स्वातंत्र्य दिन : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा नाव न घेता चीनला इशारा #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, DD NEWS
आज सकाळी प्रसिद्ध झालेल्या वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवरील बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. अशांतता निर्माण करणाऱ्यांना चोख उत्तर देण्याचा राष्ट्रपती कोविंद यांचा इशारा
स्वातंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (14 ऑगस्ट) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या भाषणादरम्यान नाव न घेता चीनला इशारा दिला आहे.
संपूर्ण जगासमोर उभ्या ठाकलेल्या संकटाचा सगळे एकजुटीने सामना करण्याची गरज आहे, अशामध्ये आपल्या शेजाऱ्याने विस्तारवादी हालचाली सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे, असं राष्ट्रपती कोविंद यांनी म्हटलंय. लोकमतने याविषयीची बातमी दिली आहे.
जो अशांतता निर्माण करेल त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा राष्ट्रपती कोविंद यांनी दिला. सोबतच सीमेचं संरक्षण करताना आपल्या जवानांनी प्राणांचं बलिदान दिल्याचं सांगत गलवान खोऱ्यात हौतात्म्य आलेल्या जवानांना राष्ट्रपतींनी वंदन केलं.
2. मोहनचंद शर्मा देशातले सर्वाधिक शौर्य पदकं मिळवणारे अधिकारी
पोलीस अधिकारी मोहनचंद शर्मा यांची निवड मरणोत्तर शौर्य पदकासाठी झाली आहे. 2008सालच्या बाटला हाऊस चकमकीमध्ये शहीद झालेल्या मोहनचंद शर्मांना अशोक चक्राने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या नावे आता आणखी एक शौर्य पदक देण्यात आलं असल्याची बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

हा पुरस्कार गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित होता. शेवटी गृह मंत्रालयाने यावर मोहोर उमटवत मोहनचंद शर्मा यांच्यासह त्यांच्या टीमची या शौर्य पुरस्कारासाठी निवड केली आहे.
मोहनचंद शर्मा यांच्या नावावर आतापर्यंत 9 शौर्य पदकं आहेत. आता आणखी एक शौर्य पुरस्कार मिळाल्यानंतर सर्वाधिक शौर्य पुरस्कार मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या यादीत त्यांचा समावेश झालाय. अशोक चक्र मिळवणारे दिल्ली पोलिसातले ते एकमेव अधिकारी आहेत.
3. राष्ट्रध्वजाचा मास्क विकणाऱ्या अॅमेझॉन, फिल्पकार्टवर कारवाईची मागणी
ॲमेझॉन, इंडियामार्ट, फेमअसशॉप, मिंत्रा, स्नॅपडील, फ्लिपकार्ट या वेबसाईट्सवरून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या भारतीय राष्ट्रध्वजाच्या मास्कची विक्री करण्यात येत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अवमानाचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी आणि अशा मास्कची विक्री, उत्पादन आणि वितरण होणार नाही यासाठी शासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलीय. झी न्यूजने याविषयीची बातमी दिली आहे.
राष्ट्रध्वजाच्या होणाऱ्या अवमानाबाबत यापूर्वी हिंदू जनजागृती समितीने 2011मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने शासनाला राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना आणि अवमान रोखण्याचे आदेश दिले होते.
4. केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल कोरोना पॉझिटिव्ह
कोरोना व्हायरसच्या साथीच्या सुरुवातीच्या काळात दररोज पत्रकार परिषद घेऊन देशातल्या परिस्थितीची माहिती देणारे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांना कोरोनाचा संसर्ग झालाय. आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी ट्वीट करून दिली आहे. लोकसत्ताने ही बातमी दिलेली आहे.
नियमांनुसार आपण होम आयसोलेशनमध्ये असल्याचं लव अग्रवाल यांनी या ट्वीटमध्ये सांगितलंय. शिवाय आपल्या संपर्कात आलेल्या मित्र मंडळी आणि सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी असंही त्यांनी म्हटलं आहे.
5. गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांची तब्येत खालावली
प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्यावर सध्या कोव्हिड 19 साठी उपचार करण्यात येत आहेत. काल त्यांची प्रकृती खालवली आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.
5 ऑगस्टला कोरोनाचं निदान झाल्यानंतर बालसुब्रमण्यम यांना चेन्नईच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ते उपचारांना प्रतिसाद देत होते. गुरुवारी (13 ऑगस्ट) त्यांची तब्येत खालावल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं आहे. पत्थर के फूल, हम आपके हैं कौन, बागी, साजन, रोजासारख्या अनेक चित्रपटांतली बालसुब्रमण्यम यांची गाणी लोकप्रिय आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








