'राष्ट्रपती, पंतप्रधानांसह 10 हजार भारतीय व्यक्तींवर चीनची पाळत' : #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वेगवेगळ्या वेबसाइट्स आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1) राष्ट्रपती, पंतप्रधानांसह 10 हजार भारतीय व्यक्तींवर चीनची पाळत

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रमुख विरोधी पक्षनेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश यांच्यासह भारतातील 10 हजार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींवर चीन पाळत ठेवत असल्याचं वृत्त 'दि इंडियन एक्स्प्रेस'नं आपल्या शोधवृत्तातून समोर आणलंय. चीनस्थित मोठी डिजिटल तंत्रज्ञान कंपनी पाळत ठेवून असल्याचं या वृत्तात म्हटलंय.

'झेनुआ डेटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेड' असं पाळत ठेवणाऱ्या या कंपनीचं नाव असून, चीनच्या आजवरच्या कायापालटात आणि हायब्रीड वॉरफेरमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करणारी आद्यसंस्था म्हणून या कंपनीची ओळख आहे.

केवळ अतिमहत्त्वाच्या राजकीय नेत्यांवरच नव्हे, तर राजकीय संस्था आणि उद्योगांवरही चीननं पाळत ठेवलीय. भारतातील सर्व क्षेत्रातील गुन्हेगारांचा तपशीलही या कंपनीकडे आहे.

लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्यासह 15 माजी लष्करप्रमुख, नौदलप्रमुख आणि हवाईदल प्रमुख, सरन्यायाधीश शरद बोबडे न्या. ए. एम. खानविलकर, लोकपाल पी. सी. घोष, कॅग जी. सी. मुर्मू यांच्या हालचालींची नोंदही ही कंपनी ठेवत असल्याचं दि इंडियन एक्स्प्रेसनं वृत्त म्हटलंय.

दि इंडियन एक्स्प्रेसनं आज वृत्त प्रकाशित केले आहे. केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांची यावर काय भूमिका आहे, हे अद्याप समोर आले नाही. मात्र, आजपासून संसदेचं अधिवेशन सुरू होत असल्यानं हा मुद्दा चर्चेत येण्याची दाट शक्यता आहे.

2) श्रीमंत मराठा आमदारांना आरक्षण नकोय - प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्रातल्या श्रीमंत मराठा आमदारांनाच आरक्षण नकोय, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. लोकसत्ताने ही बातमी दिलीय.

"महाराष्ट्रात 288 पैकी 182 श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरीब मराठ्यांसाठी इतर सर्वांना व्यवस्थेबाहेर ठेवतात. गरीब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत," असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

तसंच, गरीब मराठ्यांनी श्रीमंत मराठ्यांविरूद्ध स्वत:चा लढा उभारावा, अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावं लागेल, असं आवाहनही प्रकाश आंबेडकरांनी केलं.

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्याने हा मुद्दा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

3) भाजपकडून महाविकास आघाडीला उकसवण्याचा कट - मुश्रीफ

भारतीय जनता पक्षाकडून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना उकसवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. सकाळ वृत्तपत्राने ही बातमी दिलीय.

"भाजपने महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी विविध अजेंडे तयार केले आहेत. यामध्ये भाजपला यश आलेलं नाही. त्यामुळे भाजप नेत्यांकडून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना उकसवण्याचा प्रयत्न होत आहे," असा आरोप मुश्रीफांनी भाजपवर केला.

यावेळी हसन मुश्रीफ यांनी देवेंद्र फडणवीसांच्या बिहारमधील वक्तव्याचाही समाचार घेतला. ते म्हणाले, "फडणवीस यांनी महाराष्ट्र शासनाची दहशत असा उल्लेख बिहारमध्ये केला. हे ऐकून धक्का बसला. फडणवीसांच्या काळात कायदा व सुव्यवस्थेची काय स्थिती होती, याची श्वेतपत्रिका काढायला सांगणार आहे."

4) माझ्यावर अन्याय, मला न्यायाची आशा - कंगना राणावत

अभिनेत्री कंगना राणावतने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे आपल्यावर अन्याय झाल्याची भावना तिनो बोलून दाखवली आणि न्यायाची आशा व्यक्त केलीय. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.

"राज्यपालांकडे मी माझी कैफियत मांडलीय. माझ्यावर अन्याय झाला असून, राज्यपालांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं आहे. त्यामुळे मला न्याय मिळेल अशी आशा आहे," असं कंगना म्हणाली.

कंगनानं राज्यपालांशी सुमारे वीस मिनिटे संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशीही तिने संवाद साधला.

राज्यपालांनी मुलीप्रमाणे माझे म्हणणे ऐकून घेतलं आणि मला आश्वस्त केलं, असं कंगनाने माध्यमांना सांगितलं.

5) कोरोना लशीची भीती दूर करण्यासाठी पहिला डोस मीच घेईन - आरोग्यमंत्री

कोरोना विषाणूवरील लस जानेवारी 2021 पर्यंत तयार होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. तसंच, या लशीबद्दल लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी पहिला डोस मीच घेईन, असंही डॉ. हर्षवर्धन म्हणाले. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.

"कोरोनावरील लस पहिल्यांदा त्या लोकांसाठी उपलब्ध करून दिली जाईल ज्यांना तिची सर्वाधिक गरज आहे. मग भलेही यासाठी त्यांच्याजवळ पैसे नसले तरी चालेल."

सरकार ज्येष्ठ नागरिक आणि उच्च जोखमीच्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना कोविड-19 च्या लशीसाठी आपत्कालीन प्राधिकरण स्थापण्याचाही विचार करत असल्याची माहितीही डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)