You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनाच्या काळात फसव्या जाहिरातींचा सुळसुळाट, वैज्ञानिक आधाराचं काय?
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठीसाठी
गेल्या काही दिवसांपासून फेसबुक, ट्विटर, यू-ट्यूब आणि इतर सोशल नेटवर्गिंकच्या माध्यमातून आरोग्य सुरक्षेसंदर्भात अनेक जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील.
"इम्युनिटी बुस्टर ब्रेड"
खाल्लाय?
"इम्युनिटी बढाने वाली बिर्यानी"
ताव मारलाय?
"खाकरा खा..इम्युनिटी वाढवा"
खाकरा खाऊन वाढणार इम्युनिटी?
"अॅंटी कोरोना मॅट्रेस" वापरा…
कोरोना टाळा...
"अॅंटी कोरोना फॅब्रिक"
तुमच्या व्हॉट्सअॅपवर अशा विविध प्रकारच्या जाहिरातींचे मेसेज येत असतील. आपल्यापैकी काहींनी तर हे पदार्थ खरेदी केले असतील.
पण, ग्राहकांनो वेळीच सावध व्हा! रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या या फसव्या जाहिरातींना बळी पडू नका.
फुफ्फुसांवर हल्ला करणाऱ्या कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची गरज आहे. मात्र, याचा फायदा काही कंपन्यांनी घेण्यास सुरूवात केली आहे.
मार्च महिन्यापासून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा 'ब्रेड', बिर्यानी, खाकरा, सॅनिटायझर्स यांच्या जाहिरातींचा सुळसुळाट झालाय. लोकं या फसव्या जाहिरातींना बळी पडू लागलेत. त्यामुळे जाहिरातींवर लक्ष ठेवणाऱ्या अॅडव्हर्टाइझिंग स्टॅडर्ड काउन्सिल ऑफ इंडियाने आता या फसव्या जाहिरातींवर कारवाई सुरू केली आहे.
फसव्या जाहिरातींचा सुळसुळाट (स्त्रोत-ASCI)
- मार्च-एप्रिल महिन्यात अॅडव्हर्टाइझिंग स्टॅडर्ड काउन्सिल ऑफ इंडियाकडे (ASCI) 533 फसव्या जाहिरातींबाबत तक्रार
- मे महिन्यात 251 तक्रारी आल्या
- डिजिटल, सोशल, फेसबूक, इंन्ट्राग्राम आणि कंपनीच्या वेबसाइटवर या जाहिराती
- मार्च-एप्रिल महिन्यात115 जाहिराती तात्काळ मागे घेण्यात आल्या
याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना अॅडव्हर्टाइझिंग स्टॅडर्ड काउन्सिल ऑफ इंडियाच्या महासचिव श्वेता पुरंदरे म्हणाल्या, "एप्रिलपासून 500 फसव्या जाहिरातींच्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे.
फसव्या जाहिराती विविध प्रॉडक्टच्या आहेत. या जाहिराती डिजीटल, सोशल, यू-ट्यूब, फेसबूक, इंन्स्ट्राग्राम यावर प्रसारित करण्यात आल्या होत्या. कोरोना व्हायरस विरोधात सुरक्षा देणारे कपडे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे हॅन्ड सॅनिटायझर, अॅंटी कोरोना व्हायरस मॅट, अन्नपदार्थ, इम्युनिटी वाढवणारा खाकरा अशा प्रकारच्या जाहिराती करण्यात आल्या होत्या. सर्वात जास्त जाहिराती आरोग्य क्षेत्राशी निगडीत आहेत."
फसव्या जाहिराती कोणत्या क्षेत्रातील (स्त्रोत-ASCI)
- मार्च-एप्रिल महिन्यात कंन्झुमर कंप्लेंट काउंसिलने 418 प्रकरणांची चौकशी केली.
- 377 तक्रारी कारवाईसाठी योग्य ठरवण्यात आल्या.
- आरोग्य क्षेत्राशी निगडीत 187 तक्रारी
- अन्न पदार्थांबाबत 15 तक्रारींवर कारवाई करण्यात आली
- शिक्षण, बांधकाम व्यवसायाबाबतही तक्रारी आल्या
"तक्रार आल्यानंतर काही जाहिराती एका आठवड्याच्या आत मागे घेण्यात आल्या. आयुर्वेद, सिद्धा, युनानी आणि होमियोपॅथी औषधांबाबत यातील काही जाहिराती होत्या. कंपन्यांनी अनेक दावे केले होते. काही कंपन्यांनी आपल्या जाहिरातीत आयुष मंत्रालयाचं नाव घेतलं. एका कंपनीकडून आमच्या प्रॉडक्टमध्ये इम्युनिटी वाढवणारे पदार्थ असल्याचा दावा करण्यात आला होता. तक्रार आल्यानंतर ही जाहिरात तात्काळ मागे घेण्यात आली," असं श्वेता पुरंदरे पुढे म्हणाल्या.
फसव्या जाहिरातींबाबत महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन आयुक्त अरूण उन्हाळे म्हणतात, "FDA चं पथक फसव्या जाहिरातींवर लक्ष ठेवून असतं. तक्रार आल्यानंतर चौकशी करून जाहिरात फसवी असेल किंवा खोटा दावा करण्यात आला असेल तर त्या कंपनीविरोधात कारवाई केली जाते."
मे महिन्यातील कारवाई (स्त्रोत-ASCI)
- 251 तक्रारींची चौकशी
- 23 जाहिराती तात्काळ मागे घेण्यात आल्या
- 222 प्रकरणी अॅडव्हर्टाइझिंग स्टॅडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाने स्वत:हून कारवाई केली
अॅडव्हर्टाइझिंग स्टॅंडर्ड काउन्सिल ऑफ इंडियाच्या महासचिव श्वेता पुरंदरे यांच्या माहितीनुसार, ज्या जाहिरातींमुळे सामान्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. अशा जाहिराती चौकशी होईपर्यंत तात्काळ काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले. याला सस्पेंशन पेंडिंग इनव्हेस्टिगेशन (Suspension Pending Investigation) म्हणतात.
अॅडव्हर्टाइझिंग स्टॅंडर्ड काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष रोहित गुप्ता म्हणतात, "नवीन कायदा अॅडव्हर्टाइझिंग क्षेत्र आणि ब्रॅन्डसाठी त्यांचा दर्जा वाढवण्यासाठी फार महत्त्वाचा आणि उपयुक्त आहे. ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून प्रयत्न करण्यात आले पाहिजेत. ज्यामुळे जाहिरात माहितीयुक्त आणि प्रामाणिक होईल."
फसव्या जाहिरातीबाबत या क्रमांकावर करा तक्रार
अॅडव्हर्टाइझिंग स्टॅडर्ड काउन्सिल ऑफ इंडियाने फसव्या जाहिरातींबाबत तक्रार करण्यासाठी 7710012345 हा वॉट्सअॅप नंबर जारी केलाय. सामान्य नागरीक या नंबरवर तक्रार करू शकतात. ASCI अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे, एखाद्या कंपनीने जाहिरात मागे घेण्यास नकार दिला तर त्याबाबत विविध सरकारी एजेंसीला कारवाईसाठी तक्रार दिली जाते.
अॅडव्हर्टाइझिंग स्टॅडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, सामान्यांपर्यंत फसव्या जाहिरातींपासून सावध करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला. काही जाहिरातींबाबत आयुष मंत्रालयाने तक्रार केली होती.
काय म्हणतात FDA अधिकारी?
महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे अतिरिक्त आयुक्त, व्हिजलन्स, सुनिल भारद्वाज म्हणाले, "इम्युनिटी बुस्टर म्हणून दावा करणाऱ्या प्रत्येक कंपनीला आपलं प्रॉडक्ट आयुष मंत्रालय किंवा इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून प्रमाणित करून घ्यावं लागतं.
"FDA कडे तक्रार आल्यानंतर कंपनीचा दावा योग्य आहे का नाही. कंपनीकडे लायसेंन्स आहे का नाही. याबाबत चौकशी केली जाते. त्यानंतर दोषी आढळल्यास ड्रग्ड आणि कॉस्मेटीक कायद्यांतर्गत कारवाई केली जाते."
- वाचा - युरेका! कोरोनावर प्रभावी औषध सापडलं, डेक्सामेथासोनकडून WHO ला पण आशा
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
फसव्या जाहिरातींबाबत बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या युवा आयएमएचे सदस्य डॉ. स्वप्नील मानकर म्हणतात, "रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा दावा करणारे अनेक पदार्थ बाजारात उपलब्ध आहेत. पण, या प्रॉडक्टना वैज्ञानिक आधार आहे? हे तपासण्याची गरज आहे. अनेक कंपन्या फसव्या जाहिराती करतात. लोकं या जाहिरातींना बळी पडतात."
"रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यसाठी लोकांनी प्रथिनं असलेले पदार्थ खाल्ले पाहिजेत. भाज्यांचं सेवन केलं पाहिजे. व्हिटॅमिन-सी, झिंक यांचं सेवन केलं पाहिजे. या औषधांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढते याला वैज्ञानिक आधार आहे. त्यामुळे लोकांनी सोशल मीडिया आणि टिव्हीवरील जाहिरातींना भुलू नये."
याबाबत बोलताना महाराष्ट्र रजिस्टर फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलाश तांदळे म्हणाले, "इम्युनिटी बुस्टरच्या नावाखाली अनेक प्रॉडक्ट बाजारात आहेत. आयुर्वेदीत औषधांवर देशात म्हणावं तस नियंत्रण नाही. याचा फायदा घेवून कंपन्या फसव्या जाहिराती करून प्रॉडक्ट बाजारात आणतात. त्यामुळे अनेक फार्मासिस्ट आणि केमिस्ट अशी आयुर्वेदीक औषधं ठेवत नाहीत. सरकारने याबाबत ठोस धोरण आखलं पाहिजे."
रामदेव बाबांचं प्रकरण
रामदेव बाबांच्या पतांजलीने त्यांच्या आयुर्वेदिक औषधांनी कोरोना बरा होतो असा दावा केला होता. त्यानंतर कोरोनाबाबत फसव्या जाहिराती प्रकरणी केंद्रीय आयुष मंत्रालयाने योग गुरू बाबा रामदेव यांना नोटीस बजावली होती.
आयुष मंत्रालयाने चौकशीनंतर रामदेव बाबांना कोरोनिल औषध रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं आहे अशा आशयाची जाहिरात करून विक्रीसाठी परवानगी दिली होती. नंतर आपल्या औषधांनी कोरोना बरा होतो असं म्हटलं नव्हतं अशी सफाई रामदेव बाबा यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांनी दिली होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)