टिळकांबद्दलचा वाद: 'टिळक परिस्थितीला प्रतिसाद देत स्वतःत बदल करत गेले'

लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यसंग्राम, भारत

फोटो स्रोत, PIB

फोटो कॅप्शन, लोकमान्य टिळक
    • Author, सदानंद मोरे
    • Role, ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक

लोकमान्य टिळक हे महिला आणि बाह्मणेतरांना शिक्षण देण्याच्या विरोधात होते, अशा आशयाचा प्रा. परिमला राव यांनी लिहिलेला लेखआम्ही प्रकाशित केला होता. प्रा. राव या दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिक्षणाचा इतिहास शिकवतात व त्यांनी टिळकांच्या विचारांवर Foundations of Tilak's Nationalism: Discrimination, Education and Hindutva हे पुस्तक लिहिलं आहे.

टिळकांचे शिक्षण, महिला, शेतकरी आणि ब्राह्मणेतर समाज यांच्याविषयीचे विचार कसे होते, या वादाची दुसरी बाजू इथे देत आहोत. डॉ. सदानंद मोरे यांनी लोकमान्य ते महात्मा आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक अशा दोन पुस्तकांचं लिखाण केलं आहे.

line

15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत देश स्वतंत्र झाला. त्यामुळे स्वाभाविकपणे भारतीय विचारविश्वाचा नकाशाच बदलला. स्वातंत्र्यप्राप्ती हे आपले उद्दिष्ट राहिले नाही.

साहजिकच त्यासाठी ना विचार ना चळवळ. ज्यांनी स्वातंत्र्यसंग्राम प्रत्यक्ष पाहिला आहे अशा लोकांच्या पिढीचा जसजसा अस्त होत गेला तसतशी स्वातंत्र्यचळवळ ही एक ऐतिहासिक जिज्ञासेपुरती उरलेली वस्तू बनत चालली.

अर्थात स्वातंत्र्य मिळालं म्हणजे सर्वच समस्या सुटल्या असं नव्हे. विशेषत: वेगवेगळ्या प्रकारच्या विषमतेच्या समस्या सुटल्या आहेत, असे म्हणता येत नाही. समस्या अस्तित्वात असल्याने विषमतेविषयी चर्चा आणि चळवळीही अस्तित्वात आहेत. ते आपल्याला जिव्हाळ्याचे विषय वाटतात. स्वाभाविकपणे या समस्यांचा गंभीरपणे विचार केला होता.

त्या सोडवण्यासाठी स्वत:ला झिजवलं होतं. अशा महापुरुषांविषयीचा आपला आदर दिवसेंदिवस वाढतच गेला. यात गैर काहीच नाही. समाजातील विषमता व अन्याय दूर करण्यासाठी जे तनमनाने झटले व ज्यांचे कार्य अद्याप अपूर्ण राहिले आहे, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांचे कार्य चर्चेच्या आणि चळवळीच्या माध्यमातून पुढे नेणं आपलं कर्तव्य आहे. जे कोणी ते करत असतील त्यांच्याप्रतीही आदरच बाळगला पाहिजे.

या सर्व प्रक्रियेत ज्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी खस्ता खाल्ल्या त्यांना आपल्या चर्चाविश्वाच्या केंद्रस्थानातून च्युत करून परिघावर फेकले जाणेही समजून घेता येते. ज्यांची उपयुक्तता आज उरलेली नाही, त्यांना इतिहासाच्या अडगळीत फेकून देणं व ज्यांची उपयुक्तता टिकून आहे त्यांनाच प्रकाशझोतात ठेवणं हे मानवी स्वभावाला धरूनच आहे. तथापि अडगळीत पडलेले सांगाडे बाहेर काढून चिकित्सेच्या नावाने त्यांचे पोस्ट मॉर्टेम करत राहणे याप्रकाराचे औचित्य तपासून घ्यायला हवे.

तर स्वातंत्र्यपूर्व काळातील सामाजिक सुधारकांना अभिप्रेत असलेली अनेक उद्दिष्टं आपल्याला अद्याप गाठायची आहेत हे न नाकारता काही उद्दिष्टं आपण गाठली आहेत हे मान्य करावं लागेल. आपण ती गाठू शकलो याचं कारण आपण स्वतंत्र झालो. स्वातंत्र्याच्या काळात आपण निर्माण करू शकलेल्या राज्यघटनेच्या आधारे आपण हे केले हे नाकारता येत नाही. त्यामुळेच या स्वातंत्र्यासाठी खर्ची पडलेल्या देशभक्तांचे महत्त्व कमी होत नाही.

आधी राजकीय बदल की सामाजिक बदल?

स्वातंत्र्यपूर्व काळात, स्वातंत्र्याची चळवळ जोमात असताना सामाजिक परिवर्तनाच्या तत्कालीन चर्चाविश्वात स्वातंत्र्य केंद्रस्थानी होते आणि सामाजिक बाबी परिघावर होत्या. राष्ट्रसेवादलाशी प्रदीर्घ काळ निगडित असलेले प्रसिद्ध अभिनेते निळू फुले त्यांच्या अखेरच्या दिवसात अशी तक्रार करत असत की सेवादलाच्या शाखेवर (अर्थात निळूभाऊ लहान असताना) फुले कोणी सांगितलेच नाहीत.

लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यसंग्राम, भारत

फोटो स्रोत, KESARI MAHARATTA TRUST, PUNE

फोटो कॅप्शन, लोकमान्य टिळक आपली भूमिका स्पष्ट करताना

निळूभाऊंचे म्हणणे बरोबरच होते. एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे, पटवर्धन बंधू इत्यादी ज्येष्ठ समाजवाद्यांनी फुले समजावून सांगितले नाहीत. याचा अर्थ त्यांना फुले आणि फुल्यांच्या कार्याचं महत्त्व समजले नव्हते वा मान्य नव्हते असे नाही. विशिष्ट जातीमुळे त्यांनी ते सांगितले नव्हते असंही नाही. त्यांच्यासमोरचे मुख्य उद्दिष्ट स्वातंत्र्यप्राप्तीचे होते. हे कारण आहे.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची काही वर्षं स्वातंत्र्याच्या जल्लोषात गेली. जल्लोषाचा पहिला बहर ओसरल्यानंतर हळूहळू लोकांचे लक्ष अपूर्ण राहिलेल्या सामाजिक, आर्थिक उद्दिष्टांकडे व प्रकरणांकडे जाऊ लागले व त्यातून वेगवेगळ्या चर्चाविश्वांचा उदय झाला.

चर्चास्थानातील केंद्रस्थानांची अशी अदलाबदल झाली किंवा स्वातंत्र्याच्या अर्थविश्वाची जागा सामाजिक-आर्थिक अर्थविश्वाने घेतली. एका मर्यादेपर्यंत ही गोष्ट स्वाभाविक व समजून घेण्यासारखी आहे. पण ते न करता ही मंडळी अस्तित्वात असलेल्या चर्चाविश्वातील सोयीस्कर आणि फॅशनेबल स्थान पकडून कोणाला तरी लक्ष्य बनवतात. एकूण अकडेमिक्सची ज्ञानव्यवहाराची चिंता वाटते.

स्वातंत्र्यलढा सुरू असताना, स्वातंत्र्यवाद्यांनी सुधारणावाद्यांवर टीका केली. प्रसंगी उपेक्षा करत. सुधारणेच्या चर्चाविश्वाचे सीमांतीकरण करायचा प्रयत्न केला, याबाबत शंका घेण्याचे कारण नाही. परंतु वर लिहिल्याप्रमाणे तेव्हाही परिस्थिती आणि उद्दिष्ट संदर्भात त्यांची कृती समजून घेता येते.

त्याचप्रमाणे प्रतिक्रिया म्हणून सुधारणावाद्यांनी त्यांना त्याच प्रकारचा प्रतिसाद दिला असेल तर तेही समजून घेता येतं. मुद्दा आपल्या पूर्वसरींनी त्या काळातील परिस्थितीमुळे व परिस्थितीमधील आपापसातील स्थानांमुळे निष्पन्न झालेल्या निर्बंधकांचा किंवा मर्यादांचा परिणाम म्हणून असे केले असेल. किंवा आजही एखाद्या कार्यकर्त्याला आपल्या विशिष्ट भूमिकेमुळे तसे करावे लागत असेल तर अभ्यासकांनी ते करावे. किंवा का करावे? अभ्यासकांची कोणत्याही विचारसरणीशी बांधिलकी असू नये असे मी म्हणणार नाही. तथापि या बांधिलकीमुळे कोणावर अन्याय व्हायला नको. एवढी तरी किमान खबरदारी घ्यायला हवी. आपले आजचे चर्चाविश्व त्या काळातील त्यांच्या विचारविश्वाची आरशातील उलटी प्रतिमा होऊ नये.

टिळक आणि अस्पृश्यता

महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास लोकमान्य टिळकांच्या उदयाच्या वेळी खुद्द पुणे शहरात महात्मा जोतिबा फुले, न्यायमूर्ती रानडे आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर हे तिघे वेगवेगळ्या विचारप्रवाहांचे प्रतिनिधित्व करत होते. स्वत: टिळक आणि त्यांचे मुख्य सहकारी गोपाळ गणेश आगरकर चिपळूणकरांच्या गोटात दाखल झाले ते शिक्षणक्षेत्रात काम करण्यासाठी.

हे काम करता करता केसरी व मराठा वर्तमानपत्रांची निर्मिती झाली. वर्तमानपत्र चालवत असताना ते दोघं तेव्हाच्या राजकारणात आणि समाजकारणात आपोआपच खेचले गेले.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

पुढे त्या दोघांत बेबनाव झाल्यामुळे आगरकरांनी केसरी आणि मराठा सोडून रानड्यांच्या गटात प्रवेश केला. टिळकांनीही आगरकरांचे वर्चस्व असलेल्या केसरी-मराठी वर्तमानपत्रांचा राजीनामा देत ताब्यात घेतली. परंतु तेव्हा काय किंवा त्यानंतरही काय टिळक हे त्या वर्तमानपत्रांचे सर्वेसर्वा नव्हते. (मालकीचा मुद्दा आणखी वेगळा.) वर्तमानपत्रे सुरू झाली स्वत: चिपळूणकरांसह आणखी काही मंडळी त्यात होती. आणि मुख्य म्हणजे पत्राचे धोरण व भूमिका सामूहिक निर्णयातून ठरत असे व ते टिळकांवरही बंधनकारक असे.

लोणावळा इथे भरलेल्या अस्पृश्यता निवारण परिषदेतील टिळकांचे भाषण केसरीत छापले गेले नाही. ते टिळकांचे वैयक्तिक मत होते. पत्राच्या धोरणाशी विसंगत होते. अर्थात ते केसरी-मराठात छापून आले नाही तर अन्य वर्तमानपत्रात छापून आले. टिळकांसाठी ते पुरेसं होतं.

ते भाषण त्यांच्या वर्तमानपत्रातून छापून न आल्यामुळे फारतर त्यांच्यावर दुटप्पीपणाचा आरोप होणार होता. तो झाला व त्याने मिस्टर टिळक वेगळे आणि संपादक वेगळे असं म्हणून त्यांनी उत्तरंही दिली. टिळकांचे भाषण अस्पृश्यतेच्याविरुद्ध होते आणि त्यांचे मत सर्वांना ज्ञात झाले. अशा परिस्थितीत भाषणातील आशयाचे महत्त्व असायचे की ते केसरीत आले नाही याला महत्त्व असायचे हे विचारपूर्वक ठरवावे लागेल.

राजकारणात टिळकांना साथ देणारे भारतातील प्रमुख अस्पृश्यतानिवारक विठ्ठल रामजी शिंदे एकत्र राजकारणासाठी आपले अस्पृश्यतानिवारणाचे कार्य सोडून टिळकांबरोबर पूर्णवेळ राजकारण करण्याच्या विचारात होते. पण स्वत: टिळकांनी यात मोडता घातला. तुमचे हे काम स्वराज्याइतकेच महत्त्वाचे आहे असेही ते म्हणाले. मुद्दा टिळकांचा बचाव किंवा समर्थन करण्याचा नसून टिळकांना समजून घेण्याचा आहे. त्यासाठी हे उदाहरण दिले.

टिळक विरुद्ध रानडे ही मांडणी चुकीची

न्या. रानडे यांना टिळकांच्या विरोधात उभे करणाऱ्या अभ्यासकांना हे ठाऊक नसते की जोतीराव फुले यांच्यासाठी रानड्यांची भूमिका शेतकऱ्यांच्या हिताची नव्हती. ती ब्राह्मणी होती. फुल्यांनी केवळ रानड्यांची शेती व शेतकरी यांच्याविषयीची भूमिका खोडून काढण्यासाठी 'इशारा' नावाची पुस्तिका प्रसूत केली.

इतिहासामध्ये जेव्हा अशा प्रकारच्या विसंगती आढळतात तेव्हा तत्कालीन परिस्थितीचे तर्कशास्त्र तपासावे लागते. ते नीट करता आले तर असेही दिसते की व्यक्तीच्या वागण्यातील विसंगती ही परिस्थितीमधील विसंगती असते. तिच्यावर मात करणे शक्य नसेल तर तिचे प्रतिबिंब वागण्यात पडते.

लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यसंग्राम, भारत

फोटो स्रोत, KESARI MAHARATTA TRUST, PUNE

फोटो कॅप्शन, लोकमान्य टिळक

भारतातील ब्रिटिश वसाहतवादाच्या राजवटीत येथील परिस्थिती विलक्षण व्यामिश्र, गुंतागुंतीची झाली. देशातील मध्ययुगीन, सामाजिक व आर्थिक व्यवस्था मुख्यत्वे जातिधिष्ठित होती. ब्रिटिश काळात ब्रिटिशांच्या हितसंबंधांनुसार तिच्यावर आधुनिक व्यवस्थेचे कलम करण्यात आले. भारतातील विचारवंत या दुभंग व्यवस्थेत वावरत होते. जुनी व्यवस्था मोडून नवी व्यवस्था लगोलग आणता येईल अशी जादूची कांडी ना सुधारकांकडे होती ना नव्या सत्ताधीशांकडे.

अशा प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या हितसंबंधांच्या संघर्षाचा उपयोग आपली सत्ता मजबूत कशी करता येईल हाही विचार सत्ताधीश करत असत. अशावेळी कोणी कशाला प्राधान्य द्यायचे, कशाला गौणत्व द्यायचे, कोणत्या उद्दिष्टासाठी शक्ती खर्च करायची हा निर्णय तितका सरळ सोपा नसायचा. याप्रकारच्या आंतरिक संघर्षाला टिळक आणि आगरकर कसे सामोरे गेले होते याची पुरेशी सामग्री सापडते. स्वत: जोतीराव फुले सुद्धा सुरुवातीच्या काळात खूप पेचात पडले होते असे म्हणण्यास वाव आहे.

इंग्रज सरकार सशस्त्र क्रांतीच्या बळावर उलथवून लावायचे बेत जोतीबा रचत होते. त्यासाठी लहूजी वस्तादांच्या आखाड्यात जाऊन त्यांनी काही प्रशिक्षणही घेतले होते. हे त्यांनीच सांगितले आहे. तथापि परिस्थितीचे नीट विश्लेषण केल्यावर त्यांना धर्माचे पाठबळ असलेली ब्राह्मणी नोकरशाही शूद्रातिशूद्रांच्या अवनतीला कारण असून, काट्याने काटा काढावा त्याप्रमाणे ब्रिटिश सत्तेच्या छत्राखाली आवश्यक तेवढे शिक्षण घेऊन उन्नती साधायची, हे उद्दिष्ट समोर ठेऊन त्यांची पुढील वाटचाल झाली. ते भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्वराज्याच्या चळवळीपासून अलिप्त राहत असत.

रानडे शूद्रातिशूद्रांच्या दु:खस्थितीविषयी अनभिज्ञ नव्हते. तसंच असंवेदनशीलही नव्हते. तथापि व्यवस्थेमधील त्यांचे स्थान फुल्यांच्या स्थानापेक्षा वेगळे होते. ही बाब लक्षात आली की या दोघांच्या भूमिकांमधील विरोधाचा उलगडा होऊ शकतो. त्याचप्रमाणे रानडे कॅनॉट बी प्लेड अगेन्स्ट टिळक हेही लक्षात येतं. नाहीतर याच पद्धतीने फुले कान्ट प्लेड अगेन्स्ट रानडे.

टिळक मुस्लिमांच्या विरोधात की बाजूने?

टिळकयुग आणि गांधीयुग तसेच एका युगातून दुसऱ्या युगाकडे झालेले नेतृत्वाची संक्रमण प्रक्रिया यांचा अभ्यास करायचा योग मला मिळाला. त्यातून लोकमान्य ते महात्मा हा द्विखंडात्मक ग्रंथ सिद्ध झाला. इंग्रजी अनुवाद- लोकमान्य टू महात्मा प्रकाशित या ग्रंथात मी जैन तत्त्वज्ञानातील नयवादाचा इतिहासात व सामाजिक क्षेत्रात कसा करता येईल याचे विवेचन केलं आहे.

वर्ण, जात, वर्ग, राष्ट्र, लिंगभेद हे एकाच समाजवास्तवाकडे पाहायचे वेगवेगळे दृष्टिकोन असल्याचे माझे मत नाही. एकेक दृष्टिकोनातून या वास्तवाचा एक तुकडा हाती लागतो. त्यांची जुळणी केल्याशिवाय पूर्ण आकलन होणार नाही. कधी अभ्यासक एकेक नयन पकडून तर कधी काही नयांना एकत्रित करून दुसरा एखादा कोपरा दाखवायचे काम करतात. ही युती अर्थातच तात्पुरती असते हे सांगण्याची गरज नाही.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

या पद्धतिशास्त्रीय चर्वणाच्या पार्श्वभूमीवर टिळकांविषयी काही विशिष्ट गोष्टींची संक्षिप्त नोंद करतो:

1. 1895 साली काँग्रेसच्या पुणे इथे भरलेल्या अधिवेशनात सहकारी कृष्णाजी अनंत भालेकर यांनी मंडपाच्या प्रवेशद्वारापुढे अर्धनग्न शेतकऱ्याचा पुतळा उभा करून याचे तुमच्या काँग्रेसमध्ये काय स्थान आहे असा प्रश्न विचारला होता. त्याची दखल घेऊन टिळकांनी केसरीतील अग्रलेखात काँग्रेसने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे असे प्रतिपादन केले.

2. खोत, सावकार अशा देशी शोषकांपेक्षा परकीय ब्रिटिश सरकारने चालवलेले शोषण अधिक धोकादायक नाही. त्यामुळे आधी त्याकडे लक्ष दिले पाहिजे हे त्यांचे सर्वसाधारण सूत्र होते. याचा अर्थ ते अशा शोषकांचे समर्थक होते असा होत नाही.

3. अशाच प्रकारची त्यांची भूमिका सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात होती. आधी एकत्र येऊन महाशोषकाला हाकलून देऊ. आपापसातले प्रश्न स्वराज्यात सोडवता येतील. साम्राज्यवादाची ही आर्थिक बाजू टिळकांच्या लक्षात आल्यामुळेच ते लेनिनच्या प्रशंसेस पात्र ठरले.

4. एखाद्या चळवळीत किमान पाठबळ मिळाल्याशिवाय ती हाती घेऊन सामर्थ्याचा अपव्यय करू नये हे त्यांचे चळवळीचे pragmatic होते. अशी चळवळ मुख्य चळवळीत भेद करीत असेल तर तिच्यात भाग घेऊ नये असे त्यांनी त्यांच्यापुरते निश्चित केले होते. हेच तर्कशास्त्र त्यांनी सशस्त्र क्रांतिकारकांसाठी लागू केले होते.

5. आमचा यापुढील शिवाजी मुसलमानातून येऊ शकतो हे टिळकांचे विधान त्यांची मुसलमानांबद्दलची भूमिका स्पष्ट करण्यास पुरेशी आहे.

6. लखनऊ कराराच्या माध्यमातून टिळकांनी मुसलमानांना जेवढा वाटा देऊ केला त्यापेक्षा अधिक कोणी व काय दिले हा प्रश्न विचारून पाहावा. त्याच्या पुढील मागणी फक्त पॅरिटीचीच असू शकते. तीच जिनांनी लावून धरली.

7. शौकत, महंमद अली, बॅरिस्टर जिना, हसरत मोहानी टिळकांना मुसलमानांचा शत्रू मानत नसून मित्र व मार्गदर्शक मानत होते.

8. लखनऊ कराराच्या वेळी केलेल्या भाषणात टिळकांनी ब्रिटिशांच्या कूटनीतीवर बोट ठेवले. आपण मुसलमानांना केवळ वाटाच द्यायला तयार आहोत असे नसून हवे असेल तर सर्व कारभार त्यांच्याकडे सुपुर्द करायला आमची हरकत नाही. पहिल्यांदा ब्रिटिशांनी बाजूला व्हावे अशी स्पष्ट भूमिका मांडली. याच न्यायाने ब्रिटिशांनी येथील आदिवासी, दलित या समूहांकडे सत्तासंक्रमण केले तरी चालेल असेही बजावले.

9. मुंबईतून एक सायंदैनिक काढण्याचा टिळकांचा इरादा होता. त्यासाठी त्यांनी कंपनी स्थापन केली होती. तिच्या संचालक मंडळात मुसलमानही होते. दर शुक्रवारी हे पत्र मुस्लिम बांधवांसाठी विशेष पुरवणी म्हणून छापणार होते.

अभ्यासकांमध्ये गोंधळ होतोय का?

खरेतर अभ्यासकांमध्ये टिळक आणि इतरांविषयी असे गोंधळ निर्माण व्हायचे कारण काय या प्रश्नाचं उत्तर शोधले पाहिजे. जेव्हा फुले, रानडे, टिळक कार्यरत होते तेव्हा एखादा राजवाडे सोडला इतिहासाच्या पद्धतिशास्त्राचा विचार फारशा गांभीर्याने कोणी केलेला दिसत नाही. बहुतेकांनी युरोपियन अभ्यासकांची पद्धती इतकेच नव्हे तर निष्कर्षही मान्य केल्याचे लक्षात येते.

यामुळे याकाळातील बहुतेक सर्व एतद्देशीय ज्या प्रकाराला नंतर ओरिएंटन्लिझम म्हणून ओळखू लागले त्याच्या मर्यादा वावरताना दिसून येतात. पद्धतिशास्त्रीचे भान यांच्यासाठी एस.एम.रॉय, श्रीपाद अमृत डांगे यांच्यापर्यंत वाट पाहावी लागली.

या मंडळींनी कार्ल मार्क्सप्रणित वर्गकेंद्रित अर्थशास्त्रीय पद्धतिशास्त्राचा आधार घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जातीला केंद्रस्थानी मानून समाजशास्त्रीय आणि धर्मशास्त्रीय विश्लेषण करू लागले. पुढे मार्क्सवादी पद्धतीमध्येही उत्क्रांती होऊन काही अभ्यासकांनी ग्राम्शीला अनुसरले. कदाचित एखाददुसरा ब्रिटिश वाटेने जाऊ लागला. त्यातून सबआल्टर्न पद्धती जोमात आली. दरम्यान फुको-बिरेदी यांच्या विरचना पद्धतीचाही येथील अभ्यासकांनी अंगीकार केला. यापद्धतीचा उपयोग विशेषत: स्त्रीवादी अभ्यासकांनी अधिकच लाभदायकरीत्या करून घेतल्याचे आढळून येते.

टिळक

फोटो स्रोत, KESARI MAHARATTA TRUST, PUNE

पद्धतिशास्त्रीय चर्वणाचा परमोत्कर्ष महाराष्ट्रात शरद पाटील यांच्यामध्ये झाल्याचे दिसते. वर्गवर्णजातस्त्रीदास्यत्वाची चळवळ म्हणजेच सर्वप्रकारच्या गुलामगिरीविरुद्ध लढा उभा करू इच्छिणाऱ्या शरद पाटलांनी पहिल्यांदा मार्क्स फुले आंबेडकरवादी पद्धतीची रचना केली. नंतर फुल्यांना आणि आंबेडकरांना संस्कृत आणि इंडॉलॉजीचे प्रभुत्व नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना मानववंशशास्त्रज्ञ पद्धतीने धर्मकीर्तीसारख्या बौध्दिक विचारांची झालर देत व शेवटी नेणिवेच्या मानसशास्त्राची भर घालत एक पद्धतिशास्त्रीय व्यूह रचत पाटलांच्या विचारसमूहाचे वर्णन कमीत कमी शब्दांत करायचे झाले तर शक्यतो सौत्रांतिक साम्यवाद असे करता येईल. हा विचार जगातील चीनसारख्या साम्यवादी राष्ट्रांनी स्वीकारावा असे पाटील यांना वाटत होते. रशियाचे विघटन आधीच झाले होते.

पाटलांच्या पद्धतीची चर्चा करायचं हे स्थान नाही. याचवेळी ब्राह्मणभांडवली पितृसत्ताक अशा नव्या कॅटेगरीचा जन्म होऊन एक अत्यंत जटिल आणि कमालीच्या व्यामिश्र वास्तवाला एका कंसात टाकून त्याच्यावर विविध ठिकाणांहून मारा करण्यात येऊ लागला. असा मारा करणाऱ्यांची शस्त्रे लक्ष्यभेद करण्यापूर्वी एकमेकांना टकरून निष्प्रभ होत असल्याचाही अनुभव आला आहे.

चर्चाविश्वात केंद्रस्थान कसे मिळेल या धडपडीत असतात. मात्र स्वातंत्र्यलढ्याचे सीमांतीकरण करण्याच्या बाबतीत त्यांचे एकमत दिसून येते. आपल्या प्रणालीच्या बाहेरील प्रत्येक विचारवंताच्या अस्सलपणाबद्दल संशय असला तरी सद्यकालीन राजकीय परिस्थितीच्या रेट्यापुढे तूर्तास तरी त्यांची गांधीजींबद्दल सहमती दिसून येते, हेही नसे थोडके.

विशिष्ट ऐतिहासिक परिस्थितीचा परिपाक म्हणून वास्तविक काळात आपले चर्चाविश्व दुभंगले असण्याचा उल्लेख काही हायपरप्रमाणित मंडळींनी ते एकसंध करण्याच्या प्रयत्नात केला. रामजी शिंदे हे त्यातील अग्रगण्य. त्यांनी फुले, रानडे आणि टिळक यांचा एक महासमन्वय करण्याचा प्रयत्न केला. परंतु याप्रक्रियेत त्यांना सगळीकडून एकतर्फी पाडले गेले.

टिळक - मंडालेच्या आधी आणि नंतर

सार्वजनिक जीवनात प्रारंभ केल्यापासून टिळकांनी परिस्थितीला प्रतिसाद देत व्यवहार्य ठरतील असे बदल स्वत: करून घेतले आहेत. प्रबोधनकार ठाकरे यांनी टिळकांच्या चरित्राचे मंडालेपूर्व आणि मंडाले-उत्तर असे दोन भाग करण्याची सूचना केली होती. खरेतर मंडाले-उत्तर काळाचा विचार करताना चिरोल केससाठी इंग्लंडला जाऊन आल्यानंतरच्या काळाची वेगळी मीमांसा करावी लागेल.

मी ज्याला अखेरचे विधान म्हणतो ते खरेतर टिळकांचे राजकीय इच्छापत्र म्हणावे इतके महत्त्वाचे आहे. त्यावरून टिळक आपल्या राजकीय प्रवासात कोणत्या टप्प्यावर पोहोचले असतील याचा अंदाज येतो. 1920च्या एप्रिल महिन्यात टिळकांनी काँग्रेस डेमोक्रॅटिक पक्षाची घोषणा करून त्याचा जाहीरनामाही प्रकाशित केला. या जाहीरनाम्यात जातिभेद आणि लिंगभेदाविरुद्ध स्पष्ट भूमिका घेण्यात आली होती. विशिष्ट वयाखालील मुलामुलींना मोफत शिक्षण देण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन दिले होते. जाहीरनाम्याचा आराखडा टिळकांनी गांधी आणि जिना यांना दाखवला होता.

आता ही गोष्ट खरी आहे की टिळकांची ही व्यापक भूमिका समजून घेऊन ती पेलू शकणारा अनुयायी टिळकांना मिळाला नाही. त्यांच्या अनुयायांमध्ये सनातनी विचारसरणीच्या कर्मठ लोकांचे आधिक्य होते. पण दोष टिळकांचा नाही. महापुरुषांनासुद्धा परिस्थितीच्या मर्यादेत कार्य करावे लागते, जी परिस्थिती त्यांनी निर्माण केलेली नसते. अखेर शेवटी तुमचे कपडे उपलब्ध असलेल्या कापडातच बेतावे लागतात.

बरकरार है मंजिल-ए-मक्सूद सहरा-ए-अजम के पार

मुख्तसर नहीं कर सकते राह और सवार शुतुर-ए-बेमिहार

(लेखातील विचार लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत.)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 3

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)