IPL 2020 चे वेळापत्रक जाहीर, मुंबई-चेन्नई मॅचने उडणार धुरळा

कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर अनेक अडथळ्यांना पार करत यंदाच्या आयपीएल हंगामाचा नारळ 19 सप्टेंबरला मुंबई आणि चेन्नई लढतीने फुटणार आहे. 

आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने वेळापत्रकाची घोषणा केली. मुंबई-चेन्नई ही मॅच 19 सप्टेंबरला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता अबूधाबी इथे सुरू होईल. 

रविवारी दुबईत दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब समोरासमोर असतील. सोमवारी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स एकमेकांसमोर उभे ठाकतील.

चेन्नईचा संघ आणि व्यवस्थापनातील 13 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने चेन्नई सलामीची लढत खेळणार का? याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु बहुतांश सदस्य कोरोनाच्या दुसऱ्या चाचणीत निगेटिव्ह आढळल्याने चिंता मिटली आहे. चेन्नई यंदा सुरेश रैना आणि हरभजन सिंग या अनुभवी खेळाडूंविनाच मैदानात उतरणार आहे. स्वातंत्र्यदिनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर महेंद्रसिंग धोनीला चाहत्यांना पहिल्यांदाच लाईव्ह खेळताना पाहता येणार आहे. 

10 दिवशी दिवसात दोन मॅचेस होतील. 24 मॅचेस दुबई इथं, 20 अबूधाबीत तर 12 शारजा इथे होणार आहेत. प्लेऑफ आणि फायनलचं वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)