You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कंगना राणावत वाद: जया बच्चन बॉलिवूडमधल्या ड्रग्ज कनेक्शनबद्दल काय बोलल्या?
अभिनेत्री कंगना राणावतनं बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनवर भाष्य केल्यानंतर त्याचे पडसाद केवळ महाराष्ट्रातल्या राजकारणावरच नाही, तर संसदेतही उमटले आहेत आणि त्यामुळे खासदार जया बच्चन यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोलही व्हावं लागलं.
हिंदी-भोजपुरी अभिनेते तसंच भाजप खासदार रवी किशन यांनी सोमवारी (14 सप्टेंबर) लोकसभेत बोलताना बॉलिवूडमधल्या ड्रग्जच्या विळख्यासंदर्भात जे काही आरोप झाले आहेत त्यासंबंधी काही प्रश्न उपस्थित केले. देशातील तरूण पिढी बिघडवण्यासाठी हे चीन आणि पाकिस्ताननं रचलेलं षड्यंत्र आहे, असा आरोप रवी किशन यांनी केला.
"ड्रग्जचं व्यसन हे चित्रपट सृष्टीतही आहे. अनेक जण सापडले आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (NCB) खरंच चांगली कामगिरी बजावली आहे. दोषींविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी मी केंद्र सरकारकडे करतो. त्यांना कठोर शिक्षा देऊन शेजारील देशांच्या षड्यंत्राला चोख प्रत्युत्तर द्यावं," असं रवी किशन यांनी म्हटलं.
NCB नं अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीवर केलेल्या कारवाईकडे रवी किशन यांचा रोख होता.
रवी किशन यांच्या या वक्तव्यावर मंगळवारी (15 सप्टेंबर) जया बच्चन यांनी राज्यसभेत तीव्र आक्षेप घेतला. जया बच्चन यांनी म्हटलं, "काही लोकांमुळे तुम्ही संपूर्ण इंडस्ट्रीची प्रतिमा मलीन करू शकत नाही. या इंडस्ट्रीशी संबंधित असलेल्या एका लोकसभा सदस्यानेही फिल्म इंडस्ट्रीबद्दल वक्तव्यं केलं, तेव्हा मला खूप वाईट वाटलं."
"जिस थाली में खाते हैं उसी में छेद करते हैं," असं विधान जया बच्चन यांनी केलं.
"जयाजींनी मला पाठिंबा द्यावा, असं मला वाटतं. इंडस्ट्रीमधले सर्वजण ड्रग्ज घेतात असं नाही, पण जे घेतात, ते या इंडस्ट्रीला संपविण्याच्या कटाचा भाग आहेत. जेव्हा मी किंवा जयाजी या इंडस्ट्रीमध्ये आलो, तेव्हा परिस्थिती वेगळी होती. पण आता चित्र बदललं आहे. आम्ही या इंडस्ट्रीचं रक्षण करायला हवं," अशी प्रतिक्रिया रवी किशन यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना जया बच्चन यांच्या वक्तव्यावर दिली.
बॉलिवूडमधून कोणी दिला पाठिंबा?
दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी जया बच्चन यांच्या विधानाचं समर्थन करणारं ट्वीट करताना म्हटलं की, पाठीचा कणा याला म्हणतात.
अनुभव सिन्हांच्या याच ट्वीटवर अभिनेत्री तापसी पन्नू हिनेही जया बच्चन यांना समर्थन देणारं ट्वीट केलं. इंडस्ट्रीतल्या एका महिलेनं ठाम भूमिका घेतल्याचं कौतुक करायला हवं.
अभिनेत्री सोनम कपूर हिनेही म्हटलं की, मी जेव्हा मोठी होईन तेव्हा मला असंच व्हायला आवडेल.
कंगना राणावतची जया बच्चन यांच्यावर टीका
बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटसंबंधी आरोप करणारी अभिनेत्री कंगना राणावत हिने जया बच्चन यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेणारं ट्वीट केलं.
"जर माझ्याप्रमाणे तुमची मुलगी श्वेता हिला मारहाण झाली असती, ड्रग्ज दिले गेले असते आणि विनयभंग झाला असता तरी तुम्ही हेच बोलला असता का? अभिषेकला लोकांकडून सतत त्रास सहन करावा लागला असता आणि त्यानेही गळफास लावून घेतला असता तर तुम्ही असं बोलला असता का? आमच्याबद्दल थोडी तरी सहानुभूती बाळगा," असं ट्वीट कंगनानं केलं.
जया बच्चन सोशल मीडियावर ट्रोल
नेटिझन्सना मात्र जया बच्चन आणि त्यांचं समर्थन करणाऱ्यांना ट्रोल केलं.
एका ट्वीटर युझरनं म्हटलं आहे की, जया बच्चन या ढोंगी आहेत. संजय राऊत यांनी कंगनाला उद्देशून हरामखोर म्हटलं त्यावेळी जया बच्चन यांनी विरोध का केला नाही? अमिताभ बच्चन यांनी सुशांत सिंह यांची आत्महत्या, कंगनाच्या ऑफिसवर केलेली कारवाई, रिया या प्रकरणावर भाष्य का केलं नाही?
रितीमुक्ता दाश यांनी म्हटलं, जया बच्चन या देशातील महिलांच्या पाठिशी उभ्या राहिल्या नाहीत तर केवळ स्वतःच्या कुटुंबासाठी भूमिका घेत आहेत. त्या खूप ढोंगी आहेत.
जया बच्चन बॉलिवूडमधील ड्रग पेडलर्सना पाठिशी का घालत आहेत, असा प्रश्न एका ट्वीटर युजरनं विचारला.
पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी म्हटलं आहे, की जया बच्चन या पालघर इथं झालेली साधूंची ह्त्या, सुशांत सिंह प्रकरण, निवृत्त नौदल अधिकाऱ्यावर हल्ला, दिशा आत्महत्या या प्रकरणांवर मौन बाळगून का आहेत?
जया बच्चन या संजय दत्त, सलमान खान सारख्यांना पाठिशी घालत आहेत, मात्र कंगना राणावत यांच्या ऑफिसची तोडफोड करणाऱ्यांबद्दल गप्प का आहेत?
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)