जगातले धोकादायक विमानतळ

विमानतळ, नैसर्गिक स्थिती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जगात अनेक धोकादायक विमानतळ आहेत.

लांबच लांब रांगा, कंटाळवाणे एजंट्स, महागडं अन्न आणि विमान उड्डाण लांबणं, अशा अनेक कारणांमुळे विमानप्रवास फार अडचणीचा ठरत असतो. मात्र, लांबपल्ल्याचं अंतर कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यासाठीचं सर्वात प्रभावी साधनं म्हणजे विमानप्रवास.

जगातली काही विमानतळ अत्यंत धोकादायक समजली जातात. या विमानतळांवर लँडिंग किंवा तिथून उड्डाण करणं जोखमीचं आणि तेवढंच रोमांचित करणारंही असतं. जगातल्या अशाच काही अत्यंत धोकादायक विमानतळांविषयी बघूया.

नेपाळ : तेंझिंग-हिलरी विमानतळ

नेपाळमधलं तेंझिंग-हिलरी विमानतळ जगातल्या सर्वात धोकादायक विमानतळांपैकी एक मानला जातो. हिमालयाच्या कुशीतल्या लुकला शहरात हे विमानतळ आहे. या विमानतळावरची धावपट्टी 460 मीटरची आहे. ही धावपट्टी धोकादायक असण्याचं कारण म्हणजे ती उतरती आहे. धावपट्टीचा उतार जवळपास 12% इतका आहे. उतार असल्याकारणामुळे या विमानतळावर केवळ हेलिकॉप्टर्स किंवा फिक्स्ड-विंग विमानं उतरू शकतात. मोठी प्रवासी विमानं या धावपट्टीवर उतरत नाहीत. या धावपट्टीच्या उत्तरेला हिमालय आहे तर दक्षिणेला तीव्र उतार आहे. त्यामुळे या विमानतळावर चुकीला जराही वाव नाही.

हिमालयाकडे जाण्याचा हा एन्ट्री पॉईंट आहे आणि म्हणूनच सर्वप्रथम हिमालय सर करणारे सर एडमंड हिलरी आणि शेर्पा तेंझिंग नॉर्गे यांचं नाव या विमानतळाला देण्यात आलं आहे.

स्कॉटलँड : बारा विमानतळं

हे जगातलं एकमेव पाण्याखालचं विमानतळ आहे. कोरो युजर अमित कुशवाह म्हणतात, "हे युनिक विमानतळ आहे. संपूर्ण जगात हे एकमेव असं विमानतळ आहे जिथे धावपट्टी म्हणून समुद्र किनाऱ्याचा वापर होतो." इथे विमान लँड करण्याची वेळ समुद्राच्या भरतीच्या वेळेवर अवलंबून आहे.

विमानतळ, नैसर्गिक स्थिती

फोटो स्रोत, Califer001/Barra Airport/Flickr/CC BY-SA 2.0

फोटो कॅप्शन, स्कॉटलंडचा बारा एअरपोर्ट

स्कॉटलँडमधल्या बारा भागातल्या आउटर हेब्राईड्स या बेटांच्या समुहापैकी एक असलेल्या ट्रे म्होर बेटाच्या किनाऱ्यावर हे पाण्याखालचं विमानतळ आहे. किनारपट्टीवरच विमान लँड करतात आणि तिथूनच उड्डाणही होतं. इथल्या धावपट्ट्या त्रिकोणाकार रचनेत आहेत. तसंच पायलटला विमान नेमकं कुठे उतरवयाचं याचा अंदाज येण्यासाठी धावपट्ट्यांवर लाकडी पोल उभारले आहेत. या विमानतळावर केवळ ट्विन ऑटर प्रॉपेलर विमानं उतरतात.

मालदिव : माले आंतरराष्ट्रीय विमानतळ

मालदिवमधल्या माले आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करणं सराईत वैमानिकांसाठीही आव्हानात्मक आहे. हे विमानतळ हुलहुल बेटावर आहे आणि हे संपूर्ण बेट म्हणजेच धावपट्टी आहे. जगातला हा एकमेव रनवे आहे जो समुद्रापासून फक्त 2 मीटर उंचीवर आहे. त्यामुळे वैमानिकाची जराशी चूक विमान थेट हिंद महासागरात नेण्याला पुरेशी ठरते.

विमानतळ, नैसर्गिक स्थिती

फोटो स्रोत, Thinkstock

फोटो कॅप्शन, मालदीव विमानतळ

कोरो युजर पिटर बॅस्करव्हिले म्हणतात, "हे जगातलं एकमेव विमानतळ आहे जे पाण्यापासून सुरू होतं आणि पाण्यात संपतं आणि एक विमानतळ एक संपूर्ण बेट व्यापतं."

90 हजार चौरस किमीवर पसरलेल्या 1192 कोरल बेटांपैकी हुलहुल एक बेट आहे. मालदिवला यायचं म्हणजे या विमानतळावर उतरायचं आणि इथून बोटीने इच्छित स्थळी पोहोचायचं.

कॅरेबियन बेटावरील विमानतळ

साबा या कॅरेबियन बेटावर असलेलं जुआन्चो ई रॉसक्वीन विमानतळ जगातल्या सर्वात धोकादायक विमानतळांपैकी एक आहे. कोरा युजर धारिया मानेक लिहितात, "दुबळ्या मनाच्या लोकांसाठी हे विमानतळ नाही."

याचं कारण म्हणजे या विमानतळाची धावपट्टी जगात सर्वात छोटी आहे. सामान्यपणे धावपट्टी 1800 ते 2400 मीटर लांबीच्या असतात. मात्र, या विमानतळाची धावपट्टी फक्त 396 मीटर इतकीच आहे. त्यामुळे या धावपट्टीवर तीच विमानं लँड करू शकतात ज्यांचा वेग तात्काळ कमी करता येतो. म्हणजेच आकाराने छोट्या विमानांसाठीची ही धावपट्टी आहे.

विमानतळ, नैसर्गिक स्थिती

फोटो स्रोत, Patrick Hawks/Juancho E Yrausquin Airport/Flickr/C

फोटो कॅप्शन, जगातला सगळ्यात छोटा रनवे

मात्र, हे विमानतळ जेवढं धोकादायक आहे तेवढाच सुंदर हा परिसर आहे. ही धावपट्टी एका उंच कड्यावर आहे. या कड्याच्या तिन्ही बाजूने कॅरेबियन समुद्र आहे. तर चौथ्या बाजूला उंच डोंगर आहेत. धावपट्टी खूपच छोटी असल्याने या विमानतळावर जेट विमानं उतरत नाहीत.

कोलोरॅडो : टेल्युराईड रिजनल विमानतळ

काळजाचा ठोका चुकवणारं हे विमानतळ समुद्रसपाटीपासून तब्बल 2767 मीटर उंचीवर आहे. उत्तर अमेरिकेतलं हे सर्वात उंचावरचं व्यावसायिक वापराचं विमानतळ आहे.

या विमानतळाचं वर्णन करताना कोरा यूजर एरिन व्हाईटलॉक लिहितात, "हे विमानतळ काळजाचा ठोका चुकवणारं असलं तरी तेवढचं अप्रतिम सुंदर आहे."

डोंगराळ भागातल्या एका पठारावर हे विमानतळ बांधलेलं आहे. धावपट्टी संपते तिथे तब्बल 300 मीटर खोल दरी आहे. खाली नदी आहे. विमानप्रवासाची धडकी भरवण्यासाठी एवढं पुरेसं नव्हतं म्हणून की काय या विमानतळाच्या धावपट्टीवर मध्यभागी मोठा उतार होता. मात्र, 2009 साली धावपट्टीचं नूतनीकरण करण्यात आलं. त्यामुळे आता हा विमानतळ बराच सुरक्षित आहे आणि मोठी प्रवासी विमानंसुद्धा या धावपट्टीवर उतरू शकतात. मात्र, रात्री किंवा जोराचा वारा वाहत असताना किंवा व्हिजिबिलिटी कमी असताना धावपट्टीवर लँडिंग करण्यास बंदी आहे.

हॉन्गकॉन्ग : काई ताक विमानतळ

हॉन्गकॉन्गमधलं काई ताक विमानतळ आता बंद असला तरी पूर्वी जेव्हा ते वापरात होता तेव्हा त्याला काई ताक हार्ट अटॅक विमानतळ म्हटलं जायचं.

कोरो यूजर जय वॅकर म्हणतात, "काई ताक विमानतळ सध्या वापरात नाही. 1925 ते 1998 पर्यंत तो कार्यरत होतं. मात्र, ते कार्यरत असेपर्यंत विमान उड्डाणाच्या जगातलं ते एक आश्चर्य होतं."

बंदरात भराव टाकून हे विमानतळ उभारण्यात आलं होतं. शिवाय या विमानतळाला लागूनच गगनचुंबी इमारती होत्या. 747 सारख्या मोठ्या प्रवासी विमानांच्या लँडिंगसाठी ही धावपट्टी तुलनेने लहानच होती.

जय लिहितात, "टेक-ऑफ किंवा लँडिंगच्यावेळी खिडकीतून बाहेर बघितल्यावर तुम्ही कुणाच्यातरी लिव्हिंग रुममध्ये आहात, असंच जाणवायचं."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)