राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे मंदिर आणि मॉल्सची तुलना होऊ शकते का?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू केलेला लॉकडाऊन हळूहळू शिथील होत आहे.

महाराष्ट्रातही 'पुनश्च हरिओम' म्हणत लॉकडाऊनचे निर्बंधांमध्ये काही सवलती दिल्या जात आहेत. पण काही गोष्टी अजूनही सुरू झाल्या नाहीत.

राज्यात जिम, धार्मिक स्थळं सुरू झालेली नाहीत. सण-उत्सवांसाठीही नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंदिर उघडण्यात यावीत, अशी भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील मॉल्स उघडू शकतात, तर मंदिरं का उघडली जात नाहीत? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे.

त्यांच्या या वक्तव्यानंतर राज ठाकरे यांनी मंदिर आणि मॉल्सची तुलना केली आहे का? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

राज्यातील धार्मिक स्थळं खुली करण्यात यावी ही मागणी करत त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळानं राज ठाकरेंची भेट घेतली. कृष्णकुंज या निवासस्थानी पुजाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.

मंदिरात अचानक झुंबड आली तर काय करणार, असा प्रश्न राज ठाकरे यांनी पुजाऱ्यांना विचारला. मंदिरं कशाप्रकारे सुरू करणार याची नियमावली तयार करा. म्हणजे ही नियमावली आपण राज्य सरकारकडे सोपवू, असं राज यांनी पुजाऱ्यांशी बोलताना म्हटलं.

मंदिरं कशाप्रकारे सुरू करणार याची नियमावली तयार करा, अशी सूचना राज ठाकरे यांनी पुजाऱ्यांना केली.

राज ठाकरे यांनी मंदिर आणि मॉल्सची तुलना केली नाही, असं मत मनसेचे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे यांनी मांडले आहे. "सध्याच्या काळात सर्वाधिक गर्दी मॉल्समध्येच असते जर मॉल्स सर्व नियम पाळून उघडले जात असतील तर मंदिरांना परवानगी देण्यात यावी असं राज ठाकरे यांचं म्हणणं आहे."

मंदिरं ही मानसिक गरज आहे, त्यामुळे मंदिरं उघडणं ही मानसिक आवश्यकता आहे. फक्त सोशल डिस्टन्सिंगचं भान बाळगलं पाहिजे असं शिंदे सांगतात.

मंदिरं उघडण्यात यावीत अशी भूमिका केवळ राज ठाकरे यांनीच घेतली नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनीही मंदिरं खुली करायला पाहिजेत, असं मत व्यक्त केलं होतं.

तुळजाभवानी मंदिर बंद आहे. आता व्यावसायिकांना त्रास होत आहे, असं ट्वीट करत एका तरुणाने रोहित पवार यांच्याकडे मंदिरं खुली करण्याची मागणी केली होती.

रोहित पवार यांनीही ट्वीट करून म्हटलं होतं की, मंदिरं आणि धार्मिक स्थळं लोकांसाठी खुली करायला पाहिजेत, असं माझंही म्हणणं आहे. कारण त्या भागात असलेल्या अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी त्यावर अवलंबून आहे. लोकांच्या धार्मिक भावनाही असतात.

याबाबत पाठपुरावा करण्याचं आश्वासनही रोहित पवार यांनी दिलं होतं.

भाजपनंही मंदिरं सुरू करण्याची मागणी केली होती. मंदिरं बंद असल्यामुळे पुजाऱ्यांचं उत्पन्न बंद आहे. त्यामुळे राज्य सरकारने मंदिराच्या देखभालीसाठी खर्च द्यावा तसंच गुरव समाजाला आर्थिक मदत करावी अशी मागणी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनीही काही दिवसांपूर्वी केली होती.

महाराष्ट्र वगळता इतर राज्यातील सर्व प्रसिद्ध मंदिरं उघडली आहेत. मात्र महाराष्ट्रातील मंदिरं अद्याप कुलूप बंद आहेत. मंदिरे हे सुद्धा लाखो लोकांच्या उपजीविकेचे साधन आहे. त्यामुळे कठोर नियम करा पण राज्यातील मंदिरे उघडा, अशी मागणी ब्राह्मण महासंघाकडूनही करण्यात आली होती.

काय आहे राज्य सरकारची भूमिका?

दरम्यान, सार्वजनिक प्रार्थनास्थळं इतक्यात खुली करणार नसल्याचं काही दिवसांपूर्वी राज्य सरकारनं स्पष्ट केलं होतं. प्रार्थनास्थळे उघडण्यासाठी परवानगी दिली तर करोनाचा संसर्ग वाढण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे परवानगी देऊ शकत नाही,' अशी भूमिका राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात मांडली होती.

15 ते 23 ऑगस्टदरम्यान पर्युषण पर्व आहे. या निमित्तानं मंदिरात जाऊन पूजा करण्याची परवानगी जैन समाजानं मागितली होती. त्यासंदर्भात न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर उत्तर देताना राज्य सरकारनं कोरानाच्या भीतीमुळे इतक्यात प्रार्थनास्थळांना परवानगी देता येणार नसल्याचं म्हटलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)