You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राम मंदिर : 'नरेंद्र मोदी हेच सत्ता, तेच विरोधक आणि मध्यस्थही तेच'
- Author, मधुकर उपाध्याय
- Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी
वास्तव आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात किती अंतर आहे, हे समजून घेण्यासाठी 'कालयात्री' होण्याची गरज नाही. अनेकदा गोष्टी आपल्या समोर असतात. पण आपण त्या जाणून-समजून घेत नाही किंवा त्यांचा स्वीकार करत नाही.
अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या भव्य मंदिराचा भूमिपूजन सोहळा बघणाऱ्याला हेसुद्धा जाणवलं असेल की भारत अत्यंत वेगाने एका विशिष्ट दिशेने निघाला आहे आणि त्याला वळवणं आता शक्य वाटत नाही.
व्यापक जनमानसासाठी अयोध्या आस्थेचं केंद्र आहे. रामलल्लाचं जन्मस्थान आहे. हे शहर म्हणजे सामूहिक स्मृतिचा एक भाग आहे. यावर प्रश्न उपस्थित करणं म्हणजे स्वतःलाच कठड्यात उभं करण्यासारखं आहे. डोंगरावरून पडणाऱ्या मोठ्या दगडासमोर उभं होण्यासारखं आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
जे काही उरलं-सुरलं होतं ते भूमिपूजन सोहळ्याने इतक्या खोल खड्ड्यात गाडून टाकलं की त्यातून बाहेर येणं, जवळपास अशक्य आहे.
जिथे लोकांचंच म्हणणं आहे की नरेंद्र मोदी यांना 'महागाई कमी करणं किंवा आजार रोखण्यासारख्या' छोट्या कामांसाठी पंतप्रधान म्हणून निवडून दिलेलं नाही. त्यांना मोठी कामं करायची आहेत आणि ते मोठी कामं करत आहेत तिथे भूक, बेरोजगारी, शिक्षण आणि आरोग्य अशा छोट्या प्रश्नांना काहीच अर्थ उरलेला नाही.
लॉकडाऊनच्या काळात शेकडो किमी पायपीट करून गावी जाणारे म्हणतात, "एकटे मोदीजी काय-काय करतील? आम्हालाही काहीतरी करावं लागेल." ते पूर्णपणे चूक नाही. पंतप्रधान मोदी त्यांच्यासाठी आस्थेचं प्रतीक आहेत. प्रश्नाच्या पलिकडचे आहेत.
चारचौघात गप्पा मारताना नरेंद्र मोदी यांचा 'राष्ट्रपिता' असा उल्लेख केल्यावर कुठल्याच प्रतिक्रिया उमटत नाहीत. 'हर हर मोदी' घोषणेवर पूर्वी आक्षेप घेतला जायचा. आता तेही नाही. त्यांना परमेश्वराचा अवतार मानलं जातं. इतकंच कशाला समाजातला एक गट ते स्वतःच परमेश्वर असल्याचं म्हणतो. हे वास्तव आहे आणि याकडे कानाडोळा करून ते बदलू शकत नाही.
पंतप्रधान मोदी भूमिपूजनासाठी अयोध्येत होते त्यावेळी सोशल मीडियावर एक फोटो फिरत होता. मोदी धनुष्य हाती घेतलेल्या रामलल्लाचं बोट धरून त्यांना नव्याने उभारण्यात येत असलेल्या मंदिराकडे घेऊन जात आहेत. या फोटोत मोदी रामापेक्षा चार पट मोठे आहेत. मात्र, या फोटोचा विरोध झाला नाही. पंतप्रधानांची भव्य प्रतिमा आता लोकांनी स्वीकारली आहे, याचंच हे द्योतक आहे.
नरेंद्र मोदी सत्तेत आहेत. विरोधातही तेच आहेत आणि मध्यस्थीसुद्धा त्यांनाच करायची आहे. प्रतिमेच्या बाबतीत ते त्यांच्या समकालीन नेत्यांपासून मैलो नाही कित्येक दशकं पुढे आहेत. हे अंतर दिवसागणिक वाढत आहे.
हे अंतर किती दिवसांत भरून काढता येईल, याचं उत्तर कुठलंच गणित देऊ शकत नाही.
एक व्यक्ती एका दिवसात एक टोपली माती टाकत असेल तर एक हजार चौरस मीटरचा खड्डा भरायला किती दिवस लागतील, या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं.
मात्र, मोदी यांना मागे टाकणं सोडा त्यांची बरोबरी करायला कुणाला किती काळ लागेल, या प्रश्नाचं उत्तर कुणीच देऊ शकत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत वारंवार 'जय सीयाराम'च्या घोषणा दिल्या. ते एकदाही 'जय श्रीराम' म्हणाले नाही. मात्र, लोकांनी भूतकाळाच्या आठवणी जागवत ही घोषणा सहज स्वीकारली. यावर आक्षेप घेण्याचं कारणच नव्हतं. कारण प्रभू रामाप्रमाणेच माता सीतासुद्धा लोकांच्या स्मृतिचा भाग आहेत.
असं असेल तर प्रभू रामचंद्रांचा जयघोष करण्यासाठी वापरलेली ही घोषणा कुणासाठी होती? निश्चितच ते भूमिपूजनाचा मुहूर्त किंवा त्याच्या वेळेवरून करण्यात आलेल्या वरवरच्या टीकेला उत्तर देत नव्हते. ते विरोधकांनाही संबोधित करत नव्हते. उलट ते स्वतःच विरोधकांच्या भूमिकेत होते.
'जय श्रीराम' या उग्र जयघोषावर विरोधकांनी खूपच दबक्य आवाजात कधीतरी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, ही उद्घोषणा 'जय सीयाराम'मध्ये बदलण्याचं काम नरेंद्र मोदी यांनीच केलं.
भाजपच्या पालनपूर अधिवेशनानंतर पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्वच संघटनांनी 'जय श्रीराम'चा नारा दिला होता.
ते 'विनय न मानत जलधि जड' या क्रोधित रामाचं आव्हान करत होते. क्रोधित हनुमानाची प्रतिमासुद्धा याच विचाराचा भाग होती.
अयोध्येत लोकांचं अभिवादन करताना पूर्वी 'जय सीयाराम' म्हटलं जायचं. मात्र, ते केव्हा 'जय श्रीराम' झालं हे स्वतः अयोध्यावासींनाही कळलं नाही.
इतकंच कशाला डोक्यावर बांधलं जाणारं आणि खांद्यावर टाकण्यात येणारं 'जय सीयाराम' लिहलेलं उपरणंही गायब झालं. विक्रेते सांगतात कंपन्या आता 'जय सीयाराम' लिहिलेली उपरणं बनवतच नाहीत. सगळे 'जय श्रीराम' लिहिलेली असतात.
पंतप्रधानांनी 'जय सीयाराम' असा उद्घोष करत आपल्याच समर्थकांना आणि व्यापक जनमानसाला हा संदेश दिला आहे की देश आता एका नव्या समाजाच्या दिशेने निघाला आहे.
कदाचित त्यांना हा संदेश द्यायचा होता की नवीन समाज पुरूषप्रधान नसेल. नव्या समाजात स्त्रिला बरोबरीचं स्थान मिळेल. ज्या अतुल्य शक्तीचं प्रतीक पुरूष म्हणून रामाचं नाव घेतलं जायचं त्याजागी आता सौम्य राम येणार असल्याचा हा इशारा असेल.
त्यांनी आपल्या भाषणात केवट, शबरी आणि खारीचा उल्लेख करत समाजातल्या प्रत्येक वर्गाला स्वीकार्ह असेल अशी प्रतीमा मांडली.
इतकं मोठं सामाजिक परिवर्तन ज्यांना दिसलं नाही त्या विरोधकांची कीव का करू नये? हा बदल घडवायचा म्हणजे भाजप आणि संघाची खेळी खेळावी लागेल, धर्माचं राजकारण करावं लागेल, या शंकेमुळे विरोधकांनी आपली भूमिकाही नरेंद्र मोदी यांच्यावर सोपवली.
राजकीयदृष्ट्या किती पक्षांनी किती वेळा अंतर्गत वादात मोदी यांना मध्यस्थीची संधी दिली, याची गणतीच नाही.
अयोध्येत पंतप्रधानांची उपस्थिती आणि रामलल्लासमोर साष्टांग दंडवत घालणारी त्यांची प्रतीमा हे स्पष्ट करते की त्यांनी स्वतःला सत्तेच्या छोट्या सारीपाटाच्याही वर स्थान मिळवून दिलं आहे. ते टीकेपलिकडे गेले आहेत. उरलेले सर्व खेळाडू उरलीसुरली प्रतीमा वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत.
अयोध्येतलं भूमिपूजन भारतासाठी छोटी घटना नाही, हे सगळेच जाणून आहेत. याचे परिणाम दिर्घकालीन असणार आहेत. या प्रवाहात टिकून राहण्यासाठी प्रवाहाविरुद्ध पोहणे सर्वोत्तम उपाय नाही. मात्र, इतर कुठला पर्यायही शिल्लक नाही.
घर वाचवण्यासाठी ढासळणारी भिंत रंगवणाऱ्या विरोधकांकडून कुठलीही अपेक्षाही ठेवता येत नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)