मासिक पाळी : मेनोपॉजनंतर होणारा रक्तस्त्राव का ठरु शकतो धोक्याची घंटा?

    • Author, सुशीला सिंह
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या 55 वर्षांच्या सरला (बदललेलं नाव) यांना मेनोपॉज आला होता. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून त्यांना अनेकदा रक्तस्रावाचा त्रास होत होता.

मुलीचं लग्न असल्यानं घरातल्या जबाबदाऱ्या होत्या आणि दुसरीकडे हॉस्पिटलमधलं कामही.

सरला यांनी सोबत काम करणाऱ्या मैत्रिणीला आपल्या या समस्येबद्दल सांगितलं, तेव्हा तिने त्यांना डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला. स्वतः सरला यांनाही कळत होतं की, डॉक्टरांकडे जायला हवं, मात्र घरातली कामं आणि नोकरी यामध्ये त्यांनी स्वतःच्या शारीरिक तक्रारीकडे दुर्लक्षच केलं.

मात्र त्रास वाढल्यानंतर त्यांनी डॉक्टरांना दाखवण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर कळलं की, सरला यांना गर्भाशयातील एंडोमीट्रियल कॅन्सर आहे आणि तो पसरला आहे. डॉक्टरांना सरला यांचं ऑपरेशन करावं लागलं.

सरला यांनी आधीच उपचार सुरू केले असते, तर कॅन्सरच्या पहिल्या टप्प्यातच योग्य ते निदान झालं असतं.

सरला सुशिक्षित होत्या आणि एका हॉस्पिटलमध्येच काम करत होत्या. पण अनेकदा असं दिसून येतं की, महिला आपल्या आरोग्याकडे पुरेसं लक्ष देत नाहीत. एकमेकींशी बोलूनच त्या आपल्या समस्यांवर तोडगा शोधण्याचा प्रयत्न करतात. कधीकधी संकोचूनही त्या इतक्या खाजगी गोष्टींवर बोलणं टाळतात आणि डॉक्टरांनाही मोकळेपणानं आपल्याला काय होतं हे सांगत नाहीत.

पण जे सरला यांच्याबाबतीत घडलं तसं मेनोपॉजनंतर रक्तस्राव होणं अनेकांच्या बाबतीत घडत का? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याआधी मेनोपॉज म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं. भारतीय महिलांच्या बाबतीत मेनोपॉज साधारण वयाच्या कोणत्या टप्प्यावर येतो?

स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या डॉक्टर एसएन बसू या सांगतात, "जेव्हा तुमच्या शरीरातील ओव्हरीचं कार्य थांबतं, तेव्हा मेनोपॉज आला असं म्हणतात. याकाळात गर्भाशयाच्या आतल्या आवरणाची जाडी कमी होते आणि मासिक पाळी म्हणजे दर महिन्याला होणारा रक्तस्राव थांबतो. एखाद्या महिलेला मेनोपॉज आला आहे की नाही, हे समजून घेण्यासाठी ब्लड टेस्ट केली जाते. यात एफएसएच लेव्हल पाहिली जाते. जर याचं प्रमाण 30 पेक्षा जास्त असेल तर त्या महिलेला मेनोपॉज आला आहे, असं म्हटलं जातं."

वयाच्या कोणत्या टप्प्यावर मेनोपॉज येतो?

जगभरात महिलांचं मेनोपॉजचं सरासरी वय 49-51 असल्याचं मानलं जातं. पण भारतात महिलांचं मेनोपॉजचं वय 47-49 आहे. याचाच अर्थ भारतीय महिलांना जगातील महिलांच्या तुलनेत मेनोपॉज लवकर येतो.

डॉक्टरांच्या मते जसं सगळ्या महिलांसाठी गर्भावस्था एकसारखी नसते, तसंच मेनोपॉजची लक्षणं, त्यावेळेची शारीरिक-मानसिक अवस्थाही सगळ्या महिलांमध्ये एकसारखी नसते. काही महिलांना मेनोपॉजच्या आधी नियमितपणे मासिक पाळी येत असते. काही महिलांमध्ये मासिक पाळीमधला रक्तस्त्रावहळूहळू कमी होतो आणि मग पाळी थांबते. काही महिलांमध्ये मासिक पाळीचं चक्र बदलत आणि पाळी महिन्याच्या महिन्याला न येता अनियमितता यायला लागते.

या कालावधीला पेरीमेनोपॉज म्हणतात आणि याचा कालावधी काही महिने ते तीन-चार वर्षेही असू शकतो. जर एखाद्या महिलेला शेवटची पाळी आल्यानंतर 12 महिने पाळी आली नाही तर त्या महिलेचा मेनोपॉज सुरू झाला असं समजलं जातं.

पण मेनोपॉजनंतर जर एखाद्या महिलेला ब्लीडिंग होत असेल, तर ही गोष्ट सामान्य नसते.

स्त्रीरोगतज्ज्ञ भावना चौधरी मेनोपॉजनंतर होणाऱ्या रक्तस्त्रावाच्या कारणाबद्दल बोलताना सांगतात की, अनेकदा वय वाढतं तसं महिलांमध्ये योनीमार्ग कोरडा पडणं, गर्भाशयाचं अस्तर जास्त जाड किंवा पातळ होणं, इन्फेक्शन अशा समस्या निर्माण होतात.

मेनोपॉजनंतर रक्तस्त्राव होण्याची कारणं अनेकदा किरकोळही असतात, तर कधीकधी कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचं लक्षणही असू शकतं.

डॉ. एसएन बसू सांगतात, "मेनोपॉजनंतर तुम्हाला केवळ स्पॉटिंग होवो की जास्त रक्तस्त्राव होवो, तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. कारण अशा लक्षणांमध्ये कॅन्सरची शक्यता दहा टक्के असते. हा गर्भाशयाचा किंवा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर असू शकतो. अंडाशय किंवा योनीमार्गातही कॅन्सरचा संसर्ग होऊ शकतो."

तुम्हाला अशी कोणतीही लक्षणं आढळली तरी रक्ताची तपासणी, पॅप स्मीअर, एंडोमीट्रियल बायोप्सी, सोनोग्राफी आणि डीएनसी सारख्या चाचण्या करून घ्याव्यात.

डॉक्टर सांगतात की, अनेकदा दोन-तीन महिने मासिक पाळी आली नाही, तर मेनोपॉज सुरू झाला असं अनेक महिलांना वाटतं. त्यानंतर त्या गर्भनिरोधक साधनांसारखी खबरदारी बाळगत नाहीत. त्यामुळे अनेकदा महिला मुलं मोठी झाल्यावरही गरोदर राहिल्याचं दिसून येतं.

आपल्याकडे अशी समस्या घेऊन जेव्हा नवरा-बायको येतात, तेव्हा गर्भपाताची वेळही टळून गेली असते, असंही डॉक्टर सांगतात. त्यामुळेच जोपर्यंत मेनोपॉज सुरू ममझाला आहे, असं डॉक्टर स्वतःहून सांगत नाहीत, तोपर्यंत जोडप्याने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला डॉक्टर देतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)