केरळ विमान अपघातः पाच तासांपूर्वी त्यानं विमानात बसल्यावर फेसबुकवर फोटो टाकला आणि...

कोळीकोड

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन, अखेर घराच्या दिशेने प्रयाण असं लिहून फेसबूकवर पोस्ट टाकणारे शर्फुद्दिन आपल्या घरी पोहोचू शकलेच नाहीत.
    • Author, इम्रान कुरेशी
    • Role, बीबीसीसाठी

घरी जायचं म्हणून 29 वर्षांच्या शर्फुद्दिन यांनी विमानात पाऊल टाकलं. आता 5 तासांमध्ये आपण आपल्या केरळमधल्या घरी असू असा विचार करुन त्यांनी फेसबुकवर पोस्टही टाकली.

पण एअर इंडिया एक्सप्रेसचं ते दुबई-कोळीकोड विमान कारीपूर विमानतळावर घसरलं आणि शर्फुद्दिन यांना काही घरी परतता आलं नाही. त्यांचा या अपघातामध्य मृत्यू झाला.

फेसबूकवरील फोटोत आईच्या मांडीवर बसलेल्या त्यांच्या मुलीच्या म्हणजे फातिमा इज्जाच्या डोक्याला जखम झाली असून तिच्यावर कालीकत मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये आज सकाळी शस्त्रक्रिया झाली.

"डॉक्टरांनी तिची तब्येत आता स्थिर असून तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याचे सांगितले असल्याचे", तिचे काका हानी हसन यांनी सांगितले.

शर्फुद्दिन यांची पत्नी अमिना (23) सकाळी ऑपरेशन करण्याआधी आपल्याशी बोलली असं कंठ दाटलेल्या स्वरात हसन यांनी सांगितलं.

ते म्हणाले, "तिच्या दोन्ही हातापायांना जबर दुखापत झाली आहे. ऑपरेशनची तयारी सुरू असताना ती सतत तिच्या नवऱ्याबद्दल विचारत होती, तिला आम्ही काहीही सांगितलेलं नाहीये"

फातिमावर कालिकत मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये तर अमिनावर मलबार इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस इथं शस्त्रक्रिया करण्यात आली.

केरळ विमान अपघात

फोटो स्रोत, SN RAJEESH

एअर इंडिया एक्स्प्रेसचं बोईंग 737 प्रकारचं विमान करीपूर धावपट्टीवर घसरलं आणि दरीत कोसळलं. विमानाचे अक्षरश: दोन तुकडे झाले. कॅ. दीपक साठे या विमानाचे पयलट होते. त्यांनी आधी एअर फोर्समध्येसुद्धा काम केलं होतं. दीपक साठे बरेच अनुभवी पायलट होते.या अपघातग्रस्त विमानात प्रवास करणाऱ्या 46 वर्षीय जयामोल जोसेफ यांनी दुबईतील त्यांच्या कुटुंबाचा मित्र असलेल्या सादिक मोहम्मद यांना या घटनेचा थरारक अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या, विमान जवळपास धावपट्टीवर उतरलं होतं आणि पुन्हा त्यानं आकाशात झेप घेतली. विमानात एकच गोंधळ उडाला होता."विमान पुन्हा आकाशात झेप घेण्याआधी चाकं जवळपास धावपट्टीला टेकली होती. पुन्हा विमान धावपट्टीवर उतरले आणि घसरलं. पुढे ते दरीत कोसळल्याचंही मला जाणवलं," असं जयामोल यांनी त्यांच्या दुबईतल्या मित्राला सांगितलं.

केरळ विमान अपघात

फोटो स्रोत, SN RAJEESH

"नेमकं काय होतंय, हे बऱ्याच प्रवाशांच्या लक्षात आलं होतं. अपघातानंतर सगळ्यांनीच आपापल्या नातेवाईकांना फोन करण्यास सुरुवात केली आणि सर्व प्रकार सांगू लागले. जसं तिनं आम्हाला फोन करून हे सर्व सांगितंल," असं सादिक मोहम्मद म्हणाले.मूळच्या कोळीकोड येथील असलेल्या जयामोल या मित्रपरिवाराला भेटण्यासाठी दुबईला गेल्या होत्या. खरंतर त्या मार्चमध्येच भारतात परतणार होत्या. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हवाई वाहतूक बंद करण्यात आली आणि त्या दुबईतच अडकून राहिल्या."सुदैवाने जयामोल यांना फारशी दुखापत झाली नाही. त्या बऱ्या आहेत. कदाचित त्या 31 व्या रांगेतल्या जागेवर बसल्या होत्या म्हणून असेल. नाकाला थोडीशी दुखापत झालीय. सध्या जयामोल हॉस्पिटलमध्येच डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत," असं सादिक यांनी सांगितलं.या अपघातग्रस्त विमानातील नशीबवान प्रवाशी म्हणजे 26 वर्षीय अफ्साल पारा. 189 प्रवाशांच्या यादीत अफ्सालचं नावही होतं. मात्र, तो विमान उड्डाणाआधी वेळेत विमानतळावर पोहोचू शकला नाही आमि त्यामुळे अपघातग्रस्त विमानातून तो कोळीकोडला येऊ शकला नाही.

केरळ विमान अपघात

फोटो स्रोत, SN RAJEESH

"विमानतळावर पोहोचण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला होता आणि तो 500 दिरहॅम दंड भरू शकला नाही. गेल्या पाच महिन्यांपासून त्याला नोकरी नाहीय. त्यामुळे त्याच्याकडे पैसेच नव्हते," असं अफ्सालचे चुलत भाऊ शामिल मोहम्मद यांनी सांगितलं.'वंदे भारत' मिशनच्या या अपघातग्रस्त विमानातील जवळपास निम्म्या लोकांच्या नोकऱ्या गेल्याने ते परतत होते. काहीजणांच्या व्हिसाची मुदत संपली होती. तर अनेकजण कोरोनाच्या काळात दुबईत अडकून पडले होते.

हे वाचलंत का?

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)