सुनिल गावस्कर म्हणाले, "अनुष्काला दोष देण्याचा प्रश्नच नाही"
टीम इंडिया आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्यासंदर्भातील माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी काढलेल्या उद्गारांमुळे चाहते नाराज झाले आहेत. याप्रकरणी गावस्कर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोहलीच्या वाईट कामगिरीसाठी आपण अनुष्काला दोष देत नसल्याचं स्पष्टीकरण गावस्कर यांनी दिलं आहे.
समालोचनादरम्यान गावस्कर यांनी अनुष्का शर्माचं नाव घेतल्यानंतर या वादाला सुरुवात झाली होती. अनुष्काने आपल्या उल्लेखाचा जाब गावस्कर यांना विचारला होता. याबाबत इंडिया टुडेशी बोलताना गावस्कर यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
"मी याबाबत स्पष्टपणे सांगतो, मी अनुष्काला दोष दिला नाही. मी फक्त व्हीडिओबाबत सांगत होतो. लॉकडाऊनदरम्यान विराटने फक्त तेवढीच बॅटींग केली. त्या काळात वेळ घालवण्यासाठी लोक टाईमपास करायचे. तसा टेनिस बॉलने त्याने सराव केला. यामध्ये तिला दोष देण्याचा प्रश्नच कुठे येतो," असं गावस्कर म्हणाले.
"तुम्ही मला ओळखता. क्रिकेटपटूंनी पत्नींसोबत दौऱ्यावर जावं, अशी माझी भूमिका असते," असंही गावस्कर यांनी सांगितलं.
काय झालं नेमकं?
गुरुवारी पंजाब-बेंगळुरू मॅच झाली. पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलच्या दिमाखदार शतकी खेळीच्या बळावर पंजाबने बेंगळुरूचा धुव्वा उडवला. या मॅचमध्ये विराटने दोन कॅच सोडले आणि बॅटिंगमध्ये त्याने एक रनचं योगदान दिलं.
एरव्ही स्वत:च्या कामगिरीने संघासमोर वस्तुपाठ सादर करणाऱ्या कोहलीला पंजाबविरुद्ध फिल्डिंग आणि बॅटिंगमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. कोहलीच्या सर्वसाधारण कामगिरीविषयी गावस्कर समालोचन करत असताना म्हणाले, हा लॉकडाऊनचा परिणाम असू शकतो. कारण लॉकडाऊन काळात तो अनुष्काबरोबर खेळत होता.
कोरोना काळात विराट आणि अनुष्काचा घरातल्या घरात क्रिकेट खेळतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गावस्करांनी त्याचा संदर्भ लक्षात घेऊन टिप्पणी केली असावी, असं काही जण म्हणत आहेत. परंतु कोहलीचे चाहते, अनुष्काचे चाहते आणि बेंगळुरू संघाचे चाहते यांना गावस्करांचं भाष्य पटलेलं नाही.
अनुष्काचं काय म्हणणं?
"मि. गावस्कर तुमचं बोलणं शालीनतेला धरून नव्हतं. क्रिकेटर नवऱ्याची कामगिरी लौकिकाला साजेशी झाली नाही यामध्ये त्याच्या पत्नीला मध्ये आणण्याची काय गरज आहे? गेली अनेक वर्ष कॉमेंट्री करताना तुम्ही खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर केला आहे. मग विराट आणि मलाही तोच आदर मिळावा असं तुम्हाला वाटत नाही का?
"विराटच्या खेळाविषयी बोलण्यासाठी, वर्णन करण्यासाठी तुमच्याकडे असंख्य शब्द-वाक्यप्रयोग होते जे तुम्हाला उपयोगात आणता आले असते. माझं नाव घेण्याची काय गरज होती? 2020 वर्षामध्येही गोष्टी बदलेल्या नाहीत हे यातून स्पष्ट होतं. क्रिकेटसंदर्भात गोष्टींमध्ये मला ओढून आणण्याची सवय कधी थांबेल? मि.गावस्कर, तुम्ही महान क्रिकेटपटू आहात. जंटलमन्स गेम असलेल्या क्रिकेटविश्वात तुमचं नाव आदराने घेतलं जातं. तुमचं बोलणं ऐकल्यावर मला जे वाटलं ते मांडावंसं वाटलं", असं अनुष्काने इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे.
विराटचा क्रिकेटविषयी चर्चा सुरू असताना अनुष्काला मध्ये आणण्याचं काहीच कारण नाही. याआधीही विराटच्या ढासळलेल्या कामगिरीसाठी तिला जबाबदार धरलं गेलं आहे.
नेटिझन्सच्या प्रतिक्रिया
गावस्करांची कमेंट योग्य नाही. ते एक महान खेळाडू आहेत. विराटविषयी असं द्वयर्थक बोलताना त्यांनी थोडा विचार करायला हवा होता, असं एका व्यक्तीने म्हटले आहे.
गावस्कर सर, तुम्ही असं कसं बोललात? तुमच्यासाठी ज्येष्ठ माजी क्रिकेटपटूने असं उद्गार काढणं योग्य नाही. तुमच्याप्रतीचा माझा आदर कमी झाला आहे.
गावस्करांनी हसतखेळत गमतीत हे उद्गार काढले आहेत. अनुष्का-विराटचा क्रिकेट खेळतानाचा व्हीडिओ व्हायरला झाला होता. त्याचा संदर्भ त्यांनी दिला. पण तरीही...
त्यांना कॉमेंट्री पॅनेलमधून हटवा अशी मागणी काही संतापलेल्या चाहत्यांनी केली आहे.
भाष्य केल्यानंतर ते हसत होते. लाईव्ह पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. खेळाडूच्या घरच्यांना मध्ये आणण्याचं काहीच कारण नाही.
दरम्यान रवींद्र जडेजासंदर्भात भाष्य केल्याप्रकरणी गेल्या वर्षी वर्ल्ड कपदरम्यान समालोचक संजय मांजरेकर यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. मांजरेकर यांनी जडेजाचा उल्लेख बिट्स अँड पीसेस क्रिकेटर असा केला होता.
याआधी टीम इंडियाच्या कामगिरीवर टीका केल्याप्रकरणी समालोचक हर्षा भोगले यांना रोषाला सामोरं जावं लागलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)